Mla Sanipan Bhumre-Chandrakant Khaire News Aurangabad
Mla Sanipan Bhumre-Chandrakant Khaire News Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

ठाण्याला जाण्यासाठी बंगल्यावर आमदार जमले, अन् खैरे आले ; भुमरेंनी सांगितला किस्सा..

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले, शिंदे-फडणवीस सरकार येऊन एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मुख्यमंत्री झाले, तरी या बंडखोरी आणि सत्ता स्थापनेच्या सुरस कहाण्या काही केल्या थांबत नाहीयेत. बंडखोर आमदारांचे मुंबईत जाऊन होणारे शक्तीप्रदर्शन, मुख्यमंत्र्यांच्या सत्कारा निमित्त होणारी भाषणं यातून अनेक गोष्टीचा उलगडा होऊ लागला आहे.

शुरुवारी सिल्लोड-सोयगाव मतदारसंघाचे आमदार अब्दुल सत्तार यांनी मुंबईत जोरदार शक्तीप्रदर्शन करत मुख्यमंत्र्यांचा सत्कार केला. (Shivsena) या सत्कार सोहळ्यात ` मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही` असे म्हणत भुमरे यांनी केलेल्या अर्धा तास भाषणाची व त्यामधील रंजक गोष्टीची चांगलीच चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

एकनाथ शिंदे यांनी सगळ्या आमदारांना फोन करून ठाण्याला बोलावले होते, त्या सगळ्यांना घेऊन येण्याची जबाबदारी संदीपान भुमरे यांच्यावर सोपवली होती. भुमरे यांनी एक-एक आमदारांना फोन करून मुंबईतील आपल्या बंगल्यावर बोलवले होते. इथून कसे, कुठे जायचे याची चर्चा आमदारांसोबत सुरू असतांनाच तिथे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) दाखल झाल्याचा गौप्यस्फोट भुमरे यांनी आपल्या भाषणात केला.

या शिवाय अनेक नव्या गोष्टी त्यांच्या भाषणातून उलगडल्या. भुमरे यांनी आपल्या भाषणात एकनाथ शिंदेवर नुसती स्तुती सुमने उधळली नाही, तर त्याचा अक्षरशः वर्षावच केला. भुमरे म्हणाले, मी पाचवेळा निवडून आलेलो आमदार आहे, कॅबिनेट मंत्रीही होतो. आतापर्यंत सात-आठ मुख्यमंत्री पाहिले, पण एकनाथ शिंदे सारखा, कार्यकर्त्यांसाठी रात्री १ वाजता मेळाव्याला येणारा हा एकमेव मुख्यमंत्री असेल.

आम्ही मंत्री, पाच टर्म आमदार असून देखील शिंदे यांच्यासोबत गेलो कारण आम्हाला एक सामान्य शिवसैनिक मुख्यमंत्री होतांना पहायचे होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे देखील तेच स्वप्न होते, आज ते प्रत्यक्षात उतरले आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत पक्षातून बाहेर पडण्याचा आणि मुंबईतून बाहेर पडल्यानंतर ठाणे, सुरत, गुवाहाटी आणि गोवा या दरम्यानचा प्रवास कसा झाला हे भुमरेंनी उलगडून सांगितले.

भुमरे म्हणाले, एकनाथ शिंदे यांच्या मनात काय आहे हे कुणालाही माहित नव्हते. विधान परिषद निवडणुकीसाठीचे मतदान झाल्यानंतर आम्ही विधानभवनातून बाहेर पडलो. मी माझ्या शासकीय बंगल्यावर गेलो आणि मला शिंदे साहेबांचा फोन आला. त्यांनी मला विचारले तुम्ही कुठे आहात, मी सांगितले बंगल्यावर आहे. तेव्हा ते म्हणाले, आपल्या इतर सहकाऱ्यांना फोन करा आणि सगळे ठाण्याला या. कशासाठी हे विचारले नाही आणि मी इतर आमदारांना फोन करायला सुरूवात केली.

अब्दुल सत्तारांनाही फोन केला त्यांनतर एक एकजण माझ्या बंगल्यावर येऊ लागले. सगळे जमले की ठाण्याला निघायचे या तयारीत आम्ही होतो. पण अचानक आमचे नेते चंद्रकांत खैरे माझ्या बंगल्यावर आले. मला म्हणाले, भुमरे मंत्री झाले पण मला बंगला दाखवला नाही, जेवायला बोलवले नाही, चला मला बंगला दाखवा. आता मला प्रश्न पडला काय करावे ? सत्तार यांना माझ्यासोबत पाहून तर त्यांना जास्त आनंद झाला.

कारण काही महिन्यांपुर्वी आमच्यात कुरबुर झाली होती. पण आम्ही दोघे एकत्र आहे म्हटल्यावर खैरे साहेब म्हणाले, बरं झालं तुमचं मिटलं. या आनंदात खैरेंनी एक पोळी जास्त खाल्ली. आम्हाला ठाण्याला जायची घाई होती. कसतरी आम्ही खैरे गेल्यानंतर तिथून निघालो आणि थेट ठाण्याला पोहचलो. मग शिंदे साहेबानी मला, सत्तारला त्यांचा गाडीत बसवून घेतले. कुठे जायचे माहित नव्हते, शिंदेसाहेबांना विचारायची कुणाची हिमंत नव्हती.

ठाण्याच्या पुढे नाकाबंदी होती, तिथून सुखरूप निघालो आणि आमच्या गाड्या वसई-विरारच्या पुढे निघाल्या. तेव्हा आम्हाला अंदाज आला की आपण कुठे तरी बाहेर चाललो आणि काही वेळातच आमच्या गाड्या सुरतच्या दिशेने निघाल्या. गाडीत असतांनाच सत्तार यांच्या फोनवर एका व्हिआयपी क्रमाकांवरून फोन आला. तो उचलावा की नाही, याचा विचार ते करत होते, मी म्हणालो उचला आणि तो फोन होता उद्धव साहेबांचा.

त्यांनी विचारले सत्तार कुठे आहात, आताच्या आता वर्षावर या, पण सत्तार यांनी मी वसई-विरारला माझ्या मतदारसंघातील जिल्हा परिषद सदस्य काकासाहेब मोटे यांच्याकडे चाललो आहे, यायला वेळ लागेल असे सांगितले. तेव्हा तुमच्या बरोबर कोणकोण आहे, असे उद्धव साहेबांनी सांगितले. पण सत्तार यांनी मी एकटाच आहे असे सांगितले आणि फोन ठेवला, असेही भूमरे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT