Ncp Leader Babasaheb Patil-Ex.Minister Amit Deshmukh News Sarkarnama
मराठवाडा

Ncp : सांस्कृतिक मंत्री म्हणून अमित देशमुख फेल ; त्यांच्या काळात कलावंताचे मोठे नुकसान..

कोरोना काळामध्ये ५६ हजार कलाकारांना त्यांच्या खात्यामध्ये पाच हजार रुपये देण्याचे आश्वासन देखील अमित देशमुखांमूळेच फोल ठरले. (Ncp)

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : राज्याचे माजी सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख हे निष्क्रिय होते, ते या खात्याला अजिबात न्याय देऊ शकले नाहीत. उलट त्यांच्या काळातच राज्यातील कलावंताचे मोठे नुकसान झाले, असा आरोप राष्ट्रवादी (Ncp) चित्रपट, सांस्कृतिक आणि क्रिडा विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी केला आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांचे सत्र आता सुरू झाले आहे.

अमित देशमुख (Amit Deshmukh) हे राज्याचे वैद्यकीय व सांस्कृतिक विभागाचे मंत्री होते. वैद्यकीय क्षेत्रात त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला असला तरी सांस्कृतिक विभागाकडे त्यांचे दुर्लक्ष झाल्याचे बोलले जाते. (Marathwada) विशेषत: कोरोना काळात कलाकार, लोक कलावंत व नाट्य कलावंताची मोठी परवड झाली. तब्बल दोन वर्ष नाट्यगृह, थिएटर बंद असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती.

अशावेळी त्यांना मदतीचा हात देणे गरजेचे होते. परंतु अमित देशमुख यांच्या सांस्कृतिक विभागाने त्यासाठी काहीच प्रयत्न केले नाहीत, असा देखील आरोप केला जातो. या संदर्भात आता राष्ट्रवादीच्या चित्रपट, सांस्कृतिक व क्रिडा विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी थेट अमित देशमुख यांच्यावर तोफ डागली आहे.अमित देशमुख हे निष्क्रिय, अकार्यक्षम, अरसिक असल्याची टीका त्यांच्याकडून करण्यात आली आहे.

पाटील यांनी एका निवेदनाद्वारे अमित देशमुखांवर हे गंभीर आरोप केले आहेत. देशमुखांवरील आरोपानंतर आता काँग्रेस त्याला कसे प्रत्युत्तर देते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात असतांनाच्या अडीच वर्षात या सरकारने अतिशय लोकाभिमुख कारभार केला. मात्र, दुर्दैवानं सरकारातील काँग्रेसचे तत्कालिन सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख मात्र याला अपवाद होते.

गेल्या अडीच वर्षात सांस्कृतिक खातं पुर्णपणे निष्क्रिय होतं. कारण या खात्याला मिळालेल्या अमित देशमुख सारख्या अरसिक आणि अकार्यक्षम मंत्र्यामुळे कलावंतांचे खूप मोठे नुकसान झाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील आणि त्यांच्या सतत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून लोक कलावंताचे अनेक प्रश्न मार्गी लावण्याचे प्रयत्न केलेत. मात्र, अमित देशमुखांनी हे प्रश्न मार्गी लावण्याऐवजी त्यात खोडा घातल्याचा गंभीर आरोप या निवेदनातून करण्यात आला.

कलाकारांच्या विविध प्रश्नांविषयी केलेल्या प्रयत्नांची यादीच या निवेदनात सादर करण्यात आली आहे. त्याकडे अमित देशमुखांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मराठी चित्रपटला उद्योगाचा दर्जा देण्यासाठीची धडपड असो किंवा वृद्ध कलावंतांचे मानधन वाढवून देण्याच्या प्रक्रियेकडे माजी सांस्कृतिक मंत्र्यांनी जाणीवपूर्वक कानाडोळा केला.

मुंबईमध्ये कलाकार भवन उभे करणे, लोककलावंतांसाठी स्वर्गीय विठाबाई नारायणगावकर आर्थिक विकास महामंडळ स्थापन व्हावे या राष्ट्रवादीच्या मागणीसंदर्भात अजितदादा आणि सुप्रियाताईंनी दखल दिल्यानंतरही अमित देशमुखांनी त्याकडे दुर्लक्ष केले. गेल्या अडीच वर्षांत अमित देशमुखांनी कलावंतहिताचे कुठलेही निर्णय न घेतल्यामुळे गेल्या अडीच वर्षात अनेक कलावंतांना विविध योजनांपासून वंचित रहावं लागल्याचा आरोप देखील या निवदेनात करण्यात आला आहे.

कोरोना काळामध्ये ५६ हजार कलाकारांना त्यांच्या खात्यामध्ये पाच हजार रुपये देण्याचे आश्वासन देखील अमित देशमुखांमूळेच फोल ठरले. यासोबतच वृद्ध कलावंतांच्या मानधन वाढीचा प्रस्ताव, मराठी चित्रपट सृष्टीला उद्योगाचा दर्जा देण्याच्या संदर्भात निर्णय तत्कालीन उपमुख्यमंत्र्यांनी अजितदादा यांनी मार्गी लावला होता. मात्र, अमित देशमुख यांच्या कार्यालयाकडे कलावंताच्या मानधन वाढीचा प्रस्ताव आणि मराठी चित्रपटाला उद्योगाचा दर्जा देण्याच्या संदर्भातला प्रस्ताव धुळखात पडून राहिल्यामुळे हे प्रश्न तसेच राहिले असेही पाटील यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT