Marathwada BJP News Sarkarnama
मराठवाडा

Marathwada BJP News : मोदींच्या विकासावर भाजपचाच विश्वास नाही ? मंत्री, आमदारांचीच अभियानाकडे पाठ...

Jagdish Pansare

Sambhajinagar News : केंद्र शासनाच्या निधीतून सुरू असलेल्या योजनांचे काम जनतेपर्यंत पोचविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून `विकसित भारत संकल्प यात्रा` अभियान राबविले जात आहे. (Marathwada BJP News) मंगळवारी दि. 28 रोजी महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यानात यासाठी तयार करण्यात आलेल्या चित्र रथाचे उद्घाटन करण्यात आले, पण या कार्यक्रमाकडे भाजपचे लोकप्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांनीच पाठ फिरविली.

कार्यक्रमक स्थळावरील बॅनरवर भाजपच्या केंद्र आणि राज्यातील अर्धा डझन मंत्र्यांची नावे असूनही तिथे एकही मंत्री, आमदार हजर नव्हता. अखेर महापालिकेचे प्रशासक जी. श्रीकांत यांनी लाभार्थ्यांच्या हस्ते चित्र रथाचे उद्घाटन केले. त्यामुळे मोदींच्या विकासावर (BJP) भाजपचाच विश्वास नाही का? अशी कुजबूज सुरू झाली होती.

मोदींचा हा विकास रथ शहरात ४७ ठिकाणी जाणार आहे. (Marathwada) `दारिद्र्य मुक्ती` हे या यात्रेचे उद्दिष्ट असून अन्न, वस्त्र, निवारा यासोबतच आरोग्यासाठी असणाऱ्या `आयुष्मान भारत` सारख्या योजनेचा लाभ नागरिकांनी घ्यावा. (Maharashtra) गरजू व वंचित लाभार्थ्यांना या योजनांमध्ये सामावून घ्यावे, असे आवाहन जी. श्रीकांत यांनी या वेळी केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, या कार्यक्रमासाठी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, डॉ. भागवत कराड, पालकमंत्री संदीपान भुमरे, गृहनिर्माणमंत्री अतुल सावे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार इम्तियाज जलील, आमदार सतीश चव्हाण, विक्रम काळे, हरिभाऊ बागडे, संजय शिरसाट, प्रदीप जैस्वाल यांची प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रण पत्रिकेत नावे होती. मात्र, यापैकी एकही लोकप्रतिनिधी या कार्यक्रमाला हजर नव्हता.

`विकसित भारत संकल्प यात्रा` हा सरकारी कार्यक्रम होता. त्यामुळे आम्ही त्यापासून दूर होतो. भाजप पक्षातर्फे ही यात्रा जनतेपर्यंत नेली जाणार आहे. त्यासाठी अडीच महिन्यांचा कार्यक्रम आहे. लोकप्रतिनिधी शहरात नसल्याने ते उद्घाटनाच्या क्रार्यक्रमाला जाऊ शकले नाहीत, असा खुलासा भाजपचे शहराध्यक्ष शिरीष बोराळकर यांनी केला आहे.

राज्यात महायुतीचे सरकार आहे, जिल्ह्याला केंद्रातील दोन आणि राज्याच्या मंत्रिमंडळात तीन मंत्री लाभलेले आहेत. लोकसभेच्या निवडणुका अवघ्या सहा महिन्यांवर आलेल्या असताना राज्याच्या सत्तेतील एकही मंत्री, आमदार मोदींच्या या महत्त्वाकांक्षी अभियानाच्या कार्यक्रमाला उपस्थितीत राहू नये, याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

भाजपने हा कार्यक्रम सरकारी होता असे सांगून अंग झटकले असले तरी यापूर्वी अनेक सरकारी कार्यक्रमांना भाजपने आपल्या उपस्थितीने पक्षाच्या उपक्रमाचे स्वरूप आणल्याची अनेक उदाहरणे पहायला मिळतात. त्यामुळे आता कितीही स्पष्टीकरण दिले तरी केंद्र आणि राज्यातील मंत्र्यांच्या आपल्याच पक्षाच्या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाबद्दलची अनास्था यानिमित्ताने समोर आली आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT