Railway State Minister Raosaheb Danve Sarkarnama
मराठवाडा

रेल्वे राज्यमंत्री दानवेंचा पहिला रेल्वे प्रवास झाला होता विनातिकीट

(Railway State Minister Raosaheb Danve)२०२४ पर्यंत नांदेड ते मनमाड रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण आणि विद्युतीकरण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. मराठवाड्याला मध्य रेल्वेशी जोडण्या संदर्भात मी अधिकाऱ्यांशी काही बैठका केल्या आहेत.

जगदीश पानसरे

औरंगाबाद ः गावचे सरपंच, पंचायत समिती सभापती,आमदार, खासदार आणि आता केंद्रात रेल्वे राज्यमंत्री असलेले रावसाहेब दानवे हे राजकारणातील हरहुन्नरी नेते म्हणून ओळखले जातात. रांगडा स्वभाव, ग्रामीण भाषा व राहणी यामुळे ते नेहमीच प्रकाशझोतात असतात. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री झाल्यानंतर `सरकारनामा`ला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी आपल्या राजकीय प्रवासातील अनेक पैलू उलगडून सांगितले.

त्यातलाच एक म्हणजे आता रेल्वे राज्यमंत्री असलेले, ज्यांच्यासाठी गाडीला एक स्वतंत्र अलिशान डबा जोडला जातो, त्या दानवेंना कधी काळी तिकीट काढले नाही म्हणून टीटीने रेल्वेतून उतरवून दिले होते, असे सांगितले तर कुणाला विश्वास बसणार नाही. पण हे खरे आहे, आपल्या पहिल्या रेल्वे प्रवासाबद्दल सांगतांना दानवे यांनीच ही आठवण सांगितली.

काही महिन्यांपुर्वी झालेल्या मोदी मंत्रीमंडळ विस्तारात आधी अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण राज्यमंत्री राहिलेल्या दानवे यांच्याकडे रेल्वे व कोळसा खाण राज्यमंत्री पदाचा कार्यभार सोपवण्यात आला. आतापर्यंत मराठवाड्याच्या वाट्याला कधी नव्हे ते एवढे महत्वाचे खाते आणि जबाबदारी मिळाली, त्यामुळे सहाजिकच महाराष्ट्र आणि विशेषतः मराठवाड्याच्या त्यांच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत.

याविषयी दानवे भरभरून बोलले. पण जेव्हा त्यांना त्यांच्या पहिल्या रेल्वे प्रवासाबद्दल विचारले तेव्हा ते म्हणाले, मी आठवीत असतांना म्हणजे साधरणतः १९७२ चा तो काळ असेल. मनामाड-काचीगुडा ही रेल्वे तेव्हा चालायची, आता ती आहे की नाही मला कल्पना नाही. पण त्या गाडीने आमचा प्रवास व्हायचा. एकदा या गाडीने मी आपल्या काही मित्रांबरोबर निघालो.

रेल्वेस्टेशनवर पोहचलो मित्रांनी तिकाटीसाठी पैसे घेतले. तेव्हा ५० पैसे तिकीट होते. थोड्याच वेळात गाडी निघाली मी आणि माझे मित्र गाडीत बसलो. गाडी काही किलोमीटर लांब गेली आणि तिकीट तपासणीस आमच्या डब्यात आला. टीटीला पाहून माझा सहकारी म्हणाला, सीट खाली लप, मी म्हटलो का? आपण तर तिकीट काढले आहे.

तेव्हा तो म्हणाला तिकीट काढायला खूप रांग होती, गाडी सुटली होती, त्यामुळे तिकीट न काढताच आपण गाडीत बसलो. मग पैसे देवून देखील तिकीट नसल्यामुळे टीटीने आम्हाला अर्ध्या रस्त्यातच गाडीतून उतरवून दिले. त्यामुळे हा पहिला अर्धवट झालेला रेल्वे प्रवास मला चांगलाच लक्षात राहिला.

आता मी रेल्वे मंत्री झाल्यानंतर सहाजिकच माझ्याकडून खूप अपेक्षा आहेत. विशेषतः मराठवाड्याकडून, याची मला जाणीव आहे. मागण्या तर खूप आहेत, गेल्या अनेक वर्षापासून स्व.गोविंदभाई श्राॅफ यांच्या नेतृत्वाखाली अनेक आंदोलन झाली, रेल्वे संघर्ष समितीने देखील ती केली. यात प्रामुख्याने तीन मागण्या तेव्हाही होत्या आणि आजही आहे.

यात नांदेड ते मनमाड रेल्वे मार्गाचे दुहेरीककरण, विद्युतीकरण आणि मराठवाड्याचा भाग दक्षिण-मध्य रेल्वेतून मध्य रेल्वेला जोडावा. त्यामुळे या तीन मागण्यांच्या दृष्टीने मी प्रयत्न करत आहे. २०२४ पर्यंत नांदेड ते मनमाड रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण आणि विद्युतीकरण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. मराठवाड्याला मध्य रेल्वेशी जोडण्या संदर्भात मी अधिकाऱ्यांशी काही बैठका केल्या आहेत. त्यात देखील लवकरच आम्हाला यश येईल, असे दानवे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT