Mla Haribhau Bagde News, Aurangabad
Mla Haribhau Bagde News, Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

Mla Haribhau Bagde News : बागडेंनी केला विधानसभा इच्छूकांचा गेम..

प्रकाश बनकर

Marathwada : राजकारणातून एखादा पुढारी जेव्हा मी निवृत्त होणार आहे अशी घोषणा करतो, तेव्हा त्याचा नेमका उलटा अर्थ घ्यायचा असतो. याचा धडा भाजपचे वरिष्ठ नेते माजी विधानसभा अध्यक्ष तथा फुलंब्रीचे विद्यमान आमदार हरिभाऊ बागडे (Haribhau Bagde) यांच्याकडून घ्यायला हवा. काही महिन्यापुर्वी आपल्याच मतदारसंघात आपण आता पुढची निवडणूक लढवणार नाही, तुम्ही तयारीला लागा, असे आवाहन करणारे बागडे प्रत्यक्षात मात्र पुन्हा दंड थोपटून मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत.

छत्रपती संभाजीनगर व फुलंब्री मतदारसंघातील बाजार समिती निवडणुकीत बागडे यांच्या नेतृत्वाखाली (Bjp) भाजप-शिंदे गटाने बहुमतासह सत्ता मिळवली आहे. फुलंब्रीत पंधरा वर्षापासून ताब्यात असलेली बाजार समिती ताब्यात घेवून बागडे यांनी आपले विधानसभेतील प्रतिस्पर्धी माजी आमदार तथा (Congress) काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डाॅ. कल्याण काळे यांना बॅकफूटवर ढकलले. त्याचबरोबर आगामी विधानसभेत आमदारकीवर दावा सांगू शकतील अशा संभाव्य उमेदवारांनाही शांत केले.

यापैकीच एक म्हणजे जिल्हा परिषदेच्या माजी महिला व बालकल्याण सभापती अनुराधा चव्हाण. बाजार समितीच्या संचालक म्हणून निवडून आल्यानंतर सभापती पदासाठी त्यांच्या नावाची चर्चा नसतांना बागडेंनी महिला संचालकाला संधी द्यायची असे सांगत शिक्कामोर्तब केले. (Haribhau Bagde) बागडे यांनी हे महिला संचालकाला संधी मिळावी म्हणून नाही, तर आमदारकीचा एक दावेदार कमी व्हावा, यासाठी केलेली खेळी असल्याची चर्चा या निमित्ताने मतदारसंघात होत आहे.

चव्हाण या बागडे नानांना बायपास करून थेट केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या मार्फत लाॅबिंग करू शकतात, त्याआधीच चव्हाण यांना सभापती करत बागडेंनी त्यांच्या पत्ता कट केला असावा, असे त्यांचेच समर्थक सांगत आहेत. फुलंब्रीचे नगराध्यक्ष सुहास शिरसाट, गाडेकर, प्रदीप आबा शिरसाट, किशोर शितोळे यांच्यासह अनेकजण विधानसभा लढवण्यास इच्छूक आहेत. पण हे सगळे बागडेंच्या ऐकण्यातले आहेत.

बागडेंचा शब्दच त्यांच्यासाठी अंतिम असतो. त्यामुळे उद्या हेच लोक नानांना उमेदवारी द्या, म्हणून पक्षाकडे जोर लावतील. फुलंब्री आणि छत्रपती संभाजीनगर कृषी उत्पन्न बाजार समिती दोन्ही ठिकाणी बागडे यांनी आपले वर्चस्व निर्माण केले आहे. त्यामुळे फुलंब्रीमधून आमदार होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या इच्छूकांना अजून पाच वर्ष वाट पहावी लागणार एवढे मात्र निश्चित.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT