MLA Sanjay Shirsat-Manoj Jarange Patil News Sarkarnama
मराठवाडा

MLA Sanjay Shirsat News : सरकारने मराठा समाजाच्या हिताचे निर्णय घेतले, जरांगे पाटलांनी आमच्या पाठीशी उभे राहावे..

Jagdish Pansare

योगेश पायघन

Maharashtra Assembly Election 2024 : महायुतीतील पक्षांच्या उमेदवारांची यादी पुढील तीन दिवसात जाहीर होईल. शिवसेनेची यादी दोन टप्प्यात जाहीर होईल. अजून कुणालाही कोणतेही संकेत दिलेले नाहीत. त्यामुळे याला जागा सुटणार, याचे तिकीट कापणार यावर यादी आल्याशिवाय विश्‍वास ठेवू नका. लोकसभा निवडणुकीत `मविआ`ने खोटा नरेटिव्ह पसरवला होता, लोकांना ते आता लक्षात आले आहे. मराठा समाजाच्या हिताचे सरकारने जे काही निर्णय घेतले आहेत, ते पाहता मनोज जरांगे पाटील यांनी महायुती सरकारच्या पाठीशी उभे राहावे, अशी विनंती शिवसेनेचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी केली.

महायुतीच्या जागा वाटपासाठी वरिष्ठ पातळीवर जोरदार हालचाली सुरू आहेत. अशातच अफवांचे पीकही मोठ्या प्रमाणात येत आहे. या पार्श्वभूमीवर (Sanjay Shirsat) संजय शिरसाट यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शिवसेना आणि मित्र पक्षातील विविध घडामोडीवर संजय शिरसाट यांनी यावेळी भाष्य केले. निवडणुक जाहीर झाल्यानंतर मराठवाडा पदवीधरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतीश चव्हाण यांनी प्रसिद्धी पत्रक काढत महायुती सरकारलाच घरचा आहेर दिला होता. यावर शिरसाट यांनी चव्हाण यांना सुनावले.

गंगापुरातील विकास कामांसाठी अजित पवारांकडून करोडोंचा निधी आणला. त्यांच्या हाताने उद्घाटने करून घेतली, हा निधी राज्य शासनाचा आहे. ती जागा भाजपाची आहे. तूम्ही तयारी केली ठीक आहे, पण तिकीटापुरते बोला. सरकारवर टिका करणे त्यांना शोभत नाही, त्यांनी असे वक्तव्य करू नये, असा सल्ला शिरसाट यांनी चव्हाण यांना दिला. तर डॉ. राजेंद्र शिंगणे हे पहिल्यापासून अनबॅलन्स आहेत. अशा लोकांचा काही भरवसा देता येत नाही असा टोला शिरसाट यांनी लगावला.

महायुतीने केलल्या कामाचे रिपोर्ट कार्ड महाराष्ट्रासमोर ठेवले आहे. पाच वर्षाच्या कालावधीत केलेल्या कामाची माहिती देणे सत्ताधारी पक्षांचे काम आहे. मात्र महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेत नेहमीप्रमाणे टोमणे मारले, पण सत्ता असताना केलेली कामे मात्र सांगितली नाही. (Manoj Jarange Patil) लोकसभा निवडणुकीत महायुतीला फटका बसला, यावर बोलतांना लोकसभेला जो परिणाम झाला तो चुकीच्या नरेटीव्ह मुळे झाला, शिवाय जरांगे फॅक्टरमुळेही फटका बसला. मात्र आता परिस्थिती बदलली आहे, असा दावाही शिरसाट यांनी केला.

धारावीचे टेंडर काढणारे तुम्ही अन् सुधारणा आम्ही केल्या. आणि आता पुन्हा प्रश्नही तुम्ही विचारता आहात. महायुतीला बदनाम करण्याचा हा प्रयत्न असल्याचे शिरसाट म्हणाले. इतरवेळी टीका करणारे महाविकास आघाडीचे नेते शेतकरी, बेरोजगारी, कामगारांच्या प्रश्‍नावर का बोलत नाहीत? आरक्षणाचा मुद्दा का काढत नाही ? आरक्षणाच्या विषयावर बोलले तर अंगलट येईल, लोक विरोधात जातील, अशी भिती त्यांना सतावते, असा चिमटा शिरसाट यांनी काढला.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर शिरसाट यांनी भाष्य केले. ते कुठे जाऊ नये म्हणून शरद पवारांनी त्यांना अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री पदाचा दावेदार घोषित करून टाकले आहे. रोहित पवार यांच्यामुळे जयंत पाटलांची पक्षात घुसमट होत आहे. पण पवारांनी अशी काही खेळी केली की आता रोहित पवार यांना च्विंगम चावत बसावे लागणार आहे, असा टोला शिरसाट यांनी लगावला.समीर वानखेडेंच्या विधानसभा निवडणूक लढवण्यावरून काँग्रेसने समीर वानखेडेंचे काळे पैसे आता बाहेर येतील, अशी टीका केली होती.

यावर असे म्हणणाऱ्या कॉंग्रेसच्या पुढाऱ्यांना पैशावाले काळायला लागले. त्यांनी आणि पवारांनी त्यांच्या नेत्यांची यादी घेवून त्यात गोरगरीब आहेत का ते बघावे? तळागाळातील व्यक्तींना केवळ बाळासाहेब ठाकरे यांनी मोठे केले. महायुती काय काम करते याची जाणीव श्‍याम मानव यांना झाली आहे. सरकारने काढलेल्या योजनांवर टीका केल्याने तुम्ही मागे जाल, असा सल्ला ते देत आहेत. मात्र, निवडणूकीपुरता वापर करण्यासाठी काँग्रेसने मानव यांना बाहेर काढले आहे, अशी टीका शिरसाट यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT