Shivsena UBT News : मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक प्रचारात आता रंगत वाढू लागली आहे. महायुतीने बंडखोरी मोडून काढण्यात यश मिळवले, पण महाविकास आघाडीला ते करता आले नाही. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दिलीप घुगे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे डाॅ. प्रतापसिंह पाटील हे दोन उमेदवार रिंगणात आहेत. या बिघाडीनंतरही ठाकरेंच्या शिवसेनेने युतीच्या सतीश चव्हाण यांच्याविरोधात आक्रमक पावित्रा घेतला आहे.
पक्षाच्या पदाधिकारी, लोकप्रतिनिधींच्या मेळाव्यात चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे हे दोन्ही नेते चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून आले. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी असताना राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण यांनी संदीपान भुमरे यांचे काम करत गद्दारी केली, त्याला आता मी साफ करणार, असा इशारा आपल्या भाषणातून दिला.
सहा वर्षात एकही फोन न उचलणारा, आता पोपटासारखा बोलत आहे. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळात सर्वाधिक काम मधुकरअण्णा मुळे यांनी केले. त्यांच्या आयत्या पिठावर हा आमदार रेघोट्या ओढतो आहे. वारंवार पक्षांतर करणाऱ्या या गद्दाराला गाडा, असे आवाहन खैरे यांनी यावेळी केले.
तर गंगापूर तालुक्यात शिवसेना आणि शिवसैनिकांना त्रास देणाऱ्या सतीश चव्हाण यांचा बदला घेण्याची संधी चालून आली आहे, शिवसेना फोडण्याचे पाप करणाऱ्याला घरी बसवा, असे आवाहन अंबादास दानवे यांनी केले. सतीश चव्हाण यांनी शिवसैनिकांना खूप त्रास दिला, त्यांना गंगापूर-वैजापूरमधून मतदान होऊ देणार नाही. या तालुक्यातील मतदान आपल्या उमेदवाराला होईल, असे नियोजन केले जाईल. नऊ दिवसात हा बदल घडवून आणायचा आहे, असेही दानवे म्हणाले.
अठरा वर्ष पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आमदाराला त्यांचा एकही प्रशअन सोडवता आलेला नाही. विद्यार्थी, तरूण, महिला, रोजगार, शिष्यवृत्ती, अनुदान, पेन्शन, भरती हे सगळे प्रश्न आजही कायम आहेत. केवळ पत्रकबाजी करून स्वतःची टिमकी हे महाशय वाजवत आहेत, अशी टीका उमदेवार दिलीप घुगे यांनी युतीच्या सतीश चव्हाण यांच्यावर केली. पंचायत समिती पासून आपण राजकारणाला सुरूवात केली. जिल्हा परिषद सदस्य, बाजार समितीची निवडणूक आपण लढवलेली असल्याने सगळ्या प्रश्नांची जाण आहे. पदवीधरांचे आतापर्यंत न सुटलेले प्रश्न सोडवण्याचा आपण प्रयत्न करू, असे घुगे यांनी यावेळी सांगीतले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.