Abhimanyu Pawar devendra Fadnavis  sarkarnama
मराठवाडा

MLA Abhimanyu Pawar News : 'सरकारी नोकर भरती एमपीएससी मार्फत...', भाजप आमदार अभिमन्यू पवार यांचे फडणवीसांना साकडे

Jagdish Pansare

Abhimanyu Pawar News: राज्यात सध्या पेपरफुटी, नोकरभरती या विषयावरून विरोधकांनी सत्ताधारी महायुतीला खिंडीत गाठले आहे. नुकत्याच झालेल्या वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेपूर्वीच्या नीट परिक्षेतील गैरव्यव्हाराचे धागेदोरे मराठवाड्यातील नांदेड, लातूर, धाराशिव जिल्ह्यात सापडले आहेत. विद्यार्थी आणि बेरोजगार तरुणांच्या भवितव्याशी सुरू असलेला खेळ बंद करा, या मागणीसाठी विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत.

अशा वेळी औशाचे भाजप आमदार अभिमन्यू पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सर्व प्रकारच्या शासकीय नोकरभरतीची प्रक्रिया एमपीएससी मार्फतच राबवावी, अशी मागणी केली आहे.आपल्या मागणीचे पत्र त्यांनी फडणवीसांना दिले. नोकरभरतीत पारदर्शकता यावी, यासाठी या मागणीचा गांभीर्याने विचार करावा, असेही अभिमन्यू पवार यांनी पत्रात नमूद केले आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत MPSC गट अ, ब आणि क दर्जाच्या पदांची भरती केली जाते. महाराष्ट्र लोकसेवा आयोग पारदर्शक भरती प्रक्रिया राबवण्यासाठी ओळखला जातो, विद्यार्थी वर्गात आयोगाची विश्वासार्हता खूप चांगली असून नुकतीच 8 हजार लिपिक पदांची भरती प्रक्रिया यशस्वीपणे राबवून आयोगाने मोठ्या भरती प्रक्रिया राबविण्याची क्षमता सिद्ध केली आहे.

या सर्व बाबींचा विचार करून राज्य सरकारमार्फत भरल्या जाणाऱ्या सर्व पदांची भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत करण्यात यावी, अशी विनंती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली. याबाबत लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेण्याचा शब्द उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला आहे. सर्व शासकीय नोकरभरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत करण्याचा निर्णय झाल्यास शासकीय नोकरभरती प्रक्रियेत पारदर्शकता आणि सुसुत्रता येईल असा विश्वास, असल्याचे अभिमन्यू पवार यांनी म्हटले आहे.

यापुर्वी अभिमन्यू पवार यांनी युपीएससी, एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी पुण्यात आंदोलन सुरू केले तेव्हा मध्यस्थी करत सरकार आणि विद्यार्थ्यांमध्ये समन्वय घडवून आणण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली होती. आता सरकारी नोकरभरती संदर्भात त्यांनी केलेल्या मागणीला शासनाकडून कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

(Edited By Roshan More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT