Suresh Dhas

 

Sarkarnama

मराठवाडा

देवस्थान जमीन घोटाळा : भाजप आमदार सुरेश धस, माजी आमदार धोंडे यांची ईडीकडे तक्रार

एकट्या आष्टी तालुक्यात सात देवस्थानांच्या जमिनींचा हजारो कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात देवस्थानांच्या जमिनींचा हजारो कोटींचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केला आहे. याबाबतची तक्रार सक्तवसूली संचालनालयाकडे (ED) देण्यात आली असून त्यामध्ये भाजपचे आमदार सुरेश धस (Suresh Dhas) आणि माजी आमदार भीमराव धोंडेे (Bhimrao Dhonde) यांच्या नावांचा समावेश आहे. त्यांनी हा जमीन घोटाळा केल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे.

मलिक यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते राम खाडे यांनी ही माहिती समोर आणली आहे. त्यांनी याबाबत ईडीसह महसलू व गृह विभागाकडेही तक्रार केली आहे. मलिक म्हणाले, तीन दर्गा व मस्जिदच्या जमिनींच्या घोटाळा प्रकरणात आष्टीमध्ये तीन गुन्हे दाखल आहे. कागतपत्रांमध्ये फेरफार करून अधिकाऱ्यांनी त्या जागेवर खासगी नाव चढवले. त्याचे प्लॉटिंग करून विकण्याचे काम सुरू झाले होते. तक्रार आल्यानंतर हे गुन्हे दाखल केले आहेत. वक्फ बोर्डाची 213 एकर जमीन आहे. त्याची एसआयटी मार्फतही चौकशी केली जात आहे.

आष्टी तालुक्यात सात मंदिर देवस्थानांच्या जमिनीचा घोटाळाही झाला आहे. विठोबा देवस्थानची 41 एकर 32 गुंठे, खंडोबा देवस्थानची 35 एकर, श्रीराम देवस्थानची 31 एकर, श्रीराम देवस्थानची 15 एकर, चिंचपूर रामचंद्र देवस्थान 65 एकर, बेळगाव खंडोबा देवस्थान 60 एकर, विठोबा देवस्थान 50 एकर जमीन विकण्याचे काम अधिकाऱ्यांच्या संगनमताने करण्याचे काम झाले आहे. ही जमीन सुमारे 300 एकर आहे. ही केवळ एकच तालुक्याची माहिती आहे. इतर ठिकाणचीही माहिती काढत आहोत. इतर ठिकाणीही घोटाळे झाल्याची शक्यता असून यात कुणाचीही गय केली जाणार नाही, असं मलिक यांनी सांगितलं.

मंदीर, मस्जिदची मालकी कधीही बदलता येत नाही. हा प्रकार 2017 पासून सुरू झाला आहे. तत्कालीन उप जिल्हाधिकारी एन. आर. शेळके होते. याबाबत विधानसभेत प्रश्न उपस्थित करण्यात आल्यानंतर त्यांना निलंबित केले. त्यानंतर दुसरे अधिकारी आले. तेव्हाही 2017 ते 2020 मध्ये जमिनी हडपण्याचे काम करण्यात आले आहे. मच्छिंद्रनाथ मल्टीइस्टेट क्रेडीट सोसायटीच्या माध्यमातून हा घोटाळा करण्यात आला आहे. सात देवस्थानांच्या बाबत खाडे यांनी तक्रारी केल्या आहेत. त्यांनी ईडीकडेही प्रकरणांच्या तक्रारी केल्या आहेत. यामध्ये आमदार सुरेश धस आणि माजी आमदार भीमराव दोंदे यांच्या नावानेही तक्रार झालेली आहे, असं मलिक यांनी स्पष्ट केलं.

जो भाजप श्रीरामाच्या नावाने राजकारण करतो, त्याच भाजपचे नेते रामाच्या देवस्थानाची जागा हडपत आहेत. विठोबाच्या नावाच्या देवस्थान, सात मंदिरांच्या जागा हडपून कोट्यवधी रुपये हडपण्याचे काम भाजपच्या नेत्यांच्या माध्यमातून झाले आहे. तीन मुस्लिम, सात हिंदू देवस्थानांच्या हजारो कोटींच्या जमिनीचा घोटाळा झाला आहे. ईडीकडून याची चौकशी केली जाईल, अशी अपेक्षा आहे. देवस्थानांची जमिनी हडपण्याचे काम महाराष्ट्रात सुरू आहे. वक्फ बोर्डाच्या बाबतीतही अनेक तक्रारी येत आहेत. त्याची चौकशी केली जात आहे. कुणी कितीही मोठा असेल त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, असेही मलिक यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT