Manoj Jarange Patil Warn State Government On Affected Farmers Issue News Sarkarnama
मराठवाडा

Manoj Jarange Patil : शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे आलेच नाही ; रस्त्यावर उतरून कपडे फाडण्याचा जरांगेंचा सरकारला इशारा!

Affected Farmers Issue : 75 वर्षापासून हेच होत आलं आहे. दिवाळी, पाडवा, भाऊबीज झाल्यानंतर शेतकरी तज्ञांना अंतरवालीमध्ये बोलवून त्यांच्याशी चर्चा करू. त्यानंतर राज्याची बैठक घेऊन आंदोलनाची तारीख जाहीर करू.

Jagdish Pansare

  1. सरकारने दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन दिले होते, परंतु ते पूर्ण न झाल्याने मनोज जरांगे पाटील संतप्त झाले आहेत.

  2. जरांगे पाटील यांनी सरकारवर फसवणुकीचा आरोप करत दिवाळीनंतर आंदोलन छेडण्याची घोषणा केली आहे.

  3. मराठवाड्यातील शेतकरी अडचणीत असताना सरकारच्या निष्क्रियतेवर जरांगे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Affected Farmers News : मराठवाड्यासह राज्यातील अतिवृष्टी आणि पूरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारने 32 हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले. दिवाळीपुर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील,असा शब्द दिला. पण तो खोटा ठरला, अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे आले नाहीत, असा आरोप मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला.

दिवाळीत शेतकऱ्यांना दिलासा देणं गरजेचं होतं. पण हेच नाही यापुर्वीच्या सत्तर वर्षातील सरकारनेही सातत्याने शेतकऱ्यांवर अन्यायच केला आहे. आता शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी आपला सन्मान बाजूला ठेवून रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे. सरकारचे कपडे फाडल्याशिवाय शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही. दिवाळीनंतर राज्यातील शेती क्षेत्रातील तज्ञांना अंतरवाली सराटीत बोलवून त्यांच्याशी चर्चा करू. त्यानंतर शेतकऱ्यांची एक बैठक घेऊन आंदोलनाचा निर्णय जाहीर करू, असे मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.

रस्त्यावर येऊन सरकारचे कपडे फडावेच लागतील, त्याशिवाय आपल्याला न्याय मिळणार नाही. जसे 70 वर्षे गेले तसे आपल्या अनेक पिढ्या जातील. शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी आपण सर्वांनी आपला सन्मान सोडून द्यायचा आणि एकत्र यायचं, असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले. शेतकऱ्यांच्या खात्यात सरकारने दिलेला नुकसान भरपाईचा निधी आलाच नाही. शेतकऱ्यांवर संकट असताना त्यांना हातभार लावणे सरकारची जबाबदारी आहे. मात्र तात्पुरता आनंद देणारे हे सरकार आहे. 75 वर्षापासून हेच होत आलं आहे. दिवाळी, पाडवा, भाऊबीज झाल्यानंतर शेतकरी तज्ञांना अंतरवालीमध्ये बोलवून त्यांच्याशी चर्चा करू. त्यानंतर राज्याची बैठक घेऊन पुढील शेतकऱ्यांच्या आंदोलनाची तारीख जाहीर करू, असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले.

फडणवीस साहेब मराठ्यांचा विश्वास ढळू देऊ नका

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठीचा जीआर काढला. त्यामुळे फडणवीस साहेबांवरती मराठ्यांचा विश्वास बसला आहे. त्यांनी तो ढळू देऊ नये एवढीच अपेक्षा आहे. जीआर ओके आहे, थोडाफार बिघडला तरी तो दुरुस्त करण्याची जबाबदारी सरकारने घेतली आहे. पण तात्पुरता आनंद आपल्या जवळ जमत नाही. तुम्ही जीआर काढला त्याचा आम्ही कौतुक केलं. मात्र आता प्रमाणपत्र वितरित होणे गरजेचे असल्याचे जरांगे पाटील म्हणाले.

एकीकडे जीआरमुळे ओबीसींना धक्का लागत नाही म्हणायचं, त्यांना खुश करायचं आणि इकडे मराठा समाजाला सांगायचं तुम्हाला जीआर दिला म्हणजे ते खुश. हे मतदाना पुरतं आहे, हे माझ्याजवळ चालत नाही, असा टोलाही जरांगे यांनी सरकारला लगावला. 2 सप्टेंबरचा जीआरमुळे मराठवाड्यातील मराठा एक ना एक दिवस सगळा आरक्षणात जातो. बावनकुळे यांचे म्हणणं आहे कि पाच जिल्ह्यांसाठी जीआर, पण मराठवाड्यात पूर्वी पाचच जिल्हे होते ते आता आठ झाले. मराठ्यांनी दमा दमाने जावे, ही माझी अपेक्षा आहे, असेही ते म्हणाले.

FAQs

1. मनोज जरांगे पाटील यांनी काय आरोप केले?
त्यांनी सरकारवर शेतकऱ्यांना दिलेला मदतीचा शब्द खोटा ठरल्याचा आरोप केला आहे.

2. जरांगे पाटील आंदोलन केव्हा सुरू करणार आहेत?
दिवाळीनंतर सरकारविरोधात आंदोलन सुरू करण्याची त्यांनी घोषणा केली आहे.

3. शेतकऱ्यांना कोणत्या प्रकारची मदत अपेक्षित होती?
दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी आर्थिक पॅकेज आणि कर्जमाफीची अपेक्षा होती.

4. जरांगे पाटील कुठल्या प्रदेशाचे नेतृत्व करतात?
ते मराठवाडा प्रदेशातील आंदोलनकर्ते आणि मराठा आरक्षण चळवळीचे प्रमुख आहेत.

5. या आंदोलनाचा सरकारवर काय परिणाम होऊ शकतो?
राजकीय वातावरण तापण्याची शक्यता असून, सरकारवर शेतकरी मदतीसाठी दबाव वाढू शकतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT