Bharat Jodo Rally in Maharashtra News
Bharat Jodo Rally in Maharashtra News Sarkarnama
मराठवाडा

Bharat Jodo : मोदीजी तुमच्या खिशातले पैसे काढून उद्योगपतींच्या घशात घालतायेत..

Jagdish Pansare

नांदेड : आपल्या देशात पैशाची कमी नाही, पण तुमच्या खिशातला पैसा मोदीजी पाण्याची मोटार लावून जसे पाणी काढून घेतले जाते तसा काढून दोन-तीन उद्योगपतींच्या खिशात घालत आहेत, असा आरोप काॅंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला. भारत जोडो यात्रेदरम्यान, नांदेडमध्ये आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. नोटबंदी, जीएसटीमुळे लोकांचा रोजगार गेला. हिंदुस्थानचा कणा असलेला छोटा व्यापारी, शेतकरी देशोधडीला लागला, त्यांना संपवलं गेलं असेही ते म्हणाले.

तेलंगणातून महाराष्ट्रात दाखल झालेल्या भारत जोडो यात्रेचा नांदेड जिल्ह्यात आज चौथा दिवस होता. या निमित्ताने आयोजित जाहीर सभेत (Rahul Gandhi) राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली. राहुल गांधी म्हणाले, महापुरूषांचा आदर आम्ही का करतो? कारण त्यांनी आपले आयुष्य तपस्येत घालवले. त्यांच्या मनात जो अंहकार होता तो त्या तपस्येने नाहीसा झाला. (Congress) मग या महापुरुषांचे लोकांशी एका वेगळ्या पद्धतीचे नाते निर्माण झाले. त्याचा आम्ही आदर करतो. म्हणून आम्ही त्यांच्यासमोर नतमस्तक झालो.

हा देश तपस्वींचा आहे, ज्यांच्या समोर आम्ही हात जोडतो ते सगळे तपस्वी आहेत. गांधीजी, शिवाजी महाराज, सरदार पटेल यांचे कार्य देखील तसेच होते. या महापुरुषांप्रमाणेच देशातील शेतकरी, मजदुर, छोटा व्यापारी देखील तपस्या करतो. पण आज देशात त्याला आपल्या तपस्येचे फळ मिळत नाही. मोदींनी काही वर्षापुर्वी नोटबंदी केली, २८ टक्के जीएसटी आकरण्याचा निर्णय घेतला. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा शेतकऱ्यांवर, त्यांच्या अवजारांवर कर लावला गेला. सध्या भारत जोडोच्या निमित्ताने मी चालतोय. माझ्या दृष्टीने चालणे सोपे आहे, तुमचे प्रेम, शक्ती आम्हाला पुढे घेऊन जाते आहे.

सकाळी सहा वाजेपासून चालतोय, पण थकवा नाही, आश्चर्य आहे. कारण हिंदुस्थानची शक्ती आमच्या पाठीशी आहे. रस्त्यावर चालतोय, तुम्हाला भेटतोयं. तुमचं ऐकतोय, खूप कळतंय. जमीनीवर, रस्त्यावर, लहान मुलांमध्ये स्वप्न आहे. पण त्यांच्याकडे साधनं नाहीत. कारण देशाचा सगळा पैसा दोन-तीन उद्योगपतीच्या हातात जातोय. शेतकऱ्यांच्या बाबतीत देखील तेच होतयं. हमीभाव मिळत नाही, कर्ज माफ होत नाही. मजुरांना पैसा मिळत नाही, काम मिळत नाही.आपल्या देशात पैशाची कमी नाही, शेतातील मोटारी प्रमाणेच पंप लावून तुमच्या खिशातून पैसा काढला जातोय. बटन ते दाबतात, असा टोला देखील राहूल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांना लगावला.

नोटबंदी, जीएसटीने देशाचा कणा मोडला..

नोटबंदी, जीएसटीमुळे लोकांचा रोजगार गेला. हिंदुस्थानचा कणा असलेला छोटा व्यापारी, शेतकरी देशोधडीला लागला. त्यांना संपवलं गेलं. काळे धन आणण्याचा नावाखाली हिंदूस्थानचा कणाच मोडला. सहा वर्ष झाली काळा पैसा नाहीसा झाला का? नाही तो वाढला. महाराष्ट्रातून जसे मोठे प्रकल्प गायब होत आहेत, तसेच पंधरा लाख गायब झालेत.

यांची धोरणं लोकांना घाबरवतात. शेतकऱ्यांला हमीभाव मिळाला नाही, कर्ज मिळाले नाही तर तो घाबरतो. तसेच तरुणांना शिक्षण घेऊनही काम दिले जात नाही तेव्हा तो घाबरतो. या भितीला मोदी द्वेषात बदलतात. याच्याविरोधात आम्ही भारत जोडो यात्रा सुरू केली आहे.कन्याकुमारी पासून कश्मिरपर्यंत ३६०० किलोमीटर पायी. आता आम्हाला कोणी रोखू शकत नाही, आम्ही श्रीनगरमध्ये जाऊन तिरंगा फडकवणारच असेही राहुल गांधी म्हणाले.

तुमची शक्ती आम्हाला मिळते म्हणून मी तुमचा आभारी आहे. केदारनाथ दर्शनाला पायी गेले तेव्हा मंदिरात भेटलेल्या आरएसएसच्या नेत्याचा एक किस्सा सांगत त्यांनी काॅंग्रेस आणि आरएसएसच्या विचारसरणीतील फरक सांगितला. ते म्हणाले मी एकदा केदारनाथला गेलो तेव्हा मुख्यमंत्री म्हणाले, हेलीकाॅप्टरने जावे लागेल. मी म्हणालो हेलीकाॅप्टरने नाही, पायी जाणार. कारण मी शिव मंदिरात जाणार तर हेलीकाॅप्टरमध्ये कसा.

तपस्वीच्या दर्शनाला मी १५ किलोमीटर जाऊ शकत नाही का? आणि मी पायी गेलो. मंदीरात जात असतांना आरएसएसचे नेते भेटले. मी त्यांना नमस्कार केला, त्यांचे वजन शंभर किलो होते, मंदिरात जातांना त्यांच्यासोबत एक नोकर होता. त्यांच्या डोक्यावर मोठी टोपली होती. ज्यामध्ये फळं होती. मी विचारले हे काय? ते म्हणाले, मी हे महादेवांना वाहणार आहे. मी म्हणालो हे तुम्ही नाही, तुमचा नोकर घेवून आला.

ते म्हणाले, तुम्ही कसे आले, मी म्हणालो चालत. मी विचारले तुम्ही कसे आलात, ते म्हणाले हेलिकाॅप्टरने. माझ्या मनात विचार आला एका तपस्वीच्या दर्शनाला हेलिकाॅप्टरने कसे? पण मी काही विचारले नाही, मंदिरात जाऊन हात जोडले, पूजा केली. बाहेर आल्यावर ते मला म्हणाले. तुम्ही शिवजीकडे काय मागितले. मी त्यांना विचारले तुम्ही काय मागितले. ते म्हणाले राहुल मी प्रकृती चांगली व्हावी हे मागितले.

मी विचार केला शंभर किलोचे वजन, पायी दर्शनाला आला असतात तर प्रकृती सदृढ झाली असती. पण त्यांना ते समजले नसते म्हणून बोललो नाही. तुम्हाला सांगतो मी शिवजीचे आभार मानले की त्यांनी मला रस्ता दाखवला. हा फरक आहे काॅंग्रेस-आरएसएसमध्ये, गांधीजी आणि सावरकरांमध्ये. आम्ही बोलत नाही, करुन दाखवतो, असेही ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT