Manoj Jarange Patil News  Sarkarnama
मराठवाडा

Manoj Jarange Patil News : तीच चर्चा, भाषा अन् आश्वासने ; जरांगे पाटील सरकारला मुदतवाढ देणार का... ?

Jagdish Pansare

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी सरकारला दिलेली डेडलाईन जवळ आल्यामुळे त्याआधीच राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. (Manoj Jarange Patil News ) जरांगे पाटील यांनी दुपारी रुग्णालयातून पत्रकार परिषद घेत उद्या, 17 रोजी अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाची बैठक घेऊन 24 नंतरच्या आंदोलनाची दिशा ठरवणार असल्याचे जाहीर केले होते.

तत्पुर्वी सांयकाळीच जरांगे पाटील यांनी महाजन, (Girish Mahajan) भुमरे यांनी त्यांची भेट घेत पुन्हा एकदा वेळ देण्याची विनंती केली. (Maratha Reservation) यावर जरांगे पाटील यांनी आपला निर्णय उद्या झालेल्या बैठकीनंतर कळवू असे सांगत या जोडीला माघारी पाठवले. सरकारच्या वतीने चर्चेसाठी आलेल्या महाजन-भुमरे जोडीने टिकणारे आरक्षण देण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती जरांगे पाटील यांना दिली.

या प्रयत्नांबद्दल जरांगे पाटील समाधानी आहेत, असेही महाजन यांनी सांगितले. परंतु पाऊण तासाच्या या चर्चेनंतर सरकारकडून पुन्हा तिच भाषा, तिच आश्वासने दिली जात असल्याचा सूर निघत आहे. (Marathwada) गिरीश महाजन यांचा संकटमोचक असा उल्लेख केला जातो. परंतु याच महाजन यांनी अंतरवाली सराटीत जरांगे पाटील यांची उपोषणा दरम्यान भेट घेतांना दिलेल्या एकाही आश्वासनाची पुर्तता सरकारने केलेली नाही, असा आरोप मराठा समाजाकडून केला जातोय.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

विशेषतः मराठा समाजाच्या तरुणांवर दाखल झालेले गुन्हे परत घेण्याचे आदेश पोलिसांना दिले असल्याचे महाजन यांनी प्रत्यक्ष आणि नंतर फोनवरून जरांगे यांच्याशी झालेल्या चर्चेत सांगितले होते. प्रत्यक्षात अंतरवाली सराटीतील घटने प्रकरणी मराठा समाजाच्या तरुणांवर दाखल झालेला एकही गुन्हा अद्याप मागे घेण्यात आलेला नाही.

शिंदे समितीच्या दौऱ्यातून लाखो मराठा समाजातील कुणबीच्या नोंदी आढळल्या आहेत. राज्य मागासवर्ग आयोगाचे काम वेगाने सुरू आहे, तेव्हा आणखी वेळ लागला तरी हरकत नाही, पण टिकणारे आरक्षण देण्याचा शासनाचा प्रामाणिक प्रयत्न असल्याचे महाजन वारंवार सांगत होते. मनोज जरांगे पाटील यांनी त्यांचे ऐकून घेतले, परंतु वेळ वाढवून देण्याची मागणी मात्र त्यांनी अद्याप मान्य केलेली नाही.

उद्या, 17 रोजी अंतरवाली सराटीत होणाऱ्या मराठा समाजाच्या बैठकीत यावर चर्चा केली जाईल. सर्वानुमते जो निर्णय होईल तो सरकारला कळवण्यात येणार आहे. मनोज जरांगे पाटील पुन्हा सरकारवर विश्वास ठेवून मराठा आरक्षणाचा निर्णय घेण्यासाठी मुदतवाढ देणार का? याकडे सगळ्या राज्याचे लक्ष लागले आहे. मुदतवाढ न दिल्यास 24 नंतरचे आंदोलन कसे असेल? जरांगे पाटील व त्यांचे सहकारी याबद्दल काय निर्णय घेतात? यावरच पुढील काळात राज्यातील वातावरण कसे असेल हे अवलंबून असणार आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT