Beed Political News Sarkarnama
मराठवाडा

Marathwada : दोन्ही शिवसेनेला आधी मित्रपक्ष भाजप-राष्ट्रवादीशीच झुंजावे लागणार

राज्यातील सत्तांतर आणि शिवसेनेतील बंडखोरीनंतर शिवसेना दुभंगली आहे. त्यामुळे जिल्ह्यात अगोदरच मर्यादीत राजकीय ताकद असलेल्या पक्षाची ताकद दोन हिश्यांत वाटली गेली आहे. (Beed News)

Datta Deshmukh

बीड : अगोदरच जिल्ह्यात मर्यादीत राजकीय ताकद असलेला शिवसेना पक्ष आता दुभंगल्याने (शिवसेना : उद्धव बाळासाहेब ठाकरे व शिवसेना : बाळासाहेब ठाकरे) या पक्षाच्या ताकदीला आणखी मर्यादा आल्या आहेत. भविष्यात या दोन्ही पक्षांना निवडणुकांत विरोधकांशी लढण्याअगोदर जागा सोडून घेण्यासाठी ताकदवान असलेल्या भाजप व राष्ट्रवादी या मित्रपक्षांशीस झुंजावे लागणार आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व भविष्यातील विधानसभा निवडणुकीत हक्काचा वाटा पदरात पाडून घेण्यासाठीच हाती मशाल आणि ढाल-तलवार घेऊन मित्रपक्षांशी अगोदर निकराची लढाई करावी लागणार आहे. (Beed News) एकेकाळी सात विधानसभा मतदार संघ असलेल्या जिल्ह्यात तत्कालिन युतीमध्ये भाजप एका जागेवर तर शिवसेना सहा जागांवर लढायचा. (Marathwada)

त्यानंतर भाजपने राज्यातील इतर जागा शिवसेनेला देऊन जिल्ह्यातील एकेक जागा पदरात पाडून घेतल्या. त्यांतर सहा विधानसभा मतदार संघांच्या वाट्यात पाच मतदार संघ भाजपच्या वाट्याला आणि एकमेव बीड मतदार संघ शिवसेनेला असे. त्या काळात देखील शिवसेनेची राजकीय ताकद मर्यादीत असे. मागच्या नगर पालिका व जिल्हा परिषद निवडणुकांत देखील जिल्ह्यात शिवसेनेची कामगिरी फारच सुमार राहीली. विधानसभेला बीड लढताना देखील पक्षाच्या नाकी नऊ आले.

आता राज्यातील सत्तांतर आणि शिवसेनेतील बंडखोरीनंतर शिवसेना दुभंगली आहे. त्यामुळे जिल्ह्यात अगोदरच मर्यादीत राजकीय ताकद असलेल्या पक्षाची ताकद दोन हिश्यांत वाटली गेली आहे. आता जरी एका शिवसेनेला (बाळासाहेब ठाकरे) सत्तेचे ग्लॅमर असले तरी त्यांच्या युतीतला भाजप जिल्ह्यात मोठा पक्ष आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था व विधानसभा निवडणुकीत पक्षाला वाटा पदरात पाडतांना पक्षाच्या नाकी नऊ येणार आहेत.

बीड मतदार संघात भाजपच कमजोर असल्याने इथे मात्र शिवसेनेला (बाळासाहेब ठाकरे) बरा वाटा मिळण्यात अडचणी येणार नाहीत. महाविकास आघाडीतील शिवसेनेचा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्ह्यातील मित्रपक्ष राष्ट्रवादी राजकीय ताकदवान आहे. आता पक्षाचे जिल्ह्यात चार आमदार आहेत. त्यामुळे त्यांच्या कार्यक्षेत्रात पक्षाला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये फारसा वाटा मिळेल, याची खात्री नाही.

तर, मागच्या अनेक विधानसभा निवडणुका बीडमधून लढलेल्या व कधी जिंकलेल्या या मतदार संघात राष्ट्रवादीचे आमदार आहेत. सत्तेच्या काळातही या मतदार संघात शिवसेना (तेव्हाची व आताची) व राष्ट्रवादीतून विस्तव जात नव्हता. आता भविष्यातही पुन्हा लढाई अटळच आहे. एकूणच या दोन्ही शिवसेनांचे मित्रपक्ष जिल्ह्यात ताकदवान असल्याने या पक्षांना निवडणुक रिंगणात विरोधकांशी लढण्याअगोदर आपला वाटा मिळविण्यासाठी मित्रपक्षांशी झुंजावे लागणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT