Maratha Reservation Protest News Sarkarnama
मराठवाडा

Maratha Reservation : गावागावांत आमदार, खासदारांना गावबंदी; फलक ठरताहेत लक्षवेधी...

Laxmikant Mule

Nanded Political News : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलेच तापले आहे. याचा फटका, मंत्री आमदार, खासदारांना बसत आहे. तरुणांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना लोकप्रतिनिंधीच्या नाकेनऊ येत आहेत. (Maratha Protest News) कसेबसे उत्तरं देऊन वेळमारून पळ काढावा लागत असल्याने लोकप्रतिनिधी सध्या हैराण झाले आहेत. नांदेड जिल्ह्यातील शेकडो गावांत आमदार, खासदारांना गावबंदीचे फलक लावण्यात आले आहेत.

याची धास्ती घेऊन गेला महिनाभरात मोठे राजकीय कार्यक्रम, सभा, समारंभ बंदच आहेत. चुलीत गेले राजकारणात म्हणत निषेध करत जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळत नाही तोपर्यंत खासदार, आमदारांना गावात प्रवेश नाही, असा इशारा फलकाच्या माध्यमातून ठिकठिकाणी दिला जात आहे. (Nanded) नांदेड जिल्ह्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून अनेक ठिकाणी मोर्चे, रास्ता रोको,आमरण उपोषण, साखळी उपोषण आदी मार्गांनी आंदोलने सुरू आहेत. यातून प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्याचे प्रयत्न केले जात आहेत.

जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथील आंदोलनानंतर मराठवाड्यात आरक्षणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. नांदेड जिल्ह्यातील मराठा समाजाचा शेती हाच प्रमुख व्यवसाय आहे.शेतीचे तुकडे होऊन हेक्टरवरची शेती गुंठ्यांत आली आहे. (Marathwada) शेतीतील उत्पादन कमी व खर्च जास्त, नापिकी, नैसर्गिक संकटे, शेतमालाला मिळणारा भाव या व या सारख्या असंख्य कारणांमुळे शेती न परवडणारी झाली आहे. शेतीवर अवलंबून असणारी संख्या वाढली. त्यामूळे सहाजिक‌ याचा आर्थिक ताण कुटुंबातील सदस्यांवर आला आहे.

शेतीच्या तुटपुंज्या उत्पन्नावर घरखर्च, शिक्षण, वैद्यकीय खर्च, सण, उत्सव साजरे करावे लागतात. अशा परिस्थितीत मराठा समाजातील विशेषःत तरुणांचा रोष राजकीय पुढाऱ्यांबद्दल वाढत आहे. राज्यातील प्रत्येक पक्षाचा झेंडा मराठा तरुणांनी खांद्यावर घेऊन प्रचार केला. आपल्या पक्षासाठी, नेत्यांसाठी जीवतोड काम केले. उभे आयुष्य पक्षांसाठी दिले ,पण आपल्या पदरात काय पडले? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सर्वच पक्षाने तरुणांचा भ्रमनिरास केला आहे, अशी भावना तरुणांमध्ये निर्माण झाल्याने गावबंदीचे फलक लावण्यात आले आहेत.

या फलकांची चर्चा जिल्हाभरात होत आहे. मराठा तरुणांच्या रोषाला माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पालकमंत्री गिरीश महाजन, कंधार लोह्याचे आमदार श्यामसुंदर शिंदे यांना सामोरे जावे लागले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी तुम्ही काय केले? पुढे काय करणार आहात? आधी आरक्षणाचे बोला, असा जाब नेत्यांना विचाराला जात आहे. आम्हला आमच्या हाक्काचे आरक्षण द्या, तेव्हा तुमचे ऐकून घेवू असे बोलही ऐकविले जात आहेत. मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागला नाही, तर येणाऱ्या काळात लोकप्रतिनिधींना गावोगावी जाऊन प्रचार करणे कठीण होणार आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT