माधव इतबारे
Chhatrapati Sambhajinagar news : शहराचा झपाट्याने विस्तार होत असताना सत्ताधाऱ्यांकडून विकासाचे वारंवार दाखले दिले जातात, पण नगरसेवकांसाठी आजही वॉर्डातील वॉटर, गटर, मीटर आणि कचरा हेच प्रश्न संपलेले नसल्याचे गुरुवारी झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारणच्या माध्यमातून स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे सभागृहात अनेक ज्येष्ठ नगरसेवक आहेत.
कोणाची चौथी तर कोणाची तिसरी टर्म आहे. पंधरा-वीस वर्ष सभागृहात असून देखील त्यांच्या वॉर्डातील प्राथमिक प्रश्नच अद्याप सुटलेले नाहीत का? असा प्रश्न कालचा गोंधळ पाहून पडल्याशिवाय राहत नाही. महापालिकेची मंगळवारी सर्वसाधारण सभा पार पडली. सकाळी ११ वाजता सुरू झालेली सर्वसाधारण सभा रात्री उशिरापर्यंत चालली.
साडेनऊ तास चालेल्या सर्वसाधारण सभेत जेवणाचा वेळ वगळता प्रशासनाने सादर केलेल्या प्रस्तावावर चर्चा झाली. पण नगरसेवकांना त्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी वेळच मिळाला नाही. त्यामुळे ही सभा तहकूब करून गुरुवारी घेण्यात आली. महापालिकेच्या तब्बल १२ विभागांचे प्रश्न नगरसेवकांनी उपस्थित केले होते. त्यातील फक्त तीन विषयावर सकाळी ११ ते सायंकाळी ७.३० पर्यंत चाललेल्या सभेत चर्चा झाली.
त्यात ड्रेनेज, पथदिवे आणि जिव्हाळ्याच्या पाण्याचा विषय होता. महापालिकेच्या गेल्या १५ ते २० वर्षांतील सर्वसाधारण सभा असो की स्थायी समितीची बैठक, प्रत्येक वेळी हेच विषय चर्चेत असतात. शहरात सुमारे १५०० कोटी रुपये खर्च करून ड्रेनेजची कामे केली जात आहेत. यापूर्वी ४६५ कोटी रुपये खर्च करून भूमिगत गटार योजनेचे काम करण्यात आले.
सध्या विधानसभेच्या चार मतदारसंघात सुमारे ८०० कोटींची कामे सुरू आहेत. राज्यातील सर्वात मोठी म्हणजेच २७४० कोटी रुपयांची पाणी योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यासोबत बीओटी तत्त्वावर राबविल्या जाणाऱ्या पथदिव्यांच्या योजनेसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात आहे. पण या चारही विषयांच्या समस्या आजही कायम आहेत.
दोन दिवस चाललेल्या सर्वसाधारण सभेनंतरही नगरसेवकांचे समाधान झाले नसल्याचे चित्र कायम आहे. विशेष म्हणजे सध्या सभागृहात अनेक जण तीन-चार टर्म नगरसेवक राहिलेले प्रतिनिधी आहेत. असे असताना त्यांच्या प्रभागातील हे विषय अद्याप मार्गी लावता आलेले नाहीत का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
सत्ताधाऱ्यांच्या अडचणी फार
महापालिकेत अनेक वर्षे शिवसेना-भाजपची सत्ता होती. यावेळी भाजपला शहरवासीयांनी बहुमत दिले पण शिवसेना सोबतच आहे. वर्षानुवर्षे सत्ता भोगणाऱ्या नगरसेवकांचेच प्रश्न जास्त असल्याचे सर्वसाधारण सभेच्या कामकाजात समोर आले आहे. सध्या महापौर, स्थायी समिती सभापती अशी महत्त्वाची पदे भाजपकडे आहेत, पण त्यांचेच नगरसेवक नागरी समस्यांमुळे त्रस्त असल्याने पदाधिकारी अपयशी ठरतात का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
प्रश्न मांडण्यात गैर काय?
जुन्या शहरातील काही स्पॉटवर ड्रेनेजची समस्या आहे. लाईन बदलेल्या नाहीत तर दुसरीकडे लोकसंख्या वाढली आहे. अशा ठिकाणी वारंवार तक्रारी करूनही अधिकारी काम करत नसतील तर नगरसेवक सभागृहात प्रश्न मांडतात. त्यात गैर काहीच नाही, असे महापौर समीर राजूरकर यांनी म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.