Beed News Sarkarnama
मराठवाडा

Maratha Reservation: बीडमधील घटनांची गृहविभागाकडून गंभीर दखल; जाळपोळ करणाऱ्यांवर 307 कलमांतर्गत गुन्हे दाखल होणार

Datta Deshmukh

Beed News: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर आंदोलन सुरू आहे. मात्र, काही ठिकाणी या आंदोलनाला हिसंक वळण लागलं आहे. सोमवारी बीड जिल्ह्यात जाळपोळीच्या घटना घडल्या. यामध्ये आमदार प्रकाश सोळंके, आमदार संदीप क्षीरसागर, जयदत्त क्षीरसागर यांच्या बंगल्याला आग लावण्यात आली.

यामुळे बीडमध्ये अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू करण्यात आली. आता जाळपोळ, दगडफेक व संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी वरिष्ठ पोलिस अधिकारी जिल्ह्यात दाखल झाले आहेत.

या अधिकाऱ्यांची व जिल्हा महसूल प्रशासनातील अधिकाऱ्यांची पोलिस अधीक्षक कार्यालयात बैठक झाली. दरम्यान, जाळपोळ व तोडफोड करणाऱ्यांची प्रशासनाने रात्रीपासूनच धरपकड सुरू केली आहे. बीड आणि माजलगाव येथील या प्रकरणात 50 हून अधिक संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.

यात पंचवीशीतल्यांची संख्या अधिक आहे. या प्रकरणात अगोदर जाळपोळ, तोडफोड व नुकसानीचे कलमे लावण्यात आली. मात्र, आता यामध्ये जिवे मारण्याच्या प्रयत्नाचे 307 कलम देखील वाढविण्यात आले आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सोमवारी माजलगाव येथे मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, या दरम्यान काही आंदोलक आमदार प्रकाश सोळंके यांच्या बंगल्यात शिरले आणि तोडफोड, जाळपोळ केली. तर बीडमध्येही सुरुवातील शासकीय कार्यालये बंद केल्यानंतर आंदोलकांनी बाजारपेठेत दगडफेक, टायर जाळणे असे प्रकार केले.

यानंतर विविध ठिकाणी जाळपोळ व तोडफोड केली. यानंतर रात्री उशिरा शहरात संचारबंदी लावण्यात आली. यानंतर पोलिसांनी संशयितांची धरपकड सुरू केली असून, शहरातून जवळपास ३५ ते ४० जणांना ताब्यात घेतले आहे. तसेच माजलगावमधून १० पेक्षा जास्त जणांना ताब्यात घेतले आहे.

वरिष्ठ पोलिस अधिकारी बीडमध्ये दाखल

बीड जिल्ह्यात घडलेल्या जाळपोळीच्या घटनानंतर मंगळवारी वरिष्ठ पोलिस अधिकारी बीडमध्ये दाखल झाले आहेत. यामध्ये अतिरिक्त पोलिस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) संजय सक्सेना, राज्यचे विशेष पोलिस महानिरीक्षक (अस्थापना) एम. मल्लिकार्जुन प्रसन्ना, छत्रपती संभाजी नगर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ.ज्ञानेश्वर चव्हाण यांच्यासह पुणे रेल्वेचे पोलिस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांच्यासह आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

या अधिकाऱ्यांसह पोलिस अधीक्षक कार्यालयात जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे, पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अपर जिल्हाधिकारी डॉ.त्रिगुण कुलकर्णी आदींची बैठक झाली. या बैठकीत जिल्ह्यात सोमवारी झालेल्या जाळपोळ व तोडफोडीचा आढावा घेण्यासह दाखल गुन्ह्यांत कोणती कलमे लावायची याबाबतही खल झाला.

तसेच आंदोलनाचा अचानक उद्रेक का झाला याचाही मागोवा घेण्याबात चर्चा झाली. याबरोबरच संशयितांची ओळख पटविणे, संबंध नसलेल्यांना त्रास होणार नाही, याचीही काळजी घ्यावी, अशा सूचना वरिष्ठांनी या वेळी दिल्या.

दरम्यान, बीडमध्ये स्थानिक पोलिस ठाण्यासह स्थानिक गुन्हे शाखेककडून कारवाई केली जात आहे. तर,माजलगावमध्ये पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे व अतिरिक्त पोलीस अधीक्षक पंकज कुमावत तळ ठोकून आहेत. दरम्यान, जाळपोळ व दगडफेक प्रकरणी सुरुवातीला या कलमांखाली गुन्हे नोंद करण्यात आले होते. नंतर गृहविभागाच्या सूचनेनंतर आता यात जिवे मारण्याच्या प्रयत्नाचे 307 हे कलम वाढविण्यात आले आहे.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT