Pankaja Munde News Sarkarnama
मराठवाडा

Pankaja Munde News : 19 कोटी थोबाडावर मारू म्हणणारे पंकजाताईंचे समर्थक लागले कामाला; कारखान्यासाठी चेकवर चेक

Datta Deshmukh

Beed Politics : भाजपच्या (BJP) राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या कारखान्यावर जीएसटी आयुक्तालयाने १९ कोटी रुपयांच्या जीएसटीप्रकरणी नोटीस बजावली आहे. यामुळे संतापलेले मुंडे समर्थक मदतीसाठीही सरसावले आहेत. अगदी एक लाख रुपयांपासून ५० लाख रुपयांपर्यंत मदतीचे धनादेश गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या नावाने लिहून तयार आहेत.

फक्त 19 कोटींसाठी आमचे दैवत मुंडे साहेबांचा आत्मा वैद्यनाथ कारखाना बदनाम करत असाल, तर... आम्ही मुंडे भक्त लोकवर्गणीतून ती रक्कम तुमच्या थोबाडावर फेकून मारू, अशी गर्जना या समर्थकांनी गेल्या आठवड्यात सोशल मिडीयातून केली होती. त्याला आता समर्थकांनी थेट मदतीच्या माध्यमातून पुढाकार घेतला आहे.

वैद्यनाथ कारखान्यावरील जीएसटीच्या कारवाईबद्दल सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी या कारवाईबाबत त्यांची भूमिका मांडली आहे. कारखान्याची आर्थिक अडचण, यामुळे त्यांच्याकडून होत असलेले प्रयत्न आणि कारखान्यावर ही अडचण का आली, याबाबत त्यांनी स्पष्ट सांगितले आहे. कारखान्याला मदत व्हावी आणि कारखाना अडचणीतून बाहेर यावा, यासाठी त्यांच्याकडून होत असल्याच्या प्रयत्नांचा परामर्षही त्यांनी घेतला.

राज्यातील विविध कारखान्यांना केंद्रीय सहकार विभागाने मदत केली असताना वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना (Sugar Factory) मात्र मदतीच्या यादीतून वगळला आहे. याबाबतदेखील पंकजा मुंडे यांनी भाष्य केले. दरम्यान, याच मुद्द्यावर मुंडे समर्थकांनी सोशल मीडियातून संताप व्यक्त केला होता. कारखान्यावर ज्या रमकेसाठी नोटिशीची कारवाई केली. त्यावर ही रक्कम आम्ही लोकवर्गणीतून जमा करू आणि ती थोबाडावर फेकून मारू, असे म्हणणारे समर्थक लाख रुपयांपासून ५० लाख रुपयांपर्यंत मदतीसाठी सरसावले आहेत.

आम्ही ऊसतोड मजुरांनी भगवानगड उभा केलाय, भगवान भक्तिगड, गहिनीनाथ गड उभा केलाय आणि गोपीनाथगडसुद्धा उभा केलाय...आमच्या दैवतांसाठी आम्ही प्रत्येक गावात कोटी दोन कोटी सहज दान देतो... तुमचा माज जिरवण्यासाठी आम्हाला दोन दिवससुद्धा लागणार नाहीत, असे आव्हानदेखील या पोस्टमधून दिले होते. फक्त आम्ही आदेशाची वाट पाहतोय... तुम्ही सगळ्यांना गृहीत धरून येड्यात काढू शकता, पण आमच्या नादी लागाल...तर तुम्ही परत दुर्बीण लावूनसुद्धा दिसणार नाहीत, असा गर्भित इशारा दिला होता. आता आगीत हात घातलाचा आहे तर परिणामांनाही तयार राहा, असे आव्हान देणाऱ्या समर्थकांनी मदतीच्या रकमेचे धनादेश गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या नावे लिहून तयार ठेवले आहेत.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT