Manoj Jarange Audio Clip Controversy : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी ऑडिओ क्लिप प्रकरणावरून भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.
विशेषतः एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना, ‘आम्ही शिंदे साहेबांसाठी जीवाचे रान केले, हीच आमची चूक आहे का?’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला. संबंधित ऑडिओ क्लिप खरी असल्याचा दावा करत, ती दाबण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही जरांगे यांनी केला.
मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आज तातडीने पत्रकार परिषद घेत ऑडिओ क्लिप प्रकरणावरून भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मराठा समाजाच्या पाठिंब्यामुळे एकनाथ शिंदे यांना सत्तेवर आणण्यासाठी प्रयत्न केले; मात्र आता त्यांच्याच काळात समाजाला त्रास सहन करावा लागत असल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली.
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर टीका करताना जरांगे यांनी मराठा समाजातील लोकांना वाऱ्यावर सोडल्याचा आरोप केला. तसेच, आपल्या विरोधात आणि मराठा समाजाच्या विरोधात षडयंत्र रचले जात असल्याचा दावाही त्यांनी केला. समाजाचे इमानदारीने काम करणे किती घातक आहे, हे राज्याला कळले पाहिजे. आपलेच सरकार आपल्याला किती त्रास देते, हेही समोर आले पाहिजे. मी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास ठेवला आहे, असे जरांगे म्हणाले.
ऑडिओ क्लिप प्रकरणात पडद्यामागे हालचाली सुरू असल्याचा दावा जरांगे यांनी केला. ‘माझ्या कानावर कुजबुज येत आहे. पडद्यामागे नियोजन सुरू आहे. ही क्लिप काहीही करून खोटी ठरवायची, असे प्रयत्न सुरू आहेत,’ असे ते म्हणाले. या प्रकरणाची अधिक माहिती लवकरच समोर येईल, असा दावाही त्यांनी केला.
भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेत सुरुवातीला या क्लिपवरून आरोप-प्रत्यारोप सुरू होते; मात्र आता दोन्ही बाजूंमध्ये अचानक समझोता कसा झाला, असा सवाल जरांगे यांनी उपस्थित केला. क्लिपमधील संभाषण खरे असल्यामुळेच दोन्ही बाजूंमध्ये सुरुवातीला वाद झाला होता, असा दावाही त्यांनी केला.
ऑडिओ क्लिप प्रकरणात विविध नेत्यांची नावे पुढे येत असताना, जरांगे यांनी या प्रकरणाचा संबंध मराठा आंदोलनाशी जोडला. एकनाथ शिंदे यांनी पैसे घेतले नसतील आणि देवेंद्र फडणवीस यांना या प्रकरणाची माहिती नसेल, तर संबंधित संभाषण करणाऱ्या पाच-सहा व्यक्तींना नेमके काय साध्य करायचे होते, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मराठा समाज आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न झाला होता का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. या प्रकरणामागे मराठा समाजाचे आंदोलन मोडण्याचे षडयंत्र असल्याचा आरोप जरांगे यांनी केला.
भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेतील नेत्यांनी या प्रकरणावर एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप का थांबवले, असा सवाल करत त्यांनी पडद्यामागील घडामोडींविषयी संशय व्यक्त केला. दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ होतो, असा इशाराही त्यांनी दिला. या ऑडिओ क्लिपमुळे मुंबई आणि दिल्लीतील राजकीय घडामोडींना वेग आल्याचा दावाही जरांगे यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.