Prakash Mahajan Meet Chandrakant Khaire News  Sarkarnama
मराठवाडा

Prakash Mahajan Meet Chandrakant Khaire : मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी घेतली चंद्रकांत खैरे यांची भेट!

MNS leader Prakash Mahajan met Shiv Sena's Chandrakant Khaire in Chhatrapati Sambhajinagar : चंद्रकांत खैरे या जिल्ह्याचे वीस वर्षे खासदार होते, त्यांचा अनुभव दांडगा आहे. या मोर्चाच्या निमित्ताने त्यांचे मार्गदर्शन घेण्यासाठी ही भेट असल्याचे प्रकाश महाजन यांनी म्हटले आहे.

Jagdish Pansare

Shivsena-MNS News : हिंदी भाषेच्या सक्ती विरोधात येत्या पाच जुलै रोजी मुंबईत मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने एकत्रित मोर्चा काढण्यात येणार आहे. राज्याच्या राजकारणामध्ये दोन ठाकरे बंधू एकत्र येणार का? यावर गेल्या महिनाभरापासून चर्चा सुरू आहे. या मोर्चाच्या निमित्ताने राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याचा योग जुळून आला आहे. राज्यातील हे दोन मोठे नेते एकत्र येण्याच्या चर्चेने त्याचे चांगले परिणाम जिल्हा, तालुका आणि गाव पातळीवरही दिसू लागले आहेत.

छत्रपती संभाजीनगरमध्ये मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी आज शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. नितेश राणे यांनी राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चेवर खिल्ली उडवणारे वक्तव्य केले होते. त्यावेळी प्रकाश महाजन यांनी त्यांना शिंगावर घेत क्रांतीचौकात दंड थोपटत आव्हान दिले होते. त्यानंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते तथा शिवसेनेचे जिल्ह्यातील दुसरे नेते अंबादास दानवे यांनी प्रकाश महाजन यांच्या घरी जाऊन त्यांचे अभिनंदन करत भेट घेतली होती.

आता तेच प्रकाश महाजन चंद्रकांत खैरे यांच्या भेटीला आल्याने शिवसेना- मनसे (MNS) एकत्र येण्याच्या हालचालींना वेग आल्याचे बोलले जात आहे. हिंदी भाषेच्या सक्ती विरोधात मुंबईत निघणाऱ्या मोर्चा संदर्भात चंद्रकांत खैरे यांच्याशी चर्चा करण्यासाठी आपण आलो आहोत. चंद्रकांत खैरे या जिल्ह्याचे वीस वर्षे खासदार होते, त्यांचा अनुभव दांडगा आहे. या मोर्चाच्या निमित्ताने त्यांचे मार्गदर्शन घेण्यासाठी ही भेट असल्याचे प्रकाश महाजन यांनी म्हटले आहे.

तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन भाऊ एकत्र यावेत, अशी राज्यातील तमाम मराठी माणसांची इच्छा आहे. मुंबईतील मोर्चाच्या निमित्ताने ही इच्छा पूर्ण होताना दिसते आहे. प्रकाश महाजन आणि माझी भेट ही आमची वैयक्तिक भेट नाही तर ठाकरे परिवारातील सदस्य म्हणून घेतलेली भेट आहे. मी काही दिवसांपूर्वी पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी गेलो होतो तिथे मिळालेला प्रसाद मी आज प्रकाश महाजन यांना दिला. या प्रसादाच्या साक्षीनेच राज्यात राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील, अशी आम्हा सर्वांना अपेक्षा असल्याचे चंद्रकांत खैरे म्हणाले.

वो बडा अहेमद, राणेंना टोला..

प्रकाश महाजन यांनी राणे कुटुंबाला अंगावर घेत जशास तसे उत्तर दिले त्याबद्दलही मी त्यांचे अभिनंदन केले आहे. मुंबईतील मोर्चा यशस्वी करण्यासाठी आम्ही दोघे मिळून प्रयत्न करणार आहोत. ठाकरे ब्रँड संपला अशी टीका नितेश राणे यांनी केल्याचे महाजन यांच्या लक्षात आणून दिले असता 'अरे वो बडा अहेमद है' असा टोला त्यांनी लगावला.

ठाकरे ब्रँड संपला म्हणणाऱ्यांना पाच तारखेला कळेल, असा सूचक इशाराही प्रकाश महाजन यांनी या भेटीत दिला. राज आणि उद्धव ठाकरे हे दोन भाऊ एकत्र यावेत अशी राज्यातल्या मराठी माणसांची इच्छा आहे. त्यांनी मनापासून देवाला प्रार्थना केली आहे, म्हणतात ना मनापासून केलेली प्रार्थना देव ऐकतो ती त्याने ऐकली असेच या निमित्ताने म्हणावे लागेल असेही प्रकाश महाजन म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT