Cm Chandrasekhar Rao-Ashok Chavan News, nanded Sarkarnama
मराठवाडा

BRS Challange in Front Of Chavan : एमआयएमला रोखले आता चव्हाणांसमोर बीआरएसचे आव्हान ?

Marathwada : बीआरएसला नांदेडसह मराठवाड्यातील परभणी, बीड, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जो प्रतिसाद मिळाला आहे.

सरकारनामा ब्युरो

Nanded Political : काॅंग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्यासमोर बीआरएसच्या (BRS) रुपाने नवे आव्हान उभे राहिले आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी आपल्या भारत राष्ट्र समिती या राष्ट्रीय पक्षाच्या विस्तारासाठी अशोक चव्हाण यांच्या नांदेड जिल्ह्याची निवड केली. नांदेड मार्गे महाराष्ट्रातील राजकारणात बाहेरच्या राज्यातून येणारा बीआरएस हा दुसरा पक्ष ठरला आहे.

काही वर्षापुर्वीच हैदराबादमधून आलेल्या एमआयएम (Aimim) पक्षाने देखील नांदेडमधूनच महाराष्ट्रात एन्ट्री केली होती. एमआयएममुळे सुरुवातील अशोक चव्हाण (Ahsok Chavan) यांची डोकेदुखी वाढली होती. गेल्या अनेक वर्षापांसून काॅंग्रेससोबत असलेला मुस्लिम मतदार स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीनंतर विधानसभा, लोकसभा निवडणुकीत देखील दुरावला गेला. त्यामुळे नांदेड जिल्ह्यात एमआयएमचा बंदोबस्त करण्यात अशोक चव्हाण यांची बरीच शक्ती वाया गेली.

एमआयएमला रोखून काही वर्षे उलटत नाही, तोच आता तेलंगणातील बीआरएसचा शिरकाव नांदेड मार्गे महाराष्ट्रात झाला. तेलंगणाच्या सीमेला लागून असलेल्या गावांनी मध्यतंरी तेलंगणा राज्यात समाविष्ट होण्याची मागणी केली आणि (K.Chnadrashekhar Rao) केसीआरने हे हेरत थेट नांदेडमधून महाराष्ट्राच्या राजकारणात उडी घेतली. (Nanded) नांदेड आणि लोहा या दोन ठिकाणी मोठ्या सभा आणि विविध राजकीय पक्षांच्या आजी, माजी आमदार-खासदार, नगरसेवक, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांना आपल्या पक्षात प्रवेश दिला.

गेल्या दोन महिन्यात बीआरएसला नांदेडसह मराठवाड्यातील परभणी, बीड, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जो प्रतिसाद मिळाला आहे, तो प्रस्थापित राजकीय पक्षांना विचार करायाला लावणारा निश्चितच आहे. बीआरएसचे नांदेडमध्ये अशोक चव्हाण हेच लक्ष आहे हे देखील आता स्पष्ट झाले आहे. कारण अशोक चव्हाण यांचा मतदारसंघ असलेल्या भोकरमध्ये बाजार समिती निवडणुकीत बीआरएसने स्वतंत्र पॅनल दिले आहे.

विशेष म्हणजे चव्हाणांच्या तंबूत नाराज असलेल्या व ज्यांना यावेळी उमेदवारी नाकारण्यात आली अशांना सोबत घेत बीआरएसने चव्हाण यांच्यासमोर तगडे आव्हान उभे केले आहे. काॅंग्रेस नेते राहूल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचे महाराष्ट्रातील यजमानपद अशोक चव्हाण यांनी घेतले होते. तेलंगणातून भारत जोडो यात्रा आपल्या नांदेड जिल्ह्यातून जावी अशीच आखणी करण्यात आली होती.

या यात्रेमुळे नांदेडसह मराठवाड्यातील हिंगोली, परभणी जिल्ह्यात काॅंग्रेसची मोठी हवा निर्माण झाली होती. आता त्याच तेलंगणातील बीआरएस पक्ष नांदेडमधूनच महाराष्ट्रात दाखल झाला आहे. `अब की बार किसान सरकार`, असा नारा देत तिथे राबवल्या जात असलेल्या योजनांचे जोरदार मार्केटिंग मराठवाड्यात सध्या सुरू आहे. शेतकऱ्यांना या जाहिरीती, योजाना भूरळ घालत आहेत. त्यामुळे राज्यातील कुठलाही प्रस्थापित राजकीय पक्ष जर बीआरएसला हलक्यात घेण्याचा विचार करत असेल तर तो त्यांच्यासाठी भविष्यात धोक्याची घंटा ठरू शकते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT