Mp Chikhlikar-Mla Rajurkar Nanded
Mp Chikhlikar-Mla Rajurkar Nanded Sarkarnama
मराठवाडा

आमदार राजूरकर म्हणतात, प्रताप चिखलीकर ज्यांचा धनी, त्यांच्या मागे शनि..

जगदीश पानसरे

औंरंगाबाद ः देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराला आता वेग आला आहे. भाजपने शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांना पक्ष प्रवेशा आधीच उमेदवारी जाहीर करत पंढरपूर पॅटर्नची जोरदार तयारी सुरू केली आहे. तर काॅंग्रेसने जितेश अंतापूरकर यांना उमेदवारी देत सहानुभूतीचा फायदा उचलण्याची रणनिती अवलंबली आहे. काॅंग्रेसने प्रचाराला देखील सुरूवात केली असून सुभाष साबणे यांना भाजपमध्ये नेणाऱ्या खासदार प्रताप पाटील चिखलीकरांना लक्ष्य केले आहे.

एका प्रचार सभेत बोलतांना काॅंग्ेसचे विधान परिषदेतील आमदार व अशोक चव्हाण यांचे विश्वासू अमर राजूकर यांनी चिखलीकरांवर टीका केली. `ज्यांचा कुणाचा प्रताप चिखलीकर धनी आहे, त्यांच्या मागे कायम शनीच लागतो. शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे हे भाजपमध्ये गेले आहेत, त्यांना याचा प्रचिती लकवकरच येईल, असा टोला राजूकर यांनी लगावला.

देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना होण्याची शक्यता आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्यासाठी ही लढत प्रतिष्ठेची समजली जाते. दिवंगत आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे कोरोनामुळे झालेले निधन यामुळे लागलेल्या या पोटनिवडणुकीत सहानुभूतीचा फायदा काॅंग्रेसला जितेश अंतापूरकर यांना उमेदवारी दिल्यामुळे होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

तर दुसरीकडे भाजपने पंढरपूर प्रमाणेच देगलूर-बिलोली मतदारसंघात देखील महाविकास आघाडीला झटका देण्याची तयारी चालवली आहे. त्याचाच एक भाग म्हणून सुभाष साबणे यांचा भाजपमधील प्रवेश व उमेदवारीकडे पाहिले जाते. १९९९ आणि २००४ अशा सलग दोनवेळा साबणे यांनी मुखेड मतदारसंघातून विजय मिळवला होता. या नंतर त्यांनी २०१४ मध्ये देगलूर-बिलोलीतून निवडणूक लढवली आणि काॅंग्रेसच्या रावसाहेब अंतापूरकर यांचा साडेआठ हजार मतांनी पराभव केला होता.

तर पुढच्या म्हणजेच २०१९ च्या निवडणुकीत अंतापूरकर यांनी या पराभवाची परतफेड करत साबणे यांच्यावर २२ हजाराहून अधिक मतांनी विजय मिळवला होता. साबणे पोटनिवडणुकीत पुन्हा नशीब आजमावू इच्छित होते, मात्र राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्यामुळे ही जागा काॅंग्रेसलाच मिळणार हे स्पष्ट होते. त्यामुळे साबणे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपला देखील साबणे यांच्या रुपाने तगडा उमेदवार मिळाला. त्यामुळे अशोक चव्हाण यांना धक्का देण्यासाठी भाजप आपली पुर्ण ताकद या मतदारसंघात झोकून देण्याच्या तयारीत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT