Ashok Chavan-NCP-shivsena
Ashok Chavan-NCP-shivsena Sarkarnama
मराठवाडा

राष्ट्रवादीचा अशोक चव्हाणांना झटका : शिवसेनेच्या मदतीने माहूरचे नगराध्यक्षपद पटकावले!

सरकारनामा ब्यूरो

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील माहूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेच्या मदतीने राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) तथा काँग्रेसला (congress) जोरदार धक्का दिला आहे. नगरपंचायतीच्या सर्वाधिक सात जागा जिंकणाऱ्या राष्ट्रवादीला (NCP) शिवसेनेने (shivsena) पाठिंबा दिल्याने नगराध्यक्षपदी फेरोज देसानी यांची निवड झाली आहे. (NCP's Feroze Desani elected as council chairman of Mahur)

माहूर नगरपंचायतीच्या निवडणुकीत एकूण १७ जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वाधिक ७ जागा जिंकल्या होत्या, तर काँग्रेस पक्षाचे नगरसेवक सहा जागांवर निवडून आले होते, त्यामुळे नगराध्यक्ष कोणाचा होणार याकडे नांदेड जिल्ह्याचे लक्ष लागले होते. शिवसेनेने तीन, तर भाजपचा एका जागेवर विजय झाला होता. त्यामुळे नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेची भूमिका महत्वाची होती.

अशोक चव्हाण यांचे होम ग्राउंड असल्यामुळे ते काहीतरी चमत्कार करतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. शिवसेनेचे नगरसेवक काँग्रेसच्या नगरसेवकांसोबत सहलीवर गेल्याची चर्चा रंगली होती. शिवसेनेच्या मदतीने काँग्रेस पक्षाने नगराध्यक्षपदासाठी जुळवाजुळव करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो फोल ठरला. महाविकास आघाडीतील शिवसेनेने राष्ट्रवादीच्या पाठीशी आपली ताकद उभी केल्याने काँग्रेस पक्षाला विरोधात बसण्याशिवाय पर्याय राहिला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने मुस्लीम समाजातील फेरोज देसानी यांना नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत उमेदवारी दिली. शिवसेनेने किंगरमेकरची भूमिका बजावत आपले वजन राष्ट्रवादीच्या पारड्यात टाकले, त्यामुळे देसानी यांची नगराध्यक्षपदी निवड झाली.

शिवसेनेच्या भूमिकेमुळे काँग्रेसला मात्र झटका बसला आहे. शिवसेना आपल्याला पाठिंबा देईल, अशी काँग्रेस नेत्यांना अपेक्षा होती. मात्र, शिवसेनेने राष्ट्रवादीला पाठिंबा जाहीर केला, त्यामुळे देसानी हे नगराध्यक्ष बनले आहेत. दरम्यान, एकमेव नगरसेवक असलेल्या भारतीय जनता पक्षाने मात्र या निवडणुकीत तटस्थ राहण्याची भूमिका निभावली. नगराध्यक्षपदी देसानी यांची निवड होताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT