Ashok Chavan loyalist Amarnath Rajurkar is likely to get BJP candidature for the Nanded Local Authorities Constituency Legislative Council election Sarkarnama
मराठवाडा

MLC Election : विधानपरिषदेसाठी अशोक चव्हाणांच्या जवळच्या नेत्याचं नाव फायनल : भाजपसाठी वर्षानुवर्षे झटणारे 'निष्ठावंत' अडगळीत!

Ashok Chavan close leader selected for MLC election : नांदेड विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपकडून अशोक चव्हाण यांचे विश्वासू अमरनाथ राजूरकर यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. मात्र पक्षातील जुन्या आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी द्यावी, अशी मागणी वाढत आहे.

Jagdish Pansare

MLC election candidate finalised by BJP: अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यापासून नांदेड जिल्ह्यात बाहेरून आलेले विरुद्ध निष्ठावंत असा संघर्ष कायम आहे. यात अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशामुळे त्यांच्या समर्थकांना पक्षात मानाचे पान मिळत आहे. तर वर्षानुवर्ष जिल्ह्यात अशोक चव्हाण आणि काँग्रेस पक्षाविरोधात लढण्यात हयात घालवलेले मुळचे भाजपचे स्थानिक नेते आणि पदाधिकारी सध्या अडगळीत गेल्याचे चित्र आहे.

विधानसभा, नगरपालिका, नगरपंचायत आणि महानगरपालिका निवडणुकीत जिल्ह्यात बहुतेक ठिकाणी बाहेरून आलेले विरुद्ध निष्ठावंत हेच चित्र दिसले. पण चव्हाण यांच्याविरोधात जाण्याची हिंमत कोणी दाखवली नाही.

आता राज्यात विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक होत आहे. अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपचे कमळ फुलले. त्यामुळे राज्यातील वरिष्ठ नेत्यांनीही सगळी सुत्रं अशोक चव्हाण यांच्या हाती सोपवली आहेत.

विधानपरिषदेची जागा महायुतीत भाजपाकडे येणार हे जवळपास निश्चित आहे. जिल्ह्यात भाजप नंबर एकचा पक्ष तर आहेच, शिवाय मित्र पक्षांची कामगिरीही चांगली राहिल्याने मतदारसंघातून भाजपचा आमदार सहज निवडून येऊ शकतो. यात हमखास जिंकता येणाऱ्या जागेवर भाजपमधील अनेक इच्छुकांचा डोळा आहे. मात्र यावेळी अशोक चव्हाण सांगतील त्याला उमेदवारी मिळणार हे स्पष्ट आहे.

अशोक चव्हाण हे त्यांचा उजवा हात म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमर राजूरकर यांना पुन्हा विधानपरिषेदवर पाठवण्यास चव्हाण इच्छूक आहेत. त्यामुळे निष्ठावंतांच्या आशेवर पुन्हा पाणी फिरण्याची शक्यता आहे.

ऐतिहासिकदृष्ट्या नांदेड जिल्हा काँग्रेसचा आणि विशेषतः चव्हाण परिवाराचा बालेकिल्ला राहिला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून गेल्या अनेक निवडणुकांमध्ये काँग्रेसने आपले निर्विवाद वर्चस्व राखले होते.

या मतदारसंघाच्या मागील निवडणुकीत काँग्रेसचे अमरनाथ राजूरकर हे अशोक चव्हाण यांचे खंदे समर्थक म्हणून विजयी झाले होते. त्यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काँग्रेसचे संख्याबळ पूर्णपणे वरचढ होते.

सत्तेचा बदललेला आलेख पाहता आता अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडून भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केलेला आहे. त्यांच्यासोबत अमरनाथ राजूरकरांसह अनेक स्थानिक आजी-माजी लोकप्रतिनिधीनी भाजपमध्ये आले आहेत.

यामुळे या मतदारसंघाचे संपूर्ण राजकीय गणितच बदलले आहे. सध्याचे पक्षीय संख्याबळ बघितले तर नांदेड-वाघळा महानगरपालिका निवडणुकीत अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भाजपने मोठी बाजी मारली आहे.

भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट अस मिळूम महायुतीकडे एकूण सुमारे 228 सदस्य आहेत. यात एकट्या भाजपचे 125 पेक्षा जास्त सदस्य आहेत). तर महाविकास आघाडी कडे 106 सदस्य.

भाजपाकडून अमरनाथ राजूरकर अशोक चव्हाण यांचे अत्यंत विश्वासू आणि खंदे समर्थक मानले जातात. त्यांनी चव्हाणांसोबतच भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांना पुन्हा एकदा संधी मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. याशिवाय त्यांचे सुपूत्र आशुतोष राजूरकर यांच्यासह एक माजी जिल्हा परिषद सदस्य किंवा राजूरकर यांच्या एका निकटवर्तीय नेत्याचीही या जागेसाठी चर्चा सुरु आहे.

त्याचवेळी भाजपमधील जुन्या आणि मूळ कार्यकर्त्यांचा गट स्थानिक पातळीवर या जागेसाठी आग्रही आहे. पक्षाच्या जुन्या नेत्यांना किंवा निष्ठावंतांना संधी मिळावी, अशी मागणी अंतर्गत पातळीवर केली जात आहे. भाजपची स्थापना झाल्यानंतर जिल्हाभरात या पक्षाचा विस्तार करण्यामध्ये अनेक कार्यकर्त्यांचे योगदान आहे, असा दावा या गटाकडून केला जात आहे.

उपेक्षा, पक्ष सोडण्याची वेळ...

चंद्रकांत मस्की. भोजालाल गवळी यांसह अनेक जण भाजपच्या वाढीसाठी अनेक वर्षांपासून धडपतड आहेत. बाळासाहेब पांडे, गणपतराव नंदकुमार कुलकर्णी यांचीही नावे प्रामुख्याने घेता येतील.

आज जेव्हा नांदेड जिल्ह्यात भाजपला अच्छे दिन आले आहेत त्याचा लाभ किंवा त्या प्रवाहात मात्र ही जुनी जाणती निष्ठावंत मंडळी कुठेही दिसत नाही. यापैकी कोणाचेही नाव विधान परिषदेचे संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत नाही किंवा तशी मागणी ही कोणी लावून धरताना दिसत नाही.

राज्य पातळीवरूनही जुन्या निष्ठावंतांना संधी देण्याबाबत कुठलाही विचार पुढे आलेला नाही राज्यात भाजपची सत्ता येऊन 10 वर्षे लोटली तरीही बाळासाहेब पांडेंसारख्या कार्यकर्त्याचा आमदारकीसाठी विचार झाला नाही. गणपतराव राऊत यांची उपेक्षा झाली, रामराव चौधरी यांच्यावर तर पक्षाच्या बाहेर जाण्याची वेळ आली. गंगाधर यशवंत जोशी हेही मुख्य प्रवाहापासून दूर फेकले गेले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT