Maratha Reservation News
Maratha Reservation News  Sarkarnama
मराठवाडा

Maratha Reservation News : सावेंना जमलं नाही, ते पालकमंत्री भुमरेंनी करुन दाखवलं..

सरकारनामा ब्युरो

Marathwada : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation News) मागणीचा प्रश्न दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण द्या, अशी नवी मागणी करत सकल मराठा समाजाच्या वतीने छत्रपती संभाजीनगरात १ मे महाराष्ट्र दिनापासून आंदोलन सुरू करण्यात आले होते. काल राज्याचे रोहयो तथा जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी आंदोलकांची भेट घेवून त्यांच्या मागणीनूसार मराठा आरक्षण व इतर मागण्यांवर संभाजीनगरातच बैठक घेवून सर्वांशी चर्चा करावी, ती मान्य करण्यात आली.

संदीपान भुमरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याशी चर्चा करून तसे लेखी पत्रच आंदोलकांना दिले आणि त्यानंतर हे आंदोलन थांबवण्यात आले. वारंवार मराठा आरक्षण व समाजाच्या इतर मागण्यांबाबत सरकारकडून दुर्लक्ष केले जाते असा आरोप करत सकल मराठा समाजाच्या आंदोलक महिलांनी आक्रमक भूमिका घेत आत्मदहनाचा इशारा दिला होता. हा विषय आणखी गंभीर होवू नये यासाठी पालकमंत्री (Guardian Minister) म्हणून भूमरे यांनी तातडीने पावले उचलत यशस्वी मध्यस्थी केल्याचे दिसून आले.

सहकार मंत्री अतुल सावे (Atul Save) यांनी देखील आंदोलकांची भेट घेवून त्यांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांशी भेट घडवून देतो असे आश्वासन दिले होते. तसेच आंदोलन मागे घ्यावे, अशी विनंती देखील केली होती. मात्र आंदोलकांनी सावे यांना प्रतिसाद न देता आंदोलन सुरूच ठेवले. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे, नरेंद्र पाटील यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी आंदोलकांची भेट घेवून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले.

परंतु मराठा आरक्षण आणि समाजाच्या इतर मागण्यांवर केवळ आश्वासने दिली जातात, मुंबईतील बैठकांमध्ये दिशाभूल केली जाते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी छत्रपती संभाजीनगर येथेच बैठक घेवून समाजाच्या प्रत्येक घटकाशी जाहीर चर्चा करावी, अशी इच्छा आंदोलकांनी पालकमंत्री भूमरे यांच्याकडे व्यक्त केली होती. त्यानंतर भुमरे यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करत बैठक छत्रपती संभाजीनगरातच घेण्याची विनंती केली.

त्याला शिंदे यांनी देखील तयारी दाखवली, त्यांच्या वतीने भुमरे यांनी आंदोलकांना लवकरच मुख्यमत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेवून इथेच तुमच्याशी चर्चा केली जाईल असे लेखी आश्वासन दिले. आंदोलाकांनी देखील भुमरे यांच्यावर विश्वास दाखवत पाचव्या दिवशी आंदोलन मागे घेतले. भुमरेंच्या या यशस्वी शिष्टाईची शहरात चर्चा होत असून सावेंना जमले नाही ते भुमरेंनी करून दाखवले असे बोलले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT