Marathwada Politics News: मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पाचशे कोटींचा ऑडिओ क्लीप बाॅम्ब टाकल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. सत्ताधारी पक्षांनी ही ऑडिओ क्लीप एआयवर तयार केली असल्याचा व त्यामागे खासदार संजय राऊत असल्याचा आरोप केला आहे. तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांनी आपण बाहेर काढलेली क्लीप खरी आहे, म्हणूनच ती एआयची असल्याचा कांगावा केला जात असल्याचे सांगत आपल्याकडे आणखी चार ऑडिओ क्लीप असल्याचा दावा करत खळबळ उडवून दिली आहे.
बीडमध्ये एका खाजगी समारंभात सहभागी झालेल्या मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्यावर विदेशात संपती ठेवल्याच्या आरोपांची खिल्ली उडवली. माझं लफडं हाय का, तर हाय! दुसरं लग्न करायलाही तयार असल्याचे सांगत विरोधकांची फिरकी घेतली. मनोज जरांगे पाटील आणि त्यांचे सहकारी गंगाधर काळकुटे यांच्यावर परदेशात संपत्ती असल्याचा आणि आंदोलनासाठी परदेशातून फंडिंग झाल्याचा गंभीर आरोप त्यांचे जुने सहकारी अमोल खुणे यांनी केला होता.
या आरोपांना जरांगे पाटील यांनी मिश्किल शैलीत प्रत्युत्तर दिले आहे.माझ्याकडे बरंच काही आहे, पण शेतात खड्डे पाडावे लागले असते, म्हणून ती संपत्ती परदेशात ठेवली, अशा शब्दात त्यांनी आरोप करणाऱ्यांना सुनावले. 'माझं लफडं आहे का, तर आहे, तू आणून दे, मी दुसरं लग्न करायलाही तयार आहे. मात्र, या लग्नाचा आणि संसाराचा खर्च आपापला करायचा, कारण माझ्याकडे काहीच नाही, असं म्हणत जरांगे पाटील यांनी विरोधकांकडून होणाऱ्या आरोपांची खिल्ली उडवली.
आपल्याविरोधात गैरसमज पसरवण्यासाठी सध्या एआय (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) चा वापर करून प्रयोग सुरू आहेत, पण त्याचा काहीही उपयोग होणार नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपण काहीही घेतले नसल्याचे जाहीर केले आहे, त्यामुळे आता संबंधितांनी यावर पाहावे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कदाचित या प्रकरणाची माहिती नसावी, कारण ते कोणाला पाठीशी घालतात असे सध्या तरी वाटत नाही, असे जरांगे पाटील म्हणाले.
भाजप हे आंदोलन संपवू पाहत आहे का? असा सवाल करत यामागे मोठी संस्था आणि ताकद कार्यरत असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. ब्राह्मणांच्या संदर्भातील वक्तव्यावर बोलताना त्यांनी या विषयात ब्राह्मण समाज कुठे येतो, असा प्रश्न उपस्थित केला. परदेशात माझा काळा पैसा आहे आणि तो मोदी साहेब आणून वाटप करणार आहेत का? असा चिमटा काढतानाच मराठा समाजाच्या महिलांच्या इज्जतीशी खेळाल किंवा अनादर कराल, तर आम्हालाही ज्या त्या भाषेत उत्तर द्यावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.