Sachin Mulik-Sandip Kshirsagar
Sachin Mulik-Sandip Kshirsagar Sarkarnama
मराठवाडा

Beed : आमदार क्षीरसागरांचाच अवैध धंद्यात छुपा सहभाग; थेट पवार व ठाकरेंकडे तक्रार

Dattatrya Deshmukh

बीड : आमदार संदीप क्षीरसागर यांचाच अवैध धंद्यांमध्ये छुपा सहभाग असल्याचा बॉम्बगोळा शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख व जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिन मुळूक यांनी फोडला आहे. (Beed) मुळूक यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडेच मंगळवारी (ता. १५) पत्राद्वारे तक्रार केली आहे. (Sandip Kshirsagar) संदीप क्षीरसागर यांनी केलेली लक्षवेधी पोलिसांवर दबाव राहावा म्हणून केल्याचा गंभीर आरोपही सचिन मुळूक यांनी केला आहे. (Shivsena)

मागच्या वर्षभरापासून जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था बिघडविणाऱ्या अनेक घटना घडल्या. वाळूमाफियांमुळे शाळकरी मुलांचा मृत्यू, सामुहिक बलात्कार, खुन, चोऱ्या, दरोड्यांच्या गुन्ह्यांत वाढ झाली. अगदी पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर तलवारबाजीची घटनाही घडली. ल्यानंतर विरोधकांनी जिल्ह्यात माफियागीरी वाढल्याचा आरोप करत थेट राज्यपाल, मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांना पत्र लिहली. ‘बीड जिल्ह्यात काय चाललेय हे पहा’असे आवाहन थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांपर्यंत करण्यात आले.

दरम्यान, विरोधक जिल्ह्याची बदनामी करत असल्याचे प्रत्युत्तर सत्ताधाऱ्यांकडून दिले गेले. मागच्या महिन्यात थेट जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील मुद्रांक व नोंदणी कार्यालयात गोळीबाराची घटना घडली. त्यामुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला. ऐन अधिवेशनाच्या काळात हा प्रकार घडल्याने अधिवेशनातही जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेवर वादळी चर्चा झाली. विशेष म्हणजे या मुद्द्यावर राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके, आमदार संदीप क्षीरसागर व आमदार बाळासाहेब आजबे यांनीही लक्षवेधी केली.

गोळीबार व त्यानुषंगाने दाखल गुन्ह्याबाबत सोळंके यांनी चर्चा केली तर बीड मतदार संघातील क्रिकेट सट्टा, वेश्याव्यवसाय, वाळूमुळे अधिकाऱ्याचा बळी, सावकारकी आदी मुद्दे क्षीरसागर यांनी मांडले. सत्ताधारी आमदारांकडूच कायदा व सुव्यस्थेचा मुद्दा उपस्थित झाल्याने विरोधकांना आयते कोलित सापडलेले असतानाच आता सत्तापक्षातील शिवसेनेने थेट आमदार क्षीरसागर यांच्यावर शरसंधान केले आहे. क्षीरसागरांकडून जिल्ह्याची नाहक बदनामी होत आहे, आगामी आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या अनुषंगाने क्रिकेट सट्ट्याविरोधात पोलिसांच्या कारवाईत खोडा घालण्यासाठी दबाव आणला जात आहे.

क्षीरसागरांच्या विनंतीला पोलिसांनी दाद न दिल्यानेच पोलिसांच्या विरोधात तक्रारी सुरु असल्याचे त्यांनी या निवेदनात म्हटले आहे. सट्टा लावणारे व घेणारे आमदारांच्या जवळचे आहेत. मतदारसंघात खाजगी सावकारकी करून पैसे वसूल करणारे क्षीरसागरांचे मित्र व खंदे समर्थक असल्याचा आरोपही सचिन मुळूक यांनी केला आहे. या सावकारांच्या विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार आल्यानंतर क्षीरसागर हेच कारवाई होऊ देत नाहीत. पोलिसांनी त्यांच्या दबावात रहावेत यासाठी त्यांनी लक्षवेधी उपस्थित करून पोलिसांवर आरोप केले.

तसेच, अवैध वाळू उपसा संदर्भात यांनी केलेले वक्तव्य हे हास्यास्पद आहे. त्यांचे समर्थक असलेले माजी आमदार सय्यद सलीम यांच्या भावाच्या नावे दोन वाळूचे ठेके आहेत. ठेके मिळवून देण्यासाठी क्षीरसागर यांनी पाठपुरावा केलेला आहे. अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांविरोधात कारवाई झाली की वाहने सोडण्यासाठी क्षीरसागर हे पोलिस व महसूल प्रशासनाला फोन करतात. गंभीर गुन्हे दाखल असलेल्या गुंड प्रवृत्तीचे लोक क्षीरसागर यांच्यासोबत उघडपणे फिरताना सर्वसामान्यांनी पाहिलेले आहे.

सर्वच अवैध धंद्यात यांचे समर्थक व स्वतः आहेत, त्यांनीच बेजबाबदारपणाने लक्षवेधी उपस्थित करून बीड जिल्ह्याची नाहक बदनामी केली. यावरून ते अकार्यक्षम लोकप्रतिनिधी ठरले आहेत. यापूर्वी देखील त्यांनी शिवसैनिकांच्या प्रत्येक कामात सातत्याने अडथळे निर्माण करून त्रास दिला आहे. या विषयाची गंभीर नोंद घ्यावी, अशी मागणीही सचिन मुळूक यांनी निवेदनात केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT