Manoj Jarange- Patil Rally News Sarkarnama
मराठवाडा

Manoj Jarange Rally In Antarwali : अंतरवालीच्या सभेत आठशे भोंग्यांतून घुमणार जरांगेंचा आवाज...

Jagdish Pansare

Maratha Reservation News : मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारला दिलेली एक महिन्याची मुदत उद्या १४ ऑक्टोबर रोजी संपत आहे. (Maratha Protest News) ही डेडलाइन संपल्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे भव्य सभा घेण्याची घोषणा केली होती. दरम्यान, मराठवाड्यासह राज्याच्या विविध भागात जरांगे यांनी दौरा करून मराठा समाजाला एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या सभांना मिळालेला प्रतिसाद राजकारण्यांना धडकी भरवणारा होता.

123 गावांतील मराठा समाज बांधव सभेच्या तयारीत

अंतरवालीत उद्या होणाऱ्या सभेकडे केवळ राज्याचेच नव्हे तर दिल्लीतील नेत्यांचेही लक्ष लागले आहे. शंभर एकरांवर होणारी ही सभा येणाऱ्या गर्दीचा अंदाज घेऊन आता तब्बल अडीचशे एकरांवर होत आहे. (Maratha Reservation) गेल्या दोन आठवड्यांपासून या सभेची तयारी जालना जिल्ह्यातील 123 गावांतील मराठा समाज बांधव, गावकरी आणि कार्यकर्ते करत आहेत. (Jalna) मराठा आरक्षणासाठी निघालेल्या मोर्चांनी राज्यात एक इतिहास निर्माण केला होता, त्याच इतिहासाची पुनरावृत्ती उद्याच्या अंतरवालीतील सभेत पाहायला मिळणार आहे.

शिडशिडीत बांध्याच्या जरांगे पाटील नावाच्या तरुणाने मराठा समाजावर केलेल्या गारुडाचे दर्शन उद्याच्या सभेतही घडणार आहे. राज्यभरातून लाखो मराठा समाज बांधव अंतरवालीच्या दिशेने निघाले असून, मिळेल त्या वाहनाने या ऐतिहासिक लढ्यासाठी होत असलेल्या सभेचे साक्षीदार ते होणार आहेत. (Marathwada) या जाहीर सभेसाठीची जय्यत तयारी विविध मराठा संघटनांकडून करण्यात आली आहे. सभेसाठी येणाऱ्या वाहनांची पार्किंग, पिण्यासाठी पाण्याचे टँकर, रुग्णवाहिका, अग्निशमन वाहने आणि सभेला येणाऱ्या प्रत्येकाची काळजी घेण्यासाठी दहा हजार मराठा तरुण स्वयंसेवकांची फौज सज्ज असणार आहे.

'आरक्षण घेतल्याशिवाय शांत बसणार नाही'

सभेस्थळी होणारी गर्दी लक्षात घेता प्रत्येकाला मनोज जरांगे पाटील यांचे भाषण व्यवस्थित ऐकता यावे, दिसावे यासाठी मैदानात ३५ मोठे एलईडी स्क्रीन, ८०० भोंगे, आठ पॉवर स्पीकर लावण्यात आले आहेत. या ८०० भोंग्यांतूनच मराठा आरक्षणाचा लढा जरांगे पाटील पंचक्रोशीत पोहोचवणार आहेत. अंतरवाली सराटीत उद्या होणाऱ्या या भव्य दिव्य अशा जाहीर सभेत जरांगे पाटील तब्बल एक तास भाषण करणार आहेत.

मराठा आरक्षण घेतल्याशिवाय समाज आता शांत बसणार नाही, असा इशारा उद्याच्या सभेच्या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील यांनी दोन दिवसआधीच अंतरवालीत दाखल झालेल्या मीडियाच्या माध्यमातून सरकारला दिला आहे. दुसरीकडे एक महिन्याची मुदत दिलेल्या जरांगे पाटील यांनी सरकारला दहा दिवस अतिरिक्त दिले आहेत. त्यामुळे उद्याच्या सभेनंतर मराठा समाजातून काय प्रतिक्रिया उमटतात? त्यावर राज्य सरकारकडून या अतिरिक्त दहा दिवसांमध्ये ठोस निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT