Marathwada Graduate Constituency_Satish Chavan, Pratap Singh Patil, Dilip Ghuge 
मराठवाडा

Marathwada Graduate Election: मराठवाडा पदवीधरच्या निवडणुकीत सतीश चव्हाण विजयी चौकार मारणार की प्रतापसिंह पाटील 'जायंट किलर' ठरणार? दुसऱ्या पसंतीचा ‘गेम’ रंगणार?

Graduate Constituency Results: मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत ४१ उमेदवार आणि ५९.१२ टक्के मतदानामुळे निकालाकडे लक्ष लागले आहे. सतीश चव्हाण आणि डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्यातील लढतीत मतांचा कोटा निर्णायक ठरणार आहे.

Jagdish Pansare

Marathwada Graduate Constituecy : मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचा आमदार ठरवण्यासाठी झालेल्या मतदानात टक्का घसरल्याने उद्याच्या मतमोजणीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. ४१ उमेदवार, ५९ टक्के मतदान, प्रमुख तीन-चार उमेदवारांमध्ये मतांचे होणारे विभाजन पाहता मतमोजणीचा निकाल पहिल्या पसंतीच्या मतांवरच लागतो, की मग दुसऱ्या पसंतीवर जावे लागणार? यावर मतमोजणीच्या पूर्वसंध्येला मोठा खल सुरू झाला आहे. महायुतीचे सतीश चव्हाण आणि महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे डाॅ. प्रतापसिंह पाटील यांच्यात प्रमुख लढत आहे.

दिसायला ही लढत दुरंगी दिसत असली तरी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या दिलीप घुगे यांच्यासह मराठवाडा शिक्षक संघाचे सुशील घोटे, अपक्ष रविराज साबळे व इतर उमेदवारांना मिळालेली पहिल्या पसंतीची मते आणि दुसऱ्या पसंतीची मते कोणाच्या पारड्यात जातात? यावर मतांचा कोटा आणि निकाल दुसऱ्या पंसतीवर जाणार का? हे ठरणार आहे.डिसेंबर २०२० मध्ये झालेल्या मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सतीश चव्हाण हे पहिल्या पसंतीच्या मतांवर विजयी झाले होते.

२ लाख ४१ हजार ९०८ या एकूण झालेल्या मतांपैकी २ लाख १८ हजार ८१६ मते वैध ठरली होती. तर या निवडणुकीत २३ हजार ९२ मते ही बाद झाली होती. वैध मतांच्या पन्नास टक्के अधिक एक मत या सुत्रानूसार १ लाख ९ हजार ४०९ मतांचा कोटा पहिल्या पंसतीच्या विजयासाठी ठरला होता. सतीश चव्हण यांनी १ लाख १६ हजार ६३८ मते मिळवत विजय मिळवला होता. भाजपाच्या शिरीष बोराळकर यांना फक्त ५८ हजार ७४३ मते मिळाली होती. ठरलेल्या कोट्यापेक्षा ७ हजार २२९ अधिकची मते घेऊन सतीश चव्हाण विजयी झाले होते. या निवडणुकीत ६४.८४ टक्के एवढ्या मतदानाची नोंद झाली होती.

घसरलेला टक्का, मतांचे विभाजन कोणाच्या मुळावर?

मराठवाडा पदवीधर मतदारसंघासाठी यावेळी ५८ टक्के एवढ्या मतदानाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ५ टक्क्यांनी मतदान घटले. याशिवाय निवडणुक रिंगणात ४१ उमेदवार राहिल्याने मतांचे विभाजन काही प्रमाणात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. महायुतीचे सतीश चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे डाॅ. प्रतापसिंह पाटील, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे दिलीप घुगे या तीन प्रमुख उमेदवारांच्या मत विभाजनावर निवडणुकीचा निकाल अवलंबून असणार आहे.

यंदाच्या निवडणुकीत ३ लाख २६ हजार ७०० एवढे मतदार होते. यापैकी ५९.१२ टक्के मतदारांनी म्हणजेच १ लाख ९३ हजार १३४ जणांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. तब्बल १ लाख ३३ हजार ५६६ पदवीधरांनी मतदानाकडे पाठ फिरवली. आता जे मतदान झाले आहे, त्यापैकी वैध किती आणि बाद किती होते? यावर मतांचा कोटा ठरणार आहे. झालेली सर्व मते वैध गृहित धरली तर ९६ हजार ५६८ एवढा कोटा ठरू शकतो. अर्थात उद्या प्रत्यक्ष मतमोजणीला सुरूवात होऊन वैध, अवैध मतदानाचा आकडा समोर आल्यानंतरच अंतिम कोटा ठरेल. विजयासाठी कोटा ठरवताना वैध मतांच्या संख्येला दोनने भाग देऊन त्यात एक मिळवल्यानंतर येणारी बेरीज हा कोटा म्हणून ग्राह्य धरली जाते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT