नवनाथ इधाटे
Phulambri Congress News : जिल्ह्यातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या फुलंब्री विधानसभा मतदारसंघात सध्या उमेदवारीसाठी सगळ्याच पक्षात स्पर्धा वाढली आहे. भाजपचे प्राबल्य असलेल्या या मतदारसंघात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे विद्यमान खासदार डाॅ. कल्याण काळे यांना लीड मिळाली होती. सलग पाच वेळा निवडून आलेल्या भाजपच्या रावसाहेब दानवे यांचा पराभव करत काळेंनी लोकसभेच्या जालना मतदारसंघात विजय मिळवल्याने काँग्रेसमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
या उत्साहाच्या भरातच फुलंब्रीतून लढणास इच्छुकांची यादी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. खासदार कल्याण काळे यांचे बंधु जगन्नाथ काळे यांनी भावाकडे वाढदिवसाचे रिटन गिफ्ट म्हणून फुलंब्रीतून विधानसभेच्या उमेदवारी मागितली. (Kalyan Kale) पण मी कोणालाही उमेदवारी देऊ शकत नाही, आधी शिफारस केली उमेदवारी मिळायची. पण आता तशी परिस्थिती राहिलेली नाही, पक्षाने केलेल्या सर्व्हेत जो सगळ्यात पुढे असेल त्यालाच उमेदवारी मिळेल, असे थेट सांगत काळे यांनी नकारघंटा वाजवली.
भाऊ खासदार झाल्यामुळे आपल्या आमदारकीचा मार्ग मोकळा झाला, असा समज करून घेत जगन्ननाथ काळे यांनी मतदारंसघात भावी आमदार म्हणून मिरवायला सुरुवात केली होती. पण कल्याण काळे यांनी त्यांच्या भ्रमाचा भोपळा अशा प्रकारे जाहीरपणे फोडल्याने तालुक्यात याची चर्चा होत आहे.
जगन्नाथ काळे यांचा उमेदवारीवरील दावा पाहता इतर इच्छुकांना धाकधूक होती. (Congress) पण काळे यांनी मी कोणालाही उमेदवारी देऊ शकत नाही, असे स्पष्ट करत भावाचाच पत्ता कट केल्याने इतर इच्छुकांच्या मात्र आशा पल्लवित झाल्या आहेत.
फुलंब्री विधानसभा मतदारसंघात दोन महत्वाच्या राजकीय घडामोडी गेल्या दोन महिन्यात घडल्या आहेत. भाजपचे वरिष्ठ नेते हरिभाऊ बागडे हे राजस्थानचे राज्यपाल म्हणून गेले, तर डाॅ. कल्याण काळे जे फुलंब्री विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे प्रबळ दावेदार होते, त्यांना पक्षाने लोकसभेची उमेदवारी दिली आणि ते निवडूनही आले.
बागडे-काळे यांचा मोठा अडसर त्या त्या पक्षातील इच्छुकांसाठी होता, तो आता दूर झाला आहे. वर्षानुवर्ष तेच चेहरे पाहून कंटाळलेल्या मतदारांना आता नव्या चेहऱ्याला संधी देता येणार आहे. घराणेशाही, वशिलेबाजीला फाटा देत फुलंब्रीकर कोणता नवा चेहरा विधानसभेला निवडून पाठवतात? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.