Jaydatta Kshirsagar
Jaydatta Kshirsagar Sarkarnama
मराठवाडा

पाच टक्क्यांसाठी झुकेंगा नही; दहा टक्क्यांसाठी लोटांगण घालेगा : आमदार क्षीरसागरांवर टक्केवारीचे बॉम्बहल्ले!

सरकारनामा ब्यूरो

बीड : स्वतःच्या बापाला नीट बोलत नाहीत. सहकाऱ्यांवर ब्लॅकमेलिंगचे आरोप करतात. जुन्या कामाचे स्वतः श्रेय घेतात, ते डाकू आहेत. ‘पाच टक्क्यांसाठी झुकेंगा नही अन्‌ दहा टक्क्यांसाठी लोटांगण घालेगा’ अशी जहरी टीका आमदार संदीप क्षीरसागर (Sandeep Kshirsagar) यांचे एकेकाळी कट्टर समर्थक असलेले माजी नगरसेवक अमर नाईकवाडे यांनी शिवसेना पक्षप्रवेशावेळी केली. (NCP MLA Sandeep Kshirsagar accused of percentage; Supporters join Shiv Sena)

जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष गंगाधर घुमरे, नगर पालिकेचे माजी गटनेते फारुक पटेल, माजी नगरसेवक अमर नाईकवाडे यांच्यासह प्रेमचंद लोढा, भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष नितीन लोढा यांनी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरांचे नेतृत्व स्वीकारुन शिवसेनेत प्रवेश केला. जिल्हा परिषदेसमोर झालेल्या प्रवेश सोहळ्यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, शिवसेना जिल्हा प्रमुख अनिल जगताप, माजी नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर, सचिन मुळूक, बाळासाहेब पिंगळे, बप्पासाहेब घुगे, बाळासाहेब गुंजाळ, पिंगळे आदींची उपस्थिती होती.

यातील घुमरे, पटेल आणि नाईकवाडे हे संदीप क्षीरसागर यांनी काकांना आव्हान देत काकू नाना आघाडीची स्थापना करुन लढविलेल्या नगर पालिका, जिल्हा परिषद व विधानसभा निवडणुकीत खंबीरपणे त्यांच्या सोबत होते. मात्र, मागच्या दीड वर्षांपासून हे तिघेही त्यांच्यापासून दुरावले होते. तर,लोढा यांनी विधानसभेला आमदार क्षीरसागर यांना मदत केली होती. या सर्वांनी आता त्यांनी साथ सोडून जयदत्त क्षीरसागर यांचे नेतृत्व स्वीकारले आहे. यावेळी पक्षांतर करणाऱ्यांसह इतरांनी आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले.

अमर नाईकवाडे म्हणाले, रवींद्र क्षीरसागर यांच्यावरील अन्याय समोर ठेवून काकू-नाना विकास आघाडीत काम केले. पदासाठी आम्ही कधीही सोबत नव्हतो. आमदार झाल्यावर हे वडिल रवींद्र क्षीरसागरांसोबत कसे वागले, हे आम्ही पाहिलं आहे. जो माणूस स्वतःच्या वडिलांसोबत चुकीचं वागू शकतो, तिथं आमचं काय ही शंका आली, असा गंभीर आरोपही त्यांनी केला. सभापतिपदाच्या निवडीवेळी पदे घ्यायची नाहीत, असा निरोप दिला. जिल्हा परिषद सभापती निवडीवेळीसुद्धा गंगाधर घुमरे यांना डावललं. आम्ही कोविडमध्ये सामान्यांची सेवा करत असताना आमची काम ऐकू नका, असा निरोप शासकीय यंत्रणेला दिला. लॉकडाऊनमध्येही आम्ही गरिबांना अन्नधान्य वाटप केले, तेव्हाही आम्हाला कामे करण्यास विरोध केला गेला. तेव्हाच यांची पातळी खालची असल्याचे लक्षात आल्याचे अमर नाईकवाडे म्हणाले. आमदार क्षीरसगार यांनी वाटप केलेले अन्नधान्य हे मोंढ्यातील व्यापाऱ्यांकडून बळजबरीने घेतले होते, असा आरोपही या वेळी करण्यात आला.

पालिकेतील ट्रेसर सलीम यांच्या अनियमिततेला आम्ही विरोध केल्यानंतर सुरुवातीला त्यांची बदली व्हावी, असे पत्र देणाऱ्या आमदारांनी नंतर नऊच दिवसांत त्याच ट्रेसर सलिम यांना रुजू करुन घ्यावे, असे पत्र दिले. पुन्हा नंतरच्या अधिवेशनात याच अधिकाऱ्याच्या विरोधात लक्षवेधी केली. या सगळ्या बदलत्या भूमिकांमागे नेमकी काय तोडपाणी झाली, असा गंभीर आरोपही त्यांनी केला. डॉ. बाबू जोगदंड व आमदार हे रंगा बिल्लाची जोडी आहेत, असा घणाघातही अमर नाईकवाडे यांनी केला.

तुम्हाला 18 नगरसेवक सोडून गेले, याचा विचार करावा. तुम्ही टोपल्यांनी शेण खाता अन शिंतोडे सहकाऱ्यांवर उडवत आहेत. नाहक बदनामी केली तर अंडीपिल्ली बाहेर काढू, असा इशाराही या वेळी नाईकवाडे यांनी दिला. विकासपुरुष असाल तर दारातला रस्ता करा, असे आव्हानही त्यांनी दिले. एकही कार्यालय नाही, जिथं यांनी अधिकाऱ्यांना शिव्या दिलेल्या नाहीत, अस झालेलं नाही. चुलत बंधू डॉ. योगेश क्षीरसागर यांनीही असाच घणाघात गेला. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सर्वांसमोर मराठीत अर्ज लिहून दाखवावा, असे आव्हानही त्यांनी दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT