Congress Leader Join Ncp News, Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

Marathwada : चिकटगांवकरांचा विरोध, तरीही पंकज ठोंबरेंचा राष्ट्रवादीत प्रवेश..

चिकटगावंकर व ठोंबरे यांच्याशी समोरासमोर चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे त्यावेळी सांगण्यात आले होते. अखेर चिकटगांवकर यांचा विरोध डावलत हा प्रवेश आज झाला. (Ncp, Aurangabad)

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : राष्ट्रवादी काॅंग्रेसचे वैजापूरचे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर यांच्या तीव्र विरोधानंतरही काॅंग्रेसचे विरगाव येथील जिल्हा परिषद सदस्य पंकज ठोंबरे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाला. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या उपस्थितीत ठोंबरे यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह मुंबईत पक्ष कार्यालयात पक्ष प्रवेश केला.

याआधी दोनवेळा माजी आमदार चिकटगांवकर यांच्या विरोधामुळे पंकज ठोंबरे यांचा पक्ष प्रवेश लांबला होता. यावेळी मात्र तो झाला, परंतु यामुळे नाराज असलेल्या भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर यांनी मात्र या प्रवेश सोहळ्याकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले. मुंबई येथील (Ncp) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यालयात (Aurangabad)औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यातील भाऊसाहेब ठोंबरे व विजय ठोंबरे यांच्यासह अनेकांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

यावेळी पंकज ठोंबरे, विनायकराव गाडे, सत्यजित सोमवंशी, ऐराज शेख, अमृत शिंदे, भगतसिंह राजपूत, निलेश डाहके, नितीन थोरात, संदीप मोटे आदींसह इतरांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घड्याळ हाती बांधले. जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस परिवारात सहभागी झालेल्या सर्व नवीन सदस्यांचे स्वागत केले व पक्ष संघटना मजबूत करण्याबाबत त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. अजित पवार यांनी उपस्थितांना संबोधित केले.

या पक्ष प्रवेशामुळे औरंगाबाद जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढणार आहे. पक्षाची ध्येय धोरणे व कार्य तळागळापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण सर्व कटिबद्ध राहाल, अशा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी आमदार विक्रम काळे, सतीश चव्हाण, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, माजी आमदार तथा औरंगाबाद निरीक्षक अमरसिंह पंडित, औरंगाबाद ग्रामीण जिल्हाध्यक्ष कैलास पाटील उपस्थीत होते.

दरम्यान, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब ठोंबरे व त्यांचे पुतणे पंकज ठोंबरे यांच्यासह त्यांच्या समर्थकांना राष्ट्रवादीत प्रवेश करायचा असल्याने त्यांनी अनेकदा मुंबईत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवारांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. परंतु माजी आमदार चिकटगांवकर यांचा याला विरोध असल्याने राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांकडून त्यांना थांबण्यास सांगण्यात आले होते. वैजापूर तालुक्यात काँग्रेसची मोठी ताकद होती, परंतु कालांतराने ती घटली.

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील काँग्रेसला तालुक्यात फारसे यश मिळवता आले नाही. पुढील राजकीय भवितव्य लक्षात घेता भाऊसाहेब ठोंबरे व त्यांचे पुतणे व युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव पंकज ठोंबरे हे राष्ट्रवादीत येण्यास उत्सूक होते. परंतु भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर व ठोंबरे यांच्यातून विस्तव देखील जात नसल्यामुळे ठोंबरेंचा पक्षप्रवेश लांबत गेला. दोन महिन्यांपुर्वीच ठोंबरे काका-पुतणे शेकडो समर्थकांसह पुण्यात दाखल झाले होते. पुण्याच्या वसंतदादा शुगर इन्स्टीट्युटमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, नेते अजित पवार यांच्या उपस्थीतीत भाऊसाहेब व पंकज ठोंबरे हे आपल्या शेकडो समर्थकांसह राष्ट्रवादीत प्रवेश करणार होते.

पण तेव्हा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ठोंबरे काका-पुतण्यासह त्यांच्या समर्थकांना वाट पाहण्यास सांगितले होते. वैजापूर तालुक्यात राष्ट्रवादीचे संघटन मोठे आहे. भाऊसाहेब चिकटगांवकर यांच्या रुपाने राष्ट्रवादीने २०१४ मध्ये या मतदारसंघात विजय देखील मिळवला होता. ठोंबरे व चिकटगांवकर हे एकमेकांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात. नेमकी हीच अडचण असल्यामुळे ठोंबरे यांच्या पक्ष प्रवेशाला हिरवा कंदील मिळत नव्हता. चिकटगावंकर व ठोंबरे यांच्याशी समोरासमोर चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे त्यावेळी सांगण्यात आले होते. अखेर चिकटगांवकर यांचा विरोध डावलत हा प्रवेश आज झाला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT