Marathwada Graduate Constituency_Satish Chavan, Pratap Singh Patil, Dilip Ghuge 
मराठवाडा

MLC Election 2026: महायुती-महाविकास आघाडीतील बंड कायम राहिल्यास मराठवाडा पदवीधर मतदारसंघात पंचरंगी लढत

MLC Election 2026: मराठवाडा पदवीधर मतदारसंघात आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक राजकीय घडामोडी घडल्या. महायुती-महाविकास आघाडीने आपल्या अधिकृत उमेदवारांची घोषणा केल्यानंतरही दोन्ही बाजूने बंडाची ठिणगी पडल्याचे दिसून आले.

Jagdish Pansare

Marathwada Graduate Constituency: मराठवाडा पदवीधर मतदारसंघात आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक राजकीय घडामोडी घडल्या. महायुती-महाविकास आघाडीने आपल्या अधिकृत उमेदवारांची घोषणा केल्यानंतरही दोन्ही बाजूने बंडाची ठिणगी पडल्याचे दिसून आले. महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तीन टर्म आमदार राहिलेले सतीश चव्हाण यांच्याविरोधात भाजपाच्याच एम. के. देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल करत नेत्यांचे टेन्शन वाढवले आहे. तर तिकडे महाविकास आघाडीतही याचे पडसाद उमटल्याचे दिसून आले.

शिवसेना उद्धव बाळसाहेब ठाकरे पक्षाचे दिलीप घुगे यांच्या नावाची आघाडीकडून अधिकृत घोषणा झालेली असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी उमेदवारी दाखल केली आहे. याशिवाय मराठवाडा शिक्षक संघाचे सुशील घोटे हे देखील मैदानात आहेत. अर्थात उमेदवारी अर्ज माघारीची मुदत ९ ऑक्टोबर असल्यामुळे खरे चित्र त्यानंतरच स्पष्ट होणार आहे. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशीचे चित्र पाहता मराठवाडा पदवीधर मतदारसंघात पंचरंगी लढत होऊ शकते. यात महायुतीचे सतीश चव्हाण, बंडखोर एम. के. देशमुख, ठाकरेंच्या शिवसेनेचे दिलीप घुगे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रतापसिंह पाटील आणि मराठवाडा शिक्षक संघाचे सुशील घोटे हे प्रमुख उमेदवार आहेत.

राष्ट्रवादी चौकार ठोकणार?

महायुतीमध्ये मराठवाडा पदवीधरची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुटली आहे. सतीश चव्हाण हे या मतदारसंघाचे गेल्या अठरा वर्षापासून प्रतिनिधित्व करत आहेत. सर्वाधिक मजबूत आणि अनुभवी उमेदवारांपैकी एक म्हणून ते ओळखले जातात. 18 वर्षे या मतदारसंघातील पदवीधर मतदारांशी त्यांचा थेट संपर्क आहे. याशिवाय शिक्षण क्षेत्राशी त्यांचा दीर्घकाळ संबंध राहिला आहे.

यंदा त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस सोबतच भाजप, शिवसेना आणि महायुतीतील घटक पक्षांचा संघटनात्मक फायदा मिळण्याची शक्यता आहे. चव्हाण हे ग्रामीण भागातील राजकीय-सामाजिक पार्श्वभूमी असलेले नेते आहेत. मात्र त्यांच्या मतांची ताकद केवळ एका समाजापुरती मर्यादित नसून पदवीधरांमधील दीर्घकालीन वैयक्तिक संपर्क, शिक्षण क्षेत्रातील संबंध आणि राष्ट्रवादीची पारंपरिक संघटनात्मक ताकद ही त्यांची बलस्थान आहेत.

देशमुखांचे बंड महाग ठरणार

भाजपाच्या एम. के. देशमुख यांनी बंडाचे निशाण हाती घेत आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. आता ते हे निशाण कायम ठेवतात? की त्याचे रुपांतर पांढऱ्या निशाणात होते हे ९ तारखेला स्पष्ट होईल. पण देशमुखांनी उमेदवारी कायम ठेवली तर ती सतीश चव्हाण यांना ते महाग ठरू शकतं. एम. के. देशमुख हे माजी शिक्षणाधिकारी आहेत. 2024च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी ते निवृत्त झाले होते. त्यावेळी त्यांनी अतुल सावे यांच्याविरोधात निवडणूक लढवण्याची तयारी केली होती, मात्र नंतर माघार घेतली. पदवीधर मतदारसंघासाठी आपल्याला संधी देण्याचे आश्वासन मिळाले होते, असा त्यांचा दावा आहे.

त्यांची महत्त्वाची ताकद म्हणजे शिक्षण विभागातील प्रदीर्घ अनुभव आणि पदवीधर मतदारांमध्ये केलेली संघटनात्मक तयारी. देशमुख यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी वर्षभरात सुमारे दीड लाख मतदारांची नोंदणी केली आहे. त्यामुळे त्यांची उमेदवारी केवळ अचानक झालेली बंडखोरी नसून पूर्वतयारीवर आधारित असल्याचा त्यांचा दावा आहे. त्यांच्या राजकीय शक्तीचे प्रमुख केंद्र शिक्षण क्षेत्र, भाजपशी संबंधित कार्यकर्ते आणि पदवीधरांचे नेटवर्क आहे.

ठाकरेंचा शिलेदार दिलीप घुगे कोणाला नडणार?

सतीश चव्हाण यांच्यासारख्या तगड्या उमेदवाराविरुद्ध ठाकरेंच्या शिवसेनेने दिलीप घुगे या नव्या चेहऱ्याला संधी दिली आहे. चव्हाण यांच्याविरोधातील मते आपल्या बाजूने खेचण्याची रणनिती आणि मराठा विरुद्ध ओबीसी या मराठवाड्यातील वातावरणाचा फायदा उचलण्याचा प्रयत्न यातून केल्याचे दिसते.

दिलीप घुगे हे हिंगोलीचे असून ठाकरेंच्या पक्षाने त्यांच्यावर डाव लावला आहे. उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार त्यांना उमेदवारी देण्यात आली आणि अर्ज भरताना चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे यांच्यासह पक्षातील प्रमुख नेते उपस्थित होते. त्यांची ताकद प्रामुख्याने ठाकरे शिवसेनेची मराठवाड्यातील संघटनात्मक यंत्रणा, शिवसेनेचा पारंपरिक मतदार आणि हिंगोलीसह ग्रामीण भागातील संपर्क यावर अवलंबून राहणार आहे.

विशेष म्हणजे सतीश चव्हाण यांच्याविरोधात 18 वर्षांच्या प्रतिनिधित्वाचा मुद्दा उपस्थित करून त्यांनी आक्रमक प्रचाराची दिशा निश्चित केली आहे. त्यामुळे तरुण पदवीधर, बेरोजगारी, शिक्षण आणि पेपरफुटी यांसारख्या प्रश्नांवर ते मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करू शकतात.

पाटलांची उमेदवारी चव्हाणांना ताप

महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने डॉ. प्रतापसिंह पाटील यांना उमेदवारी देऊन अर्ज भरायला लावला आहे. आघाडीचे अधिकृत उमेदवार दिलीप घुगे यांच्याविरोधात हे बंड असल्याचे दिसत असले तरी त्यांचे टार्गेट हे महायुतीचे सतीश चव्हाण हेच असणार आहे. पाटील यांनी उमेदवारी कायम ठेवली तर याचा सर्वाधिक ताप हा सतीश चव्हाण यांना होण्याची शक्यता आहे.

डॉ. प्रतापसिंह पाटील यांची उमेदवारी ही महाविकास आघाडीतील अंतर्गत मतविभाजनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. ठाकरे गटाने दिलीप घुगे यांना उमेदवारी दिल्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीने प्रतापसिंह पाटील यांना रिंगणात उतरवले आहे. पाटील यांनी लातूर, हिंगोली आणि नांदेडमध्ये संपर्क दौरे सुरू केल्याचे यापूर्वीच समोर आले होते.

त्यांची ताकद म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीची ग्रामीण भागातील पारंपरिक संघटनात्मक रचना आणि राष्ट्रवादीशी संबंधित कार्यकर्त्यांशी असलेला संपर्क. मात्र सतीश चव्हाण हे याच राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे तीन वेळचे विद्यमान प्रतिनिधी असल्याने राष्ट्रवादीच्या मतांमध्ये किती विभागणी होते, हे निर्णायक ठरू शकते.

घोटे-पाटलांना संघटनांची ताकद मिळणार?

मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत शिक्षक संघटनांची भूमिका कायम महत्त्वाची राहीली आहे. प्रत्येक निवडणूकीत या संघटनेकडून उमेदवारही दिला जातो. पण त्यांचा प्रभाव निकाल बदलू शकेल एवढा कधीच राहिला नाही. या निवडणुकीतही सुशील घोटे यांना संघटनेने मैदानात उतरवले आहे.

सुशील घोटे-पाटील यांची उमेदवारी इतर चार उमेदवारांपेक्षा वेगळी आहे. ते मराठवाडा शिक्षक संघाचे अधिकृत उमेदवार आहेत. संघटनेने त्यांच्या उमेदवारीच्या पार्श्वभूमीवर जालना येथे कार्यशाळाही घेतली असून शिक्षकांचे प्रश्न, शिक्षणाची गुणवत्ता, शिक्षकांचे अधिकार आणि संघटनात्मक बांधणी यावर भर देण्यात आला.

त्यांच्याकडे पारंपरिक पक्षीय मतपेढीपेक्षा शिक्षक, शिक्षण क्षेत्रातील कर्मचारी आणि संघटनेचे कार्यकर्ते हे प्रमुख राजकीय भांडवल आहे. पदवीधर मतदारसंघातील मोठ्या संख्येने शिक्षण क्षेत्राशी संबंधित मतदारांपर्यंत पोहोचण्याची क्षमता ही त्यांची ताकद आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT