Beed Politics : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याकडून उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्यावर सातत्याने टीका केली जात आहे. परभणी येथे झालेल्या शेतकरी मेळाव्याला जरांगे पाटील यांनी विरोध केला होता. याशिवाय, मराठा समाज आणि मनोज जरांगे पाटील यांच्यामुळे तुमची शान वाढली, अशी टीका जरांगे पाटील यांनी केली होती.
या पार्श्वभूमीवर येत्या दसऱ्याला नारायण गडावर होणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या मेळाव्याला शिवसेनेने विरोध सुरू केला आहे. एकनाथ शिंदेंच्या विरोधात बोलाल, तर जशास तसे उत्तर देऊ, असा इशाराच बीड शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष स्वप्निल गलधर यांनी माध्यमांशी बोलताना दिला आहे. मनोज जरांगे पाटील यांचा दसरा मेळावा २० ऑक्टोबर रोजी नगद नारायण गडावर होत आहे.
या मेळाव्याची जय्यत तयारी सुरू असतानाच, एकेकाळी मनोज जरांगे यांचे खंदे समर्थक व सहकारी राहिलेले, परंतु सध्या शिवसेना शिंदे गटाचे बीड जिल्हाप्रमुख असलेले स्वप्निल गलधर यांनी या मेळाव्याला तीव्र विरोध दर्शवला आहे. एकनाथ शिंदेंच्या विरोधात बोलाल, तर खबरदार! जशास तसे उत्तर दिले जाईल, असा थेट आणि आक्रमक इशारा देत त्यांनी बीडमधील राजकीय वातावरण तापवले आहे.
सध्या बीड जिल्हा भीषण दुष्काळाच्या संकटात होरपळत आहे. जिल्ह्यातील शेतकरी आणि सर्वसामान्य जनता पाण्यासाठी आणि पिकांच्या नुकसानीमुळे हवालदिल झाली आहे. अशा बिकट परिस्थितीत राजकीय शक्तिप्रदर्शन करणारे मेळावे घेण्यापेक्षा दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी काही करता येत असेल, तर करा, अशी भूमिका स्वप्निल गलधर यांनी मांडली आहे.
दुष्काळाच्या तीव्र समस्येवर बोट ठेवत त्यांनी नारायण गडावर होणारा हा दसरा मेळावा पूर्णपणे रद्द करावा, अशी मागणी केली आहे. या भूमिकेमुळे जरांगे समर्थक आणि शिंदे गट यांच्यात थेट संघर्ष भडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मनोज जरांगे पाटील आणि स्वप्निल गलधर यांचे जुने संबंध सर्वश्रुत आहेत. मात्र, आता सत्तेतील युती आणि राजकीय समीकरणे बदलल्यामुळे एकेकाळचे सहकारीच एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत.
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका सहन केली जाणार नाही, असा सज्जड दम देत गलधर यांनी मराठा आंदोलकांशी थेट दोन हात करण्याची तयारी दर्शवली आहे. या भूमिकेमुळे मेळाव्याच्या आधीच बीडच्या राजकारणात प्रचंड चलबिचल सुरू झाली असून, आगामी काळात हा वाद आणखी पेटण्याची चिन्हे दिसत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.