ashok chavan, ravindra chavan Sarkarnama
मराठवाडा

Nanded district Bank election : काका-मामीला संचालक करण्यासाठी नांदेडच्या काँग्रेस खासदारांची धडपड : अशोक चव्हाणांशी हात मिळवणी केल्याची चर्चा

Political News : नांदेड जिल्हा बँकेसाठी 11 संचालक बिनविरोध निवडून आल्यानंतर उर्वरित बारा संचालकांसाठी काल मतदान पार पडले.

Jagdish Pansare

Nanded News : नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बिनविरोध निवडून आलेल्या संचालकांमध्ये काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण यांचे काका आणि मामी यांचाही समावेश आहे. विरोधी पक्षाचे खासदार असतानाही रवींद्र चव्हाण यांनी नांदेड जिल्हा बँकेत आपल्या नातेवाईकांना संचालक करण्यासाठी भाजपचे खासदार तथा राजकीय विरोधक अशोक चव्हाण यांच्याशी हात मिळवणी केल्याचा आरोप होत आहे.

यासंदर्भात स्थानिक काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी राज्य सहप्रभारी रेहाना चिश्ती यांच्याकडे खासदार रवींद्र चव्हाण यांच्या विरोधात तक्रारी केल्याची माहिती आहे. नांदेड जिल्हा बँकेसाठी 11 संचालक बिनविरोध निवडून आल्यानंतर उर्वरित बारा संचालकांसाठी काल मतदान पार पडले. सुरुवातीपासूनच जिल्हा बँकेची निवडणूक नात्यागोत्यातील संचालकांना निवडून आणण्यासाठी करण्यात आलेल्या खटाटोपामुळे चर्चेत होती.

माजी अध्यक्ष भास्कर पाटील खतगावकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर, भाजपचे खासदार अशोक चव्हाण, आमदार तुषार राठोड, राजेश पवार यांच्यासह सर्वच पक्षाच्या राजकीय नेत्यांनी जिल्हा बँकेच्या संचालक पदावर आपली किंवा आपल्या नातलगांची वर्णी लावली आहे. नेत्यांनी बिनविरोध संचालक पद काढून घेतल्यानंतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मात्र वाऱ्यावर सोडल्याची भावना उर्वरित उमेदवारांमध्ये निर्माण झाली आणि त्यातून 12 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. दरम्यान पडद्यामागे घडलेल्या अनेक घडामोडींमुळे आता नांदेड जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे.

2024 च्या लोकसभा निवडणुकीत राज्यात विशेषता मराठवाड्यात महायुती विरोधात असंतोषाची लाट होती. या लाटेत नांदेड लोकसभेची जागा काँग्रेसच्या वसंत चव्हाण यांनी जिंकली होती. दुर्दैवाने काही महिन्यातच त्यांचे आजारपणाने निधन झाले. त्यानंतरच्या पोटनिवडणुकीतही काँग्रेसने बाजी मारली. वसंत चव्हाण यांचे सुपुत्र रवींद्र चव्हाण यांना सहानुभूतीच्या लाटेचा फायदा झाला आणि ते खासदार झाले.

काँग्रेसने दोन वेळा ही जागा राखल्यानंतर अशोक चव्हाण यांना रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून कडवे आव्हान उभे केले जाईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र नुकत्याच झालेल्या विधान परिषद आणि त्यापूर्वीच्या नगरपालिका, नगरपंचायत, महानगरपालिका निवडणुकीत असा कुठलाही टोकाचा विरोध किंवा आव्हान काँग्रेस खासदार रवींद्र चव्हाण यांच्याकडून अशोक चव्हाण यांना झाल्याचे पाहायला मिळाले नाही. नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत तर काँग्रेसचा अशोक चव्हाण विरोध मावळल्यातच जमा आहे.

रवींद्र चव्हाण यांनी भाजप नेत्यांशी तडजोड करत आपले काका श्रीनिवास चव्हाण आणि मामी सुशीलाबाई बेटमोगरेकर यांना पहिल्या 11 बिनविरोध संचालकांमध्ये निवडून आणले. रवींद्र चव्हाण यांच्या स्वार्थी राजकारणावर स्थानिक पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत राज्य सहप्रभारी रिहाना चिस्ती यांच्याकडे तक्रार केल्याचे बोलले जाते. दुसरीकडे भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांनी मात्र नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत शेतकऱ्यांचे हित साधण्यासाठी आपण सर्वपक्षीय राजकीय नेत्यांची मोट बांधली, 11 संचालक बिनविरोध निवडून आणले. त्यामुळे आपल्याला निम्मे यश मिळाल्याचा दावा केला.उर्वरित 12 संचालक पदासाठी झालेल्या निवडणुकीतही महायुतीच्या शेतकरी विकास पॅनलला मोठे यश मिळेल, असा विश्वासही अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.

काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण यांना मात्र जिल्हा बँकेच्या निवडणुकीत नातेवाईकांसाठी केलेली तडजोड आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत महागात पडू शकते असे चित्र आहे. राज्य सहप्रभारी यांच्याकडे स्थानिक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या तक्रारीवर वरिष्ठ नेमकी काय भूमिका घेतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT