Nanded Loksabha Constituency Sarkarnama
मराठवाडा

Nanded Loksabha Constituency News : नांदेड लोकसभा जिंकण्यासाठी भाजपची तयारी, पण कार्यकर्त्यांची नाराजी नडणार..

Laxmikant Mule

Marathwada BJP : नांदेड लोकसभा निवडणूकीची तयारी भाजपने सुरू केली आहे. संभाव्य उमेदवारांना कामाला लागा असे सांगण्यात आल्यामुळे विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकरांकडुन आपल्या मतदारसंघात बैठका घेऊन निवडणूकीच्या तयारीचा आढावा घेण्यात येत आहे. (Nanded Loksabha Constituency News) नांदेड शहरातील आनंदसागर मंगल कार्यालयात नायगाव व नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठक नुकतीच घेण्यात आली.

या बैठकीत स्थानिक आमदारांच्या कामाकाजाबद्दल तक्रारींचा पाढा वाचण्यात आला. (Nanded) एकीकडे `मिशन 45` चे लक्ष्य आणि दुसरीकडे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्येच नाराजी, असे चित्र या बैठकीत दिसून आले. (BJP) सध्या संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे, या घाईतही चिखलीकरांनी बैठक बोलावली, पण यात जिंकण्यासाठीच्या रणनितीपेक्षा कार्यकर्त्यांच्या नाराजीची चर्चाच अधिक झाल्याचे बोलले जाते.

चिखलीकरांना (MP Pratap Patil Chikhlikar) जिल्ह्यात बैठका, मेळावे, मतदान केंद्रनिहाय तयारी, संघटनात्मक पातळीवर बांधणी करुन तयारी करण्याच्या सूचना पक्षाच्या वरिष्ठांकडून देण्यात आल्या आहेत. नांदेड जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाने निवडणूक तयारी सुरू केली असून याचाच एक भाग म्हणून नांदेड शहरात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.या बैठकीला नायगाव व नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती अपेक्षित होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पण काही पदाधिकारी नागपूरच्या बैठकीला गेले होते, तर जे शहरातच होते त्यांना चिखलीकरांकडून निमंत्रितच करण्यात आले नव्हते. नायगाव विधानसभा मतदारसंघाचे‌ नेतृत्व भाजपचे आमदार राजेश पवार हे करतात. मतदारसंघात पक्षाचे दोन गट पडले आहेत. आमदार विरोधी गटातील पदाधिकारी नांदेड येथील बैठकीला उपस्थित होते. या पदाधिकाऱ्यांनी आमदारांच्या कामाकाजावर नाराजी व्यक्त केली.

तर नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची शिंदे गटाचे शिवसेना आमदार बालाजी कल्याणकर यांच्या कामाविषयी उघडपणे नाराजी व्यक्त केली. चिखलीकर यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्या‌. मतभेद विसरून कामाला लागा, आशा सुचनाही केल्या. या बैठकीत चिखलीकर हेच उमेदवार असतील असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. पण चिखलीकर यांनी मात्र सावध प्रतिक्रिया दिली. पुढचा उमेदवार म्हणून मी काम करतोय, पण निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील, असे ते म्हणाले.

राज्यात आगामी लोकसभा निवडणूक सत्तेतील तीन्ही पक्ष एकत्रित लढणार असल्याचे भाजपचे बडे नेते सांगत आहेत. प्रत्यक्षात मात्र अनेक मतदारसंघामध्ये तीन्ही पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये बेबनाव असल्याचे चित्र आहे. चिखलीकरांच्या बैठकीत भाजपमधील अंतर्गत गटबाजीही समोर आली.

राजेश पवार यांच्याबद्दलच तक्रारी करण्यात आल्याने पक्षात सगळेच अलबेल आहे, असे नाही हे स्पष्ट होते. तर दुसरीकडे ज्या शिवसेना (शिंदे गट) पक्षाची मदत भाजपला घ्यावी लागणार आहे, त्यांच्या आमदाराबद्दलही भाजपमध्ये नाराजीचा सूर दिसून आला. त्यामुळे आधीच डेंजर झोनमध्ये असलेली नांदेड लोकसभेची जागा जिंकण्यासाठी भाजपला बरीच मेहनत घ्यावी लागणार, असे दिसते.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT