Ambadas danve On CM Devendra fadnavis News sarkarnama
मराठवाडा

Ambadas Danve On Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस तेव्हा आणि आत्ता! मराठा आरक्षणावर अंबादास दानवेंकडून जुना व्हिडिओ पोस्ट करत कोंडी..

Devendra Fadnavis on Maratha reservation, criticizing his past and present stance. : 'वेअर देअर इज अ व्हील, देअर इज अ वे, वेअर देअर इज नो व्हिल, देअर इज नो वे', अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि तत्कालीन आघाडी सरकारच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला होता.

Jagdish Pansare

Shivsena UBT News : ओबीसीतून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत बेदमुत उपोषण सुरू केले आहे. संपूर्ण मुंबई लाखो मराठ्यांच्या गर्दीने ठप्प झाली आहे. सरकारची चोहोबाजूंनी कोंडी होत असताना विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी आताचे मुख्यमंत्री आणि तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा एक जुना व्हिडिओ पोस्ट करत त्यांची कोंडी केली आहे.

राज्यात महाविकास आघाडी सरकारची सत्ता आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना तेव्हाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या सरकारची मराठा समाजाला आरक्षण देण्याची इच्छा नसल्याचे सांगत केवळ वेळ मारून नेण्यासाठी सर्व्हे आणि रिपोर्टचे नाटक केले जात असल्याची टीका केली होती. याच टीकेचा व्हिडिओ अंबादास दानवे यांनी एक्सवर पोस्ट करत फडणवीस यांनी आता भूमिका कशी बदलली? यावर बोट ठेवले. आता मर्यादा ओलांडण्यासाठी सरकारचे पाय कोणी बांधले आहेत हे सांगा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, असा सवाल दानवे यांनी केला आहे.

तुमच्या पक्षाच्या एका शाखेच्या प्रमुखाने मुख्यमंत्री असताना शिवरायांची शपथ घेतली होती! अश्या गोष्टी आपण सोयीस्करपणे विसरता, म्हणून आठवण करून दिली, असा टोला दानवे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता लगावला. तुम्ही या व्हिडिओत सांगितलेल्या इंग्रजी म्हणीत दोन शब्द कमी आहेत, ते म्हणजे कमिटी आणि सब-कमिटी. या दोन्ही बाबी आपण करून ठेवल्या आहेतच! यातून आपली इच्छा शक्ती स्पष्टपणे दिसुन येते. आता मर्यादा ओलांडण्यासाठी सरकारचे पाय कोणी बांधले आहेत हे सांगा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अशा शब्दात अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी निशाणा साधला.

9 आॅगस्ट 2021 रोजी तत्कालीन राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीवरून महाविकास आघाडी सरकार व तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. मराठा आरक्षण देण्यासाठी आरक्षणाची 50 टक्के मर्यादा ओलांडण्याचा अधिकार राज्यांना आहे. केवळ अपवादात्मक परिस्थिती सिध्द करावी लागेल. माझे स्पष्ट मत आहे की, वेळ काढण्याचं धोरण आहे. यांच्या मनात मराठा आरक्षण देणं नाहीये.

अपवादात्मक परिस्थिती सिद्ध करण्याचा अधिकार राज्यालाच आहे. ज्याला करायचं नसतं ना तो असं करत असतो. बघा असं म्हणतात ना, 'वेअर देअर इज अ व्हील, देअर इज अ वे, वेअर देअर इज नो व्हिल, देअर इज नो वे', अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि तत्कालीन आघाडी सरकारच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला होता. आता चार वर्षानंतर राज्यात पुन्हा मराठा आरक्षणावरून तीच परिस्थिती निर्माण झाली आहे.

या पार्श्वभूमीवर अंबादास दानवे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा जुना व्हिडिओ पोस्ट करत त्यांच्या सरकारने कशी पलटी मारली आहे, याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. मराठा कुणबी एक आहेत, याची अंमलबजावणी, हैदराबाद गॅझेटियर लागू करा, सातारा, बाँबे गॅझेटियर लागू करा, ज्याची कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्यांच्या सगे सोयरे पोट जात म्हणून घ्या, मराठा आंदोलकांवरील सरसकट गुन्हे मागे घ्या, आमचं कायद्यात बसणारे आरक्षण द्या, या मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच्या आझाद मैदानात बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT