Saharad Pawar-Narendra Kale-Dilip Walse Patil  Sarkarnama
मराठवाडा

Narendra Kale Attack On Walse Patil : 'पवारसाहेब तुमचं चुकलंच… या नेत्यांनी जिल्ह्यातून स्वतःशिवाय दुसरं कोणी निवडून येणार नाही, हेच बघितलं’

सरकारनामा ब्यूरो

Mumbai : पवारसाहेब तुमचं चुकलंच. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून महाराष्ट्र सरकारमध्ये काही नेत्यांना सातत्याने मंत्रिपदे व सत्तेचे अधिकार दिले. या नेत्यांनी आपला मतदारसंघ वगळता पक्ष विस्तारासाठी काय प्रयत्न केले? अनेकांनी जिल्ह्यात स्वतःशिवाय पक्षाचा कोणी निवडून येणार नाही, ह्याचीच काळजी घेतली. साहेब, तुम्ही या प्रस्थापित नेत्यांचे लाड केले नसते. त्यांना मतदारसंघाची आणि जिल्ह्याची 'मालकी' दिली नसती तर आज कदाचित वेगळी परीस्थिती असती, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रदेश उपाध्यक्ष नरेंद्र काळे यांनी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावर हल्लाबोल केला. (NCP State Vice President Narendra Kale criticizes Dilip Walse Patil)

सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी रविवारी (ता. २० ऑगस्ट) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) मेळाव्यात बोलताना पवारांबाबत विधान केले होते. शरद पवार यांच्या उंचीइतका नेता देशात नाही, असे आपण म्हणतो. दुसऱ्या बाजूला पवारसाहेबांच्या ताकदीवर किंवा नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील जनतेने त्यांना एकदाही बहुमत दिलं नाही. एकदाही त्यांना स्वतःच्या ताकदीवर मुख्यमंत्री केलं नाही, असे दिलीप वळसे पाटील म्हणाले होते. त्याचा नरेंद्र काळे यांनी समाचार घेतला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे छत्रपती संभाजीनगर पदवीधर विभागप्रमुख नरेंद्र काळे आपल्या पोस्टमध्ये म्हणतात की, पवार साहेब चुकलेच.... 'शरद पवारसाहेबांना ६०-७०च्या वर कधीही आमदार निवडून आणता आले नाहीत. पवारसाहेबांना स्वबळावर एकदाही मुख्यमंत्री होता आले नाही', असे काल मंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले. दिलीप वळसे पाटलांनी शरद पवार साहेबांच्या कृपेने १५-१५ वर्षे मंत्री राहिलेल्या प्रस्थापित नेत्यांनी आत्मपरीक्षण केले, तर शरद पवार किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री स्वबळावर का होऊ शकला नाही, याचे उत्तर मिळेल.

पवारसाहेब तुमचे चुकलेच....पक्ष स्थापनेपासून महाराष्ट्राच्या सरकारमध्ये काही नेत्यांना सातत्याने मंत्रिपदे व सत्तेचे अधिकार दिले. या नेत्यांनी आपला मतदारसंघ वगळता जिल्हाभर पक्ष विस्तारासाठी काय प्रयत्न केले? उलट अनेकांनी तर जिल्ह्यात स्वतःशिवाय पक्षाचा कोणी निवडून येणार नाही ह्याची काळजी घेतली. शरद पवारसाहेबांना आणि पक्षाला जिल्ह्यात दुसरा पर्यायच दिसू द्यायचा नाही, हे धोरण या नेत्यांनी राबविले. साहेब, तुम्ही जर या प्रस्थापित नेत्यांचे लाड केले नसते. त्यांना त्यांच्या मतदारसंघाची व जिल्ह्याची 'मालकी' दिली नसती तर आज कदाचित वेगळी परीस्थिती असती, असेही काळे यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.

डॉ. नरेंद्र काळे पुढे म्हणतात की, या नेत्यांनी सर्वसामान्य कर्तृत्ववान कार्यकर्त्यांना ताकद देण्यापेक्षा आपली स्वतः ची मुलं 'लॉंच' करण्यावर भर दिला. हे सगळे पवारसाहेबांचे १९९९ चे तरुण नेते आता १५-१८ वर्षे मंत्रिपदे उपभोगून आता मंत्रिपदासाठी दुसऱ्या विचारांसोबत गेली आहेत. आताही हे नेते स्वतःच्या मंत्रिपदासह मुलाबाळांच्या सुरक्षित राजकीय लॉंचिंग व राजकीय भविष्यासाठी' विचारहिन खस्ता खात आहेत. पण, पवारसाहेब राजकीयदृष्ट्या अडचणीत आले की, महाराष्ट्रातील सर्वसामान्य पुरोगामी विचाराचा कार्यकर्ता एकजुटीने त्यांच्या पाठीशी उभा राहातो... आत्ताही तो उभा आहे.

निवडणुकीत लढणार पवारसाहेब व पुरोगामी कार्यकर्ता आणि सत्ता आली की मीच ह्या वळसे पाटलांसारख्या सर्वच प्रस्थापित नेत्यांच्या सत्तालोलूप दबावतंत्रांच्या धोरणामुळे साहेबांच्या विचारांच्या आमदारांची संख्या वाढली नाही. अशा अनेक प्रस्थापितांनी १५/१५ वर्षे राज्यात मंत्रिपद भोगून ही लोकसभेची निवडणूक लढवायची वेळ आली की रणांगणातून थातूरमातूर कारणे देत पळ काढला आहे. मग कशी पवारांची ताकद वाढणार होती? हे डझनभर कायम मंत्री असणारे काही काळानंतर विधानसभेऐवजी लोकसभेत गेले असते, तर नवीन लोक आमदार झाले असते. असेच संक्रमण सातत्याने होत राहिले असते, तर राज्य एकहाती आले असती. सोबत केंद्रातही पवार साहेबांची ताकद वाढली असती. पण, ज्यांनी सत्ता उपभोगून पक्षवाढीसाठी काहीही केले नाही, त्यांनीच टीका करायची, हे पटण्यासारखे नाही, असा टोलाही डॉ. नरेंद्र काळे यांनी वळसे पाटील यांना लगावला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT