Nanded Farmer Death | Loan Recovery | Finance Company Sarkarnama
मराठवाडा

Nanded Farmer Death : 10 हजारांच्या वसुलीसाठी शेतकऱ्याला घरातून उचललं; दोन दिवसांनी फायनान्स ऑफिसमध्ये आढळला मृतदेह, कुटुंबीयांच्या आरोपाने खळबळ

Nanded Farmer Death Controvercy : मुदखेड तालुक्यातील माळकौठा येथील चंद्रकांत शिंदे यांनी मागील महिन्यात एका खासगी फायनान्स कंपनीकडून दहा हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. प्रत्यक्षात मात्र, व्याज कापून त्यांना केवळ सात हजार रुपये देण्यात आले. त्यानंतर दुष्काळामुळे हतबल झालेल्या शिंदे यांना कर्जाचे हप्ते भरता आले नाहीत.

Jagdish Patil

Nanded News, 25 Oct : एकीकडे सरकार शेतकऱ्यांकडे कर्जवसुलीसाठी तगादा लावू नका, अन्यथा कडक कारवाई केली जाईल, असा इशारा देत आहे. मात्र, दुसरीकडे दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांकडून कर्जवसुली केली जात असल्याची प्रकरणे समोर येत आहेत.

अशातच आता नांदेडमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अवघ्या १० हजार रुपयांच्या कर्जासाठी एका शेतकऱ्याला फायनान्स कंपनीच्या लोकांनी थेट गावातून उचलून नेले. त्यानंतर या शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचा बनाव करण्यात आला असून, ही हत्या असल्याचा आणि ती फायनान्स कंपनीच्या लोकांनी केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

नेमके प्रकरण काय?

मुदखेड तालुक्यातील माळकौठा येथील चंद्रकांत शिंदे यांनी मागील महिन्यात एका खासगी फायनान्स कंपनीकडून दहा हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. प्रत्यक्षात मात्र, व्याज कापून त्यांना केवळ सात हजार रुपये देण्यात आले. त्यानंतर दुष्काळामुळे हतबल झालेल्या शिंदे यांना कर्जाचे हप्ते भरता आले नाहीत. त्यामुळे वसुलीच्या नावाखाली फायनान्स कंपनीच्या लोकांनी गुरुवारी चंद्रकांत शिंदे यांना थेट गावातून उचलून आपल्या कार्यालयात नेले.

यावेळी १० हजार रुपयांच्या कर्जापोटी त्यांच्याकडे तब्बल ७० हजार रुपयांची मागणी करत त्यांना डांबून ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे. शिवाय, फायनान्स कंपनीचे लोक पैसे मिळाल्यावर त्यांना सोडून देतील, असे घरच्यांना वाटले. मात्र, दोन दिवसांनंतर शिंदे यांचा मृतदेह चिखलवाडी रस्त्यावरील खालसा फायनान्सच्या कार्यालयात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.

मात्र, ही आत्महत्या नसून कर्जाच्या पैशांसाठी फायनान्स कंपनीच्या चालकाने आणि कर्मचाऱ्यांनी चंद्रकांत शिंदे यांची हत्या करून त्यांना गळफास घेतल्याचे भासवल्याचा गंभीर आरोप मृत शेतकऱ्याची आई सर्जाबाई शिंदे आणि मुलगी रूपाली शिंदे यांनी केला आहे.

या घटनेमुळे आता नांदेडसह महाराष्ट्र हादरून गेला आहे. अवघ्या दहा हजार रुपयांसाठी एका शेतकऱ्याला जीव गमवावा लागल्यामुळे मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. तर दुसरीकडे, 'कर्जासाठी फायनान्स कंपनीच्या लोकांनी माझ्या वडिलांना गावातून उचलून नेले आणि त्यांचा घात केला. माझ्या वडिलांना न्याय मिळालाच पाहिजे. दोषींवर कठोर कारवाई करा,' अशी मागणी मृत शेतकऱ्याच्या मुलीने केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT