Parbhani NCP News Sarkarnama
मराठवाडा

Parbhani NCP News : आम्ही ताकदीने लढू अन् जिंकू; शरद पवार गटाने थोपटले दंड...

NCP Politics : जिंतूर विधानसभा मतदारसंघ शरद पवार गटाकडेच राहिला, तर माजी आमदार विजय भांबळे हेच उमेदवार असतील.

Prasad Shivaji Joshi

Marathwada Political News : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर राजेश विटेकर, आमदार बाबाजानी दुर्राणी व मधुसूदन केंद्रे यांनी अजित पवारांना साथ देण्याचे ठरवले. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाची वाट बिकट असल्याचे दिसून येत आहे. (NCP News) मात्र, कोणी कुठे गेले यामुळे आम्हाला काहीही फरक पडणार नसून परभणी जिल्हा शरद पवार यांच्या विचारांना मानणारा असल्याने आम्ही पूर्ण ताकदीनिशी निवडणुकीच्या मैदानात उतरू व जिंकून दाखवू, असा विश्वास माजी आमदार विजय भांबळे यांनी व्यक्त केला

पक्षात उभी फूट पडली असली तरी शरद पवार (Sharad Pawar) गटाने परभणीत अजित पवार गटासह विरोधकांना आव्हान दिले आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर असलेले राजेश विटेकर, गंगाखेड विधानसभेचे माजी आमदार डॉ. मधुसूदन केंद्रे व परभणीचे (Parbhani) माजी महापौर प्रताप देशमुख यांनी अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला, तर राज्यसभा सदस्य डॉ. फौजिया खान, विधान परिषद सदस्य व पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणी, जिंतूरचे माजी आमदार विजय भांबळे यांनी शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ राहण्याचा निर्णय घेतला.

मात्र, पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणी यांना शरद पवार गटात असल्याने अनेक त्यांच्या पाथरी या होमपीचवर प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली. (Marathwada) अखेर नाईलाजास्तव बाबाजानी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी जुळवून घेतले. यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शरद पवार गटाची संपूर्ण भिस्त खासदार फौजिया खान, माजी आमदार विजय भांबळे यांच्यावरच आहे. परभणी लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार शिवसेना ठाकरे गटाचे असल्याने इंडिया आघाडीच्या जागावाटपात परभणी लोकसभा मतदारसंघ शिवसेना उद्धव ठाकरे यांच्याकडे असेल हे स्पष्ट आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जिंतूर विधानसभा मतदारसंघात शरद पवार गटाकडेच राहिला तर माजी आमदार विजय भांबळे हेच उमेदवार असतील, तर गंगाखेड विधानसभा मतदारसंघ शरद पवार गटाकडेच गेल्यास माजी आमदार सीताराम घनदाट हे प्रमुख दावेदार असतील. परभणी विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव ठाकरे गट तर पाथरी विधानसभा मतदारसंघात कॉंग्रेस पक्षाचा उमेदवार असल्याने शरद पवार गटाला येथेही संधी नाही. म्हणजेच जिल्ह्यात केवळ जिंतूर व गंगाखेड विधानसभा मतदारसंघात शरद पवार गटाला निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची संधी आहे.

एकेकाळी अजित पवार यांच्याशी घनिष्ट संबंध असलेले माजी आमदार विजय भांबळे यांच्यावर संपूर्ण जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाची जबाबदारी येऊन ठेपली आहे. संपूर्ण जिल्हा शरद पवार यांच्या पाठीशी आहे, त्यामुळे विटेकर, दुर्राणी, केंद्रे, प्रताप देशमुख हे सर्व अजित पवार गटात गेले तरी आम्हाला काहीही फरक पडत नाही. खासदार फौजिया खान, माजी आमदार विजय गव्हाणे, सीताराम घनदाट यांच्यासोबत पूर्ण ताकदीनिशी आम्ही निवडणूकीच्या मैदानात उतरू, असा विश्वास भांबळे यांनी व्यक्त केला.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT