Nanded News : माजी मुख्यमंत्री व नांदेड जिल्ह्यातील मातब्बर नेते अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उद्या (ता.11) नांदेडमध्ये येत आहेत. महायुतीचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचारार्थ नायगाव तालुक्यातील नरसी येथे शाह यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेच्या निमित्ताने नांदेड जिल्हा काँग्रेसमुक्त झाला का? याचाही आढावा शाह घेणार असल्याचे बोलले जाते.
लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील 48 पैकी 20 उमेदवारांची पहिली यादी भाजपने जाहीर केली त्यात मराठवाड्यातील चार लोकसभा मतदारसंघांचा समावेश होता. त्यापैकी एक म्हणजे नांदेड लोकसभा मतदारसंघ. अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर नांदेडची उमेदवारी बदलली जाणार, अशा चर्चांना उधाण आल्यामुळे भाजपच्या यादीकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.
परंतु, भाजपने दुसऱ्यांदा विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना उमेदवारी दिली. विशेष म्हणजे 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून उमेदवार राहिलेल्या व पराभूत झालेल्या अशोक चव्हाण यांच्यावरच आता चिखलीकरांना निवडून आणण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
चिखलीकरांच्या प्रचार सभेसाठी अमित शाह Amit Shah उद्या नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. नरसी येथील रेस्ट हाऊस समोरील मैदानावर दुपारी तीन वाजता शाह यांची सभा होणार आहे. या सभेची तयारी सुरू असून मंत्री गिरीश महाजन, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. कराड हे या तयारीवर लक्ष ठेवून आहेत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
या सभेच्या निमित्ताने अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्या भाजप प्रवेशानंतर नांदेड जिल्हा किती काँग्रेसमुक्त झाला याचा आढावा अमित शाह घेणार असल्याचे बोलले जाते. चार दशकाहून अधिक काळ काँग्रेसमध्ये राहिलेल्या अशोक चव्हाण राज्याचे दोनवेळा मुख्यमंत्री, खासदार, आमदार होते. मराठा समाजाचा बडा नेता म्हणून भाजपने त्यांना पक्षात घेऊन 24 तासात राज्यसभेवर संधी दिली.
त्यानंतर संपूर्ण नांदेड व मराठवाडा काँग्रेसमुक्त करण्याची गॅरंटी चव्हाण यांच्याकडून घेण्यात आली आहे. याशिवाय प्रताप पाटील चिखलीकर (Prataprao Chikhalikar) यांना गेल्या निवडणुकीपेक्षा दुप्पट-तिप्पट मताधिक्याने निवडून आणण्याची जबाबदारी चव्हाण यांच्यावर सोपवण्यात आली आहे. या प्रचार सभेच्या निमित्ताने अशोक चव्हाण मोठे शक्तिप्रदर्शन करण्याची शक्यता आहे.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.