Nanded Political News Sarkarnama
मराठवाडा

Nanded Political News : अशोक चव्हाणांची कमाल; एकट्या नांदेडला मिळाले तीन खासदार...

Laxmikant Mule

Nanded News : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यांचा पायगुण नांदेडसाठी भाग्याचा ठरला. आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर अशोक चव्हाण आता राज्यसभेचे खासदार होणार आहेत. त्यांच्यासोबतच नांदेचेच डॉ. अजित गोपछडे यांनाही भाजपने राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. जिल्ह्याच्या राजकारणात पहिल्यांदाच नांदेड भाजपला चव्हाण आणि गोपछडे यांच्या रुपाने दोन खासदार मिळणार आहेत. एकाच जिल्ह्यात एकाचवेळी राज्यसभेवर दोघांना संधी मिळण्याचा हा कदाचित पहिलाच प्रसंग असावा. (Latest Marathi News)

अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाने जिल्ह्याचे नशीब फळफळले असून स्वतः चव्हाण आणि गोपछडे हे दोघे राज्यसभेवर निवडून जाण्याची फक्त औपचारिकता शिल्लक राहिली आहे. नांदेड जिल्ह्यात काँग्रेसच्या चलतीच्या काळात भारतीय जनता पक्षाचा एकही आमदार, खासदार नसायचा. गेल्या दहा वर्षात महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढली. जशी राज्यातील जनतेने परिवर्तनाला साथ दिली तशीच साथ नांदेड जिल्ह्याने भारतीय जनता पक्षाला दिली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राज्यसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून राज्यसभेवर पाठवयाच्या जागेसाठी भारतीय जनता पक्षाने जे तीन उमेदवार जाहीर केले आहेत त्यात अशोक चव्हाण व डॉ अजित गोपछडे हे दोघे नांदेडचे आहेत. या दोन उमेदवारीमुळे नांदेडची लॉटरी लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. राज्यातील महायुतीच्या आमदारांचे संख्याबळ पाहता सर्व उमेदवार सहज निवडून येतील असे बोलले जाते. नांदेड लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे दोन वेळा उमेदवार निवडून आले आहेत.

गेल्या निवडणूकीत प्रतापराव पाटील चिखलीकर हे निवडून आले होते, तर डी. बी. पाटील हे 2004 मध्ये निवडूण आले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झालेल्या डॉ. अजित गोपछडे यांना विधानपरिषदेसाठी उमेदवारी जाहीर झाली होती. पण अचानक त्यांची उमेदवारी रद्द करून रमेश कराड यांना संधी देण्यात आली होती. उमेदवारी कापल्यानंतरही गोपछडे यांनी दाखवलेला संयम व पक्ष कार्य यांची दखल अखेर राज्य आणि केंद्र नेतृत्वाने घेतलीच.

कोणत्याही राजकीय पक्षात आयुष्यभर काम केलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्याला संधी मिळतेच, असे नाही. अशोक चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर अवघ्या चोवीस तासात त्यांना राज्यसभेसाठी उमेदवारी जाहीर झाली. चव्हाण यांच्यापुर्वी पक्षात प्रवेश केलेल्या व पक्षात अनेक वर्षांपासून काम करणाऱ्यांचा पत्ता‌ अशोक चव्हाण यांच्या उमेदवारीने कट झाला आहे. त्यामानाने अशोक चव्हाण यांना भाग्यशाली म्हणावे लागेल.

मराठवाड्यातून माजी मंत्री पंकजा मुंडे पालवे (Pankaja Munde) यांच्या नावाची राज्यसभेसाठी चर्चा सुरू होती, पण ती चर्चाच ठरली. त्यांच्या नावाचा भाजप नेतृत्वाने यावेळीही विचार केला नाही. दुसरीकडे नांदेड जिल्ह्यातून मात्र एकाचवेळी दोघांना संधी दिली. जिल्ह्याला राज्यसेभेवर दोन आणि लोकसभेचा एक असे चक्क तीन खासदार सध्या लाभणार आहेत. राज्यसभेवर जाणाऱ्या चव्हाण आणि गोपछडे यांच्यावर ते निवडून आल्यानंतर विकासकामासोबतच येणाऱ्या लोकसभा (Lok Sabha) आणि विधानसभा निवडणुकीत पक्षाला खूप मोठे यश मिळवून द्यावे लागणार आहे. तसेच पक्षाच्या विस्तारासाठीही काम करावे लागणार आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT