Ambadas Danve News  Sarkarnama
मराठवाडा

Ambadas Danve News : चंद्रकांत खैरेंची जागा दानवेंनी घेतली! महावितरणमधील बैठकीची पंरपरा सुरू..

Following the defeat of Chandrakant Khaire, the long-halted MSEDCL (Mahavitaran) meeting tradition has resumed, with Ambadas Danve reviewing the department’s progress and planning. : चंद्रकांत खैरे यांनी वीस वर्ष खासदार असताना दर महिन्याला महावितरण कार्यालयात बैठका घेतल्या. शंभरहून अधिक बैठका त्यांनी घेतल्या होत्या.

Jagdish Pansare

Shivsena UBT : शिवसेना नेते चंद्रकांत खैरे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे चार टर्म खासदार होते. या काळात ते नियमित महावितरण कार्यालयात विद्युतीकरण विभागाची बैठक घ्यायचे. सर्वसामान्य नागरिकांसह, छोटे-मोठे व्यापारी, उद्योजक, व्यावसायिक, कंत्राटदार अशा सगळ्यांच्या अडीअडचणींवर चर्चा आणि जागेवर मार्ग अशी या बैठकीची ख्याती होती. सलग दोन लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यापासून या बैठकीची परंपरा खंडीत झाली होती.

जिल्ह्यातील शिवसेनेचे दुसरे नेते तथा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी ही परंपरा पुन्हा सुरू केली आहे. महावितरण कार्यालयात बैठक घेत त्यांनी आढावा घेतला. आगामी विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर अंबादास दानवे यांनी ही बैठक घेतली असली तरी खैरे यांची जागा दानवेंनी घेतल्याची चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे.

जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या अनेक वर्षापासून खैरे विरुद्ध दानवे हा संघर्ष चर्चेचा विषय राहिला आहे. 2019-2024 अशा सलग दोन लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) हे मागे पडले आहेत. शिवसेनेत फूट पडल्यानंतर आणि अजूनही खैरे यांना एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून आॅफर येत आहेत. मात्र पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी निष्ठा कायम राखत ते पक्षात थांबून आहेत. त्यांचे राजकीय वजन कमी झाले, मातोश्रीवर त्यांचा आता दबदबा राहिला नाही, अशा चर्चा होत असतात.

दुसरीकडे अंबादास दानवे यांचे पक्ष फुटीनंतर खऱ्या अर्थाने नशीब फळफळले असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावर झालेली नियुक्ती दानवे यांना राज्याच्या राजकारणात बुस्ट देणारी ठरली. उद्धव ठाकरे यांच्या अधिक जवळ जाण्याची संधीही त्यांना यातून मिळाली. याचा पुरेपूर फायदा उचलत दानवे यांनी आपले पक्षातंर्गत विरोधक असलेल्या शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांना मागे टाकण्यात बाजी मारली. मराठवाड्यातील शिवसेनेचे नंबर एकचे नेते म्हणून ते पुढे येऊ लागले आहेत.

चंद्रकांत खैरे यांच्यावर पक्षाने लातूर-बीड सारख्या कुमकुवत असलेल्या जिल्ह्यांमध्ये संघटनात्मक ताकद वाढवण्याची जबाबदारी सोपवली आहे. एका अर्थाने जिल्ह्याच्या राजकारणापासून त्यांना दूर ठेवत अंबादास दानवे यांचा मार्ग सुकर करण्याचा हा प्रयत्न असल्याचे बोलले जाते. चंद्रकांत खैरे यांनी वीस वर्ष खासदार असताना दर महिन्याला महावितरण कार्यालयात बैठका घेतल्या. शंभरहून अधिक बैठका त्यांनी घेतल्या होत्या. त्यानंतर इम्तियाज जलील आणि आताचे संदीपान भुमरे यांनी अशी बैठक कधी घेतल्याचे ऐकिवात नाही.

अंबादास दानवे यांनी मात्र खैरे यांच्यानंतर खंडीत झालेली महावितरण कार्यालयातील आढावा बैठक घेत ती पुन्हा सुरू केल्याची चर्चा होऊ लागली आहे. दानवे यापुढेही नियमित बैठक घेतील की मग आगामी पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर घेतलेली ही बैठक ठरते हे लवकरच स्पष्ट होईल. खैरे यांच्या काळात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन नागरिकांचे प्रश्न जागेवर सोडवले जायचे. तसेच चित्र अंबादास दानवे यांच्या आजच्या बैठकीतही दिसले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT