Rajesh Tope Sarkarnama
मराठवाडा

Marathwada Political News : जायकवाडीला पाणी कधी सोडणार? टोपेंचा कोर्टात जाण्याचा इशारा; खोतकर मुख्यमंत्र्यांना भेटणार

Sachin Fulpagare

Marathwada Water Issue : मराठवाड्याला पाणी न सोडणारे हे झारीतले शुक्राचारी कोण आहेत? असा सवाल उपस्थित करत जालन्याचे राष्ट्रवादीचे आमदार राजेश टोपे यांनी पाणी प्रश्नावर कोर्टात जाण्याचा इशारा दिला आहे.

नाशिक आणि नगर जिल्ह्यांतील धरणांमधून मराठवाड्यासाठी पाणी सोडण्यात येणार आहे, पण या निर्णयाला दोन्ही जिल्ह्यांतून विरोध वाढत चालला आहे. नाशिक आणि नगर जिल्ह्यांमध्ये आंदोलनं होत आहेत. यामुळे हा पाणी प्रश्न पेटला आहे. नाशिक आणि नगर जिल्ह्यांमधील नेते आक्रमक झाले आहेत. दुसरीकडे मराठवाड्यातील नेत्यांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यंदा मराठवाड्यात अत्यल्प पाऊस झाल्यानं पाणीटंचाईला सामोरं जावं लागत आहे. त्यानुसार मराठवाड्याच्या हक्काचं ८.६०३ टीएमसी पाणी जायकवाडीत सोडणं गरजेचं आहे. यासंबंधीचे आदेश गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाने दिले आहेत. मात्र, अजूनही जायकवाडी धरणात पाणी सोडलेलं नाही. त्यामुळं तातडीने शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी करा.. अन्यथा कोर्टात जाऊ, असा इशारा देत संघर्षमय आंदोलन उभारणार असल्याचंही राजेश टोपे यांनी म्हटलंय.

'जायकवाडीत पाणी सोडण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार'

जायकवाडी धरणात पाणी सोडण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करणार असल्याचं शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी म्हटलंय. मराठवाड्यात यंदा दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जायकवाडीत हक्काचं पाणी सोडण्यात यावं, असे आदेश गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळानं दिले आहेत. मात्र, या आदेशाला न जुमानता जायकवाडीत पाणी सोडलं जात नाही. त्यामुळे आम्हाला आमच्या हक्काच्या पाण्यासाठी संघर्ष करायला लावू नका. यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचं खोतकर यांनी म्हटलंय.

काय आहे नेमकं प्रकरण?

मराठवाड्यातील १४ तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश स्थिती जाहीर करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर शेतीसाठी जायकवाडी धरणातून दोन आवर्तने सोडण्यात येणार आहेत. पहिले अवर्तन सुरू झाले असून, दुसरे अवर्तन हे २० जानेवारी २०२४ ला सोडण्यात येणार आहे. दोन्ही अवर्तनात एकूण २५ दिवस पाणी सोडले जाणार आहे. याचा फायदा छत्रपती संभाजीनगर, जालना आणि परभणी जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना होणार आहे. पण गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळानं आदेश काढूनही नऊ दिवस झाले तरीही पाणी का सोडलेलं नाही.

पाटबंधारे विकास महामंडळाने निर्णय घेत येत्या ३१ ऑक्टोबरपर्यंत एकूण ८.६०३ टीएमसी पाणी जायकवाडी धरणात सोडण्याचे आदेश संबंधित जिल्हाधिकारी, जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. या निर्णयानुसार नाशिक जिल्ह्यातील गंगापूर, काश्यपी, गौतमी गोदावरी या धरणांतून ०.५ टीएमसी (५०० द.ल. घ.फू.) ,आळंदी, कडवा, भाम, भावली, बाकी, दारणा, मुकणे व वालदेवी या धरणांतून २.६४३ टीएमसी, तर अहमदनगर जिल्ह्यातील मांडओहोळ, मुळा : २.१० टीएमसी, भंडारदरा, निळवंडे, आढळा, भोजापूर ३.३६ टीएमसी इतके पाणी सोडावे लागणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT