Chhatrapati Sambhajinagar : राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यांवरून राजकीय आणि सामाजिक वातावरण तापलेलं आहे. मनोज जरांगे आणि छगन भुजबळ हे दोन्ही नेते आपल्या समाजाच्या आरक्षणासाठी आक्रमक झाले असून, त्यांनी राज्यभरात सभांचा धडका सुरू केला आहे. या सभांमधून ते एकमेकांना जोरदार टीका करतानाही दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर हिंगोली येथील सभेतून भुजबळांनी जरांगेंवर केलेल्या टीकेला, मनोज जरांगे यांनीही प्रत्युत्तर दिले आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना जरांगे म्हणाले, '' जर बोलायचं समजत नसेल तर मग तुमचे केस पांढरे होऊन उपयोग काय? एका समाजाविषयी आकस बाळगून गरळ ओकायची. कायद्याच्या पदावर बसायचं आणि अशी भाषा बोलायची. मग तुमचे केस पांढरे होऊन काय उपयोग?''
तसेच, ''जोडायला अक्कल लागते अन् तोडायला लागत नाही. मग हे अगोदर कळायला पाहिजे होतं. हे अगोदरच समजायला पाहिजे होतं की मराठ्यांनी तुम्हाला कसं जोडलं होतं, कसं मोठं केलं होतं. मराठ्यांनी तुम्हाला किती प्रतिष्ठेच्या पदावर बसवलं, किती उंचीवर नेऊन ठेवलं. मात्र तुम्ही त्यांना आता तोडलं आहे. आता तोडायची आणि जोडायची भाषा तुमच्या तोंडात कुठं शोभते?'' असंही जरांगे म्हणाले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
याशिवाय ''आंतरवालीत महिलांवर एवढा मोठा हल्ला झाला, परंतु ते इथे अश्रू पुसायला येऊ शकले नाहीत. क्षीरसागर कुटुंबाचा तुम्हाला आता पुळका आला, तोही आरक्षणासाठी. मात्र तुम्ही त्यांची बरोबरी करूच शकत नाहीत. तुम्ही त्यांचा आदर्श जरा घ्यायला हवा, केवळ गरळ ओकू नका. तुम्हाला केवळ स्वत:चा स्वार्थ कळला आहे. तुमच्या हेकेखोरपणामुळे तुम्ही सगळे पक्ष मोडीत आलात, शेवटी स्वत:चा संसार, घरही मोडलं.'' असा आरोपही जरांगे यांनी भुजबळांवर केला.
याचबरोबर ''ओबीसींना आरक्षण देऊ नका असं आम्ही कधीच म्हणालो नाही. आज सत्तेत कोण आहेत? तुम्हीच आहात. तुम्हाला काय हवं ते घ्या, आम्ही कधी विरोध केला नाही. ते बीडला गेले तर आंतरवालीत का आले नाहीत? इथे त्यांच्या माता-भगिनी नव्हत्या का? ही जनता नाही का?
झुंडशाही आमची की त्यांची, त्यांचेच पाहुणे त्यांचेच हॉटेल्स जाळतात. हॉटेल जाळणारा त्यांचाच पाहुणा आहे. एफआयआर आहे तसा. त्यांचंच हॉटेल त्यांनीच जाळलेलं आहे, मराठ्यांचं आंदोलन बदनाम करण्यासाठी. धनगर बांधवांच्या आरक्षणाबाबत त्यांनी अजूनही भूमिका स्पष्ट केलेली नाही. ते केवळ वापर करून घेणार आहेत, अजूनही बाकीच्यांनी सावध व्हावे.'' असं यावेळी जरांगेंनी बोलून दाखवलं.
भुजबळांनी मागणी केली आहे की शिंदे समिती बरखास्त करा आणि ज्या नोंदी सापडल्या आहेत त्या रद्द करा, यावर बोलताना जरांगे म्हणाले ''कुणबी प्रमाणपत्र रद्द होतच नसतात, आमचं जर रद्द झालं तर तुमचंही सगंळ आपोआप रद्द होईल. हा काही इशारा नाही, पण माझ्या शासकीय नोंदी आहेत. तुमच्या तर नोंदी वैगेरे काहीच नाही, मग तुम्हाला कसं काय ओबीसीत घेतलं? जर नोंदी आणि मागास असेल तरच ओबीसीत घेतलेलं आहे, तुम्ही तर दोन्ही नाहीत.
आम्हाला जर आव्हान मिळत असेल तर मग तुम्हाला तर न्यायालय त्वरीत निकाली काढेल. आमच्या नोंदी आहेत, आम्हाला त्यामधून कोणीच बाहेर काढू शकत नाही. अगदी सरकारही नाही. कारण, कायदाच सांगतो की ज्यांच्या शासकीय नोंदी आहेत त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. मराठा आरक्षणात येणारच.'' असा विश्वास जरांगेंनी व्यक्त केला.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.