Manoj Jarange Patil Sarkarnama
मराठवाडा

Manoj Jarange Patil : जरांगे-पाटलांचे पुन्हा 'उपोषणास्त्र', तारीखही ठरली; विधानसभेचं गणित बदलणार?

Manoj Jarange Patil Latest News : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी जरांगे-पाटील यांनी लावून धरली आहे.

Akshay Sabale

Manoj Jarange Patil Agitation : मराठा आरक्षणाचे नेते, मनोज जरांगे-पाटील यांनी पुन्हा उपोषणाचे अस्त्र बाहेर काढले आहे. जरांगे-पाटील 16 सप्टेंबरच्या मध्यरात्री बारा वाजेपासून उपोषणाला बसणार आहे. 17 सप्टेंबरला मराठवाडा मुक्ती संग्राम दिनापासून मराठ्यांना ओबीसीतून स्वतंत्र आरक्षण मिळण्यासाठी आंतरवाली सराटी येथे जरांगे-पाटील उपोषण सुरू करतील.

यापूर्वी मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange Patil) यांनी 29 सप्टेंबरपासून उपोषण करणार असल्याचं सांगितलं होतं. मात्र, आता मराठवाडा मुक्ती संग्राम दिन अर्थात 17 सप्टेंबरपासून आमरण उपोषण करणार असल्याचं जरांगे-पाटील यांनी आज ( 10 सप्टेंबर ) जाहीर केलं.

सगेसोयऱ्याची अंमलबजावणी, मराठा समाजाला ( Maratha Reservation ) ओबीसीतून आरक्षण, हैदराबाद आणि बॉम्बे गॅझेट या मागणींसह जरांगे-पाटील याआधीही उपोषणाला बसले होते. या आंदोलनाचं लोण राज्यात पसरले होते.

जरांगे-पाटलांच्या आंदोलनामुळे महायुती सरकारची कोंडी झाली होती. त्यासह लोकसभा निवडणुकीतही जरांगे-पाटलांच्या आंदोलनाच्या झळा महायुती सरकारला बसल्या होत्या. महायुतीच्या मातब्बर उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यात पंकजा मुंडे, रावसाहेब दानवे यांच्यासारख्या बड्या नेत्यांचा समावेश आहे.

यातच जरांगे-पाटील यांनीही 288 मतदारसंघात उमेदवार उभे करायचे की पाडायचे, हे ठरविणार असल्याचं सांगितलं आहे. अद्याप विधानसभा निवडणूक जाहीर झाली नाही. त्यामुळे विधानसभा घोषित झाल्यावर निर्णय जाहीर करू, असं जरांगे-पाटलांनी म्हटलं आहे. मात्र, त्यापूर्वी जरांगे-पाटील यांनी पुन्हा 'उपोषणास्त्र' बाहेर काढल्यानं सरकारची कोंडी होण्याची शक्यता आहे.

कारण, एकीकडे जरांगे-पाटील ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देण्याची मागणी करत आहेत. तर, दुसरीकडे मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी महायुतीत काही नेत्यांना विरोध आहे. त्यामुळे या मागणीवरून जरांगे-पाटील सरकारची कोंडी करू शकतात.

याचा फटका महायुती सरकार विधानसभा निवडणुकीत बसण्याची शक्यता आहे. पण, जरांगे-पाटलांच्या मागणीवर सरकार कोणती चाल खेळणार? कसा तोडगा काढणार? हे देखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT