Maratha Reservation : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे 17 सप्टेंबर 2026 रोजी पहाटे उपोषण स्थगित केले होते. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी त्यांनी 29 ऑगस्ट 2026 पासून बेमुदत उपोषण सुरू केले होते. हे उपोषण सलग 20 दिवस चालले. सरकारला 90 दिवसांची मुदत देत त्यांनी पुन्हा एक संधी दिली होती. डिसेंबर महिन्यात ही मुदत संपणार आहे. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी येत्या 7 डिसेंबर पासून महाराष्ट्राचा दौरा करणार असल्याची घोषणा केली आहे.
या दौऱ्यात कुठलीही सभा, बैठक, भाषण होणार नाही. केवळ कुणबी नोंदी संदर्भात येणाऱ्या अडचणी, समातील विद्यार्थ्यांना शिक्षणात येणाऱ्या अडचणी, जे विद्यार्थी बाहेर शिकायला गेले आहेत, त्यांचे प्रश्न यावर चर्चा करण्यासाठीच आपला हा दौरा असणार आहे, असे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. आपला हा राज्य दौरा केवळ कुणबी नोंदी, प्रमाणपत्र मिळाले की नाही? वैधता, नोंदी शोधण्याचे काम सुरू आहे की नाही? असे विषय घेऊनच लोकांनी यावे, असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले आहे.
महाराष्ट्र दौऱ्याचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल, दोन-तीन किंवा वेळ पडल्यास चार टप्प्यात हा दौरा करण्याचे नियोजन सुरू असल्याचे जरांगे पाटील यांनी सांगीतले. सरकारला दिलेली मुदत संपण्यापुर्वीच मनोज जरांगे पाटील राज्याचा दौरा करणार असल्याने ही त्यांच्या पुढील आंदोलनाची तयारी असल्याचे बोलले जात आहे.पाचशे कोटी रुपये मनोज जरांगे पाटील यांना एकनाथ शिंदे यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्फत दिल्याचा दावा करणाऱ्या कथित ऑडिओ क्लीपनंतर राज्यात खळबळ उडाली होती.
भाजपाच्या नेत्याने हा दावा केल्याचे ऑडिओ क्लीपचा दाखला देत जरांगे पाटील यांनी केला होता. याची चौकशी एसआयटीकडून सुरू आहे, तसेच ऑडिओतील आवाजांची तपासणी आणि सत्यता तपासण्याठी फॉरेन्सीक लॅबमध्ये तपासणी केली जाणार आहे. एकीकडे ही चौकशी सुरू आहे, तर दुसरीकडे कुणबी प्रमाणपत्र, हैदराबाद गॅझेट, औंध, सातारा, कोल्हापूर गॅझेट लागू करण्याची मागणी यासाठी सरकारला दिलेली तीन महिन्यांची मुदत पुढील महिन्याच्या 17 तारखेला संपणार आहे.
या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी घोषित केलेल्या महाराष्ट्र दौऱ्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. तुर्तास या दौऱ्यात कुठलेही भाषण, बैठका, सभा होणार नाही, केवळ कुणबी प्रमाणपत्रांसदर्भात येणाऱ्या अडचणींवरच चर्चा होणार असल्याचे जरांगे पाटील यांनी सांगीतले आहे. त्यामुळे जरांगे पाटील या दौऱ्यात नेमकी काय भूमिका घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
17 सप्टेंबर रोजी पहाटे सरकारच्या शिष्टमंडळाशी चर्चा झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला त्यांनी मागण्या पूर्ण करण्यासाठी तीन महिन्यांची म्हणजेच 90 दिवसांची मुदत दिली. या मुदतीत मागण्यांची पूर्तता न झाल्यास पुन्हा मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा दिला. उपोषण स्थगित केले असले तरी आंदोलन सुरूच राहील, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली होती.