Chhatrapati Sambhajinagar News, Marathwada
Chhatrapati Sambhajinagar News, Marathwada Sarkarnama
मराठवाडा

Name Change News : नामांतराच्या मुद्यावर राजकारण, सत्ताधारी-विरोधकांमध्येच स्पर्धा..

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar : जिल्ह्याच्या राजकारणात गेली ३०-३५ वर्ष सत्तेसाठी हुकमी एक्का ठरलेला शहराच्या नामांतराचा प्रश्न एकदाचा निकाली निघाला. (Aurangabad) औरंगाबादचे संभाजीनगर असे नामकरण करण्याची मागणी करता करता शिवसेना-भाजपने महापालिकेवर २५ वर्ष सत्ता उपभोगली. तर गेल्या दहा वर्षात याच नावाला विरोध करत एमआयएम सारख्या पक्षाने काॅंग्रेस-राष्ट्रवादीला मागे टाकत महापालिकेत थेट विरोधी पक्षनेते पदापर्यंत मजल मारली.

राज्यातील सत्तांतर आणि राजकीय घडामोडीनंतर राजकीय पक्षांसाठी ट्रम्पं कार्ड ठरणारा नामांतराचा मुद्दा आता निकाली निघाला आहे. (Shivsena) तरी देखील याच मुद्यावर येणाऱ्या महापालिकेत आपले ईप्सीत साध्य करण्याचा प्रयत्न सत्ताधारी-विरोधकांकडून सुरू झाला आहे. (Aimim) शिवसेना, ठाकरे गट, भाजप आणि आता शहराच्या नामांतराला छुपा पाठिंबा देणारे काॅंग्रेस-राष्ट्रवादी देखील याचे श्रेय आणि राजकीय लाभ उठवण्याच्या तयारीत आहेत.

तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरच्या नावाला विरोध करत साखळी उपोषण सुरू करणाऱ्या एमआयएमसाठी देखील हा मुद्दा जॅकपाॅट ठरणार आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांना या मुद्यावरून आता राजकारण थांबवा असे आवाहन करत असले तरी त्यांच्यातच स्पर्धा सुरू असल्याचे चित्र आहे. शिवसेना-भाजप या हिंदुत्ववादी पक्षांसाठी जितका महत्वाचा हा मुद्दा होता, त्यापेक्षी कितीतरी अधिक एमआयएमसाठी एकगठ्ठा मतांचा पाऊस पाडणारा नामांतराचा मुद्दा ठरणार आहे.

त्यामुळेच खासदार इम्तियाज जलील यांनी नामांतरविरोधी कृती समितीच्या नावाखाली साखळी उपोषण सुरू केले आहे. आपल्या अनेक सामाजिक, राजकीय संघटनांचा पाठिंबा मिळत आहे असा दावा जरी एमआयएमकडून केला जात असला, तरी हा कार्यक्रम त्यांचा एकट्याचाच आहे हे काही लपून राहिलेले नाही. औरंगजेबाचे पोस्टर झळकल्यामुळे हा मुद्दा आता शहरापुरता मर्यादित न राहता राज्य, देशपातळीवर पोहचला आहे.

त्यामुळे एमआयएमला याचा फायदा केवळ महापालिकाच नाही, तर विधानसभा, लोकसभा निवडणुकीत देखील होवू शकतो. औरंगाबाद नावासाठी आग्रह धरत एमआयएमने आपली वोट बॅंक अधिक घट्ट कशी होईल याची काळजी घेतली आहे. तर दुसरीकडे नामांतराचे श्रेय शिंदेच्या शिवसेनेला किंवा भाजपला जावू नये, यासाठी ठाकरे गटाच्या नेत्यांकडून वारंवार ९ मे १९८८ च्या बाळासाहेब ठाकरे यांच्या सभेचा उल्लेख आणि त्यात औरंगाबादचे संभाजीनगर केल्याचा मुद्दा मांडला जात आहे.

याचाच अर्थ आताच्या सरकारने जरी नामांतरावर शिक्कामोर्तब केले असले, तरी याचे श्रेय आमचेच हे सांगण्याचा ठाकरे गटाकडून प्रयत्न सुरू आहे. भाजपने अद्याप याविषयात पुर्णपणे उडी घेतलेली नाही, शिंदेंची शिवसेना देखील वेट अॅन्ड वाॅचच्या भूमिकेत आहे. तर राष्ट्रवादी-काॅंग्रेसला उघडपणे भूमिका न घेता मुस्लिम मते आपल्याकडे परत वळतात का? याची प्रतिक्षा आहे. त्यामुळे नामांतराच्या या मुद्यावरून सध्या एमआयएम आणि ठाकरे गट हेच प्रखरपणे समर्थन आणि विरोध दर्शवतांना दिसत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT