Nanded Political News Sarkarnama
मराठवाडा

Nanded Loksabha Constituency : पाळजचा गणपती कोणाला पावणार ?...

Laxmikant Mule

Marathwada Political News : लोकसभेच्या निवडणुका सहा-सात महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. राजकीय पक्षाचे नेते पदाधिकारी व कार्यकर्ते कामाला लागले आहेत. सार्वजनिक सभा, समारंभात नेते मंडळी आवर्जून हजेरी लावत आहेत. (Nanded Loksabha) याशिवाय नेत्यांचा ओढा देवदर्शनाकडेही वाढला आहे. नांदेड जिल्ह्याच्या टोकाला असलेल्या भोकर तालुक्यातील पाळज येथील गणपती पंचक्रोशीतील गावांत व‌ शेजारच्या तेलंगणा राज्यात एक जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते.

या गणपतींचे विसर्जन केले जात नाही, तसेच फक्त गणेशोत्सव काळात दहा दिवस हे मंदिर खुले असते. या गणपतींचे गणेशोत्सव काळात दर्शन घेण्यासाठी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) व खासदार प्रतापराव पाटील (Pratap Patil Chikhlikar) यांनी आपल्या समर्थकांसह धाव घेतली होती. यावेळी दोन्ही नेत्यांनी छोटेखानी सभाही घेतल्या. या दोन्ही नेत्यांनी मनोभावे दर्शन घेतले खरे पण येणाऱ्या निवडणुकीत गणपती बाप्पा कोणाला पावणार? हे मात्र निवडणूकीनंतरच कळेल.

सध्या तरी या दोघांनाही श्रध्दा व सबुरी ठेवून काम करावे लागणार आहे. पाळज येथील गणपती हा लाकडाचा असून त्याचे विसर्जन केले जात नाही. (Marathwada) येथील‌ उत्सवाला पाऊणशे वर्षांची परंपरा आहे. जिल्हातील एक जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते.गणेशोत्सव काळात दररोज तीस ते चाळीस हजार लोकांना अन्नदान केले जाते. हे देवस्थान भोकर विधानसभा मतदारसंघातील गावांत असुन दरवर्षी लोकप्रतिनिधी आवर्जून दर्शनासाठी येतात.

लोकसभा व त्या पाठोपाठ होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची तयारी सर्वच राजकीय पक्ष करत आहेत. विविध मार्गांनी जनसंपर्क वाढविण्यावरही भर दिला जात आहे. मतदार संघात कधी न दिसणारे नेते आता आवर्जून दिसून येत आहेत. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भोकर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. या मतदार संघातुन ते विक्रमी मतांनी विजयी झाले आहेत. पण गेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून त्यांना अपेक्षित असे मताधिक्य मिळाले नव्हते. त्या तुलनेत खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर या मतदारसंघात नवखे उमेदवार असून सुद्धा त्यांना लोकसभेला चांगले मतदान मिळाले.

या मतदारसंघातून अशोक चव्हाण यांना लोकसभेला पाच हजारांचे मताधिक्य मिळाले होते. या मतदारसंघात गेल्या काही महिन्यांपासून खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी संपर्क वाढवला आहे. तसेच काही गावांत विकास निधीचे वाटपही केले आहे. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत कोणाला उमेदवारी मिळते हे जरी निश्चित नसले तरी या दोन नेत्यांनी गणपतीचे दर्शन घेत साकडे घातले आहे. आता गणपती बाप्पा कोणाला पावणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. चिखलीकर-चव्हाण हे एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक आणि स्पर्धक म्हणून ओळखले जातात.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT