Jyoti Mete urges Manoj Jarange Patil to end his hunger strike Sarkarnama
मराठवाडा

Joyti Mete Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाचा हट्ट सोडावा, उपोषणाची सांगता करा, शिवसंग्रामच्या ज्योती मेटे यांचे आवाहन!

Jyoti Mete on Manoj Jarange Hunger Strike : ज्योती मेटे यांनी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडून सांगता करावी, असे आवाहन केले. सरकारने १५ पैकी १२ मागण्या मान्य केल्याचे सांगत त्यांनी संवादाचा मार्ग स्वीकारण्याचे आवाहन केले.

सरकारनामा ब्यूरो

Jyoti Mete Manoj Jarange Latest News : पंधरा पैकी​ बारा मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. त्यामुळे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आता उपोषणाचा हट्ट सोडून आनंदाने सांगता करावी, असे आवाहन शिवसंग्रामच्या ज्योती मेटे यांनी केले. छत्रपतींच्या पुतळ्यासमोर अपशब्द बोलणे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभा देत नाही, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

मराठा आरक्षणाच्या पेटलेल्या रणधुमाळीत आता एक अत्यंत वेगळा आणि संवेदनशील राजकीय सूर उमटला आहे. मराठा आरक्षणाचा लढा तीव्र करत मुंबईच्या दिशेने कूच करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेवर शिवसंग्रामच्या अध्यक्षा ज्योती मेटे यांनी अत्यंत रोखठोक, पण त्याच वेळी जरांगेंच्या प्रकृतीची काळजी व्यक्त करणारा सल्ला दिला आहे.

राज्य सरकारने जरांगे यांच्या १५ पैकी तब्बल १२ मागण्या पूर्णपणे मान्य केल्या आहेत. सरकारची बाजू कायदेशीरदृष्ट्या योग्य असताना आता उपोषण ताणून धरण्याचा आणि मुंबईला जाण्याचा हट्ट कशासाठी? असा थेट सवाल करत जरांगेंनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेऊन या उपोषणाची आनंदाने सांगता करावी, असे आवाहन त्यांनी केले.

बीड येथे आयोजित पत्रकार परिषदेत ज्योती मेटे यांनी मराठा आरक्षण आणि आरक्षणाच्या कायदेशीर बाजू मांडत जरांगे यांच्या आंदोलनाच्या पद्धतीवर नाराजी व्यक्त केली. आंदोलनातील भाषेच्या घसरलेल्या पातळीवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. महाराष्ट्रावर राष्ट्रमाता जिजाऊंचे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे थोर संस्कार आहेत. मराठा समाजाला हक्काचे आरक्षण मिळावे यासाठी लढा नक्कीच उभारला पाहिजे, त्याला आमचा पूर्ण पाठिंबा आहे.

साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याशेजारी बसून शिवीगाळ करणे किंवा अपशब्द वापरणे हे अत्यंत चुकीचे, निंदनीय आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीला कलंक लावणारे आहे. शिवसंग्राम पक्षाने २०१४ पासून दिवंगत विनायकराव मेटे यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी सातत्याने रस्त्यावर उतरून लढा दिला आहे.

आरक्षणाच्या कायदेशीर चौकटीचा विचार करता, राज्य सरकारने सध्याच्या परिस्थितीत घेतलेले निर्णय पूर्णपणे योग्य आहेत. शिंदे समितीच्या माध्यमातून ५८ लाख २६ हजार ८६८ नोंदी शोधून काढण्याचे मोठे काम सरकारने केले आहे. जेव्हा शासन चर्चेचे दरवाजे उघडे ठेवून १२ मागण्या मान्य करते, तेव्हा आंदोलकांनी अडमुठे धोरण सोडून संवादाचा मार्ग स्वीकारायला हवा.

आरक्षणाच्या या संघर्षात मी माझे कुंकू गमावले आहे. मराठा समाजाचे दुःख आणि वेदना काय असतात, हे माझ्यापेक्षा वेगळे कोणाला ठाऊक असणार? मराठा बांधवांना किंवा जरांगे पाटलांना कोणताही त्रास होऊ नये, हीच आमची प्रामाणिक इच्छा आहे. जरांगे हे समाजाचे नेतृत्व करत आहेत, म्हणूनच त्यांच्या आरोग्याची आणि जीवाची काळजी वाटणे स्वाभाविक आहे. त्यामुळेच सरकारने दिलेले यश स्वीकारून आणि कायदेशीर बाबी तपासून त्यांनी उपोषण सोडावे आणि पुढची वाटचाल करावी, असे भावनिक आवाहन त्यांनी केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT