Santosh Bangar News in Marathi, Hingoli News in Marathi
Santosh Bangar News in Marathi, Hingoli News in Marathi  
मराठवाडा

मला काढण्याचा कोणालाही अधिकार नाही; हकालपट्टीनंतर संतोष बांगर यांचा खुलासा

सरकारनामा ब्युरो

हिंगोली : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) हिंगोलीचे आमदार संतोष बांगर (MLA Santosh Bangar) यांना मोठा धक्का दिला आहे. संतोष बांगर यांची शिवसेना (Shivsena) हिंगोली जिल्हाध्यक्ष पदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षा विरोधात कार्यवाही केल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. यानंतर आमदार संतोष बांगर यांनी त्यांच्या हकालपट्टीबाबत खुलासा केला आहे.(Santosh Bangar News in Marathi)

संतोष बांगर म्हणाले, "शिवसेनेतून हकालपट्टी केल्याचे कोणतेही पत्र अद्याप मला पोहचलेले नाही. मी टिव्हीवरच हे पाहत आहे. शिवसेना प्रमुख, दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी माझी हिंगोलीच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली होती. मी बाळासाहेब ठाकरेंचा कडवट शिवसैनिक आहे. मला शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख पदावरुन काढलेलं नाही. मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीच सांगितलं आहे की, तुच हिंगोली शिवसेनेचा जिल्हाप्रमुख आहे. त्यामुळे कोणत्याही पदाधिकाऱ्याला काढण्याचा अधिकार कोणालाही नाही. शिवसेनेचा, बाळासाहेबांचा झेंडा आम्ही घेऊन चाललो आहोत, त्यामुळे आम्हाला काढण्याचा अधिकाही कोणालाही नाही.

माझी जिल्ह्यातल्या सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की, कोणीही आपल्याला पदावरुन काढणार नाही. ५५ पैकी आमदार आमच्या ओरिजन शिवसेनेत आहेत. ११ पेक्षा जास्त खासदार आणि ५० हुन अधिक तालुका प्रमुख, शहरप्रमुख, नगराध्यक्ष, जिल्हापरिषदेचे अध्यक्ष शिवसेनेत येणार आहेत. आजही मला मातोश्रीबद्दल, उद्धव ठाकरेंबाबत आदर आहे. पण त्यांच्या आजूबाजूला जी काही लोक आहेत, त्यांच्यापासून उद्धवसाहेबांनी सावध राहावं, अशी माझी विनंती आहे. मला कोणीही जिल्हाध्यक्ष पदावरुन काढलेले नाही, ज्यावेळी हे सर्व लोक ओरिजन शिवसेनेत येतील तेव्हाच तुम्हाला कळून चुकेल, असंं संतोष बांगर यांनी म्हटलं आहे.

काय आहे प्रकरण?

2009 पासून संतोष बांगर हे हिंगोलीचे शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षपदावर होते. पण बांगर यांनी केलेल्या बंडखोरीनंतर त्यांची जिल्हाध्यक्ष पदावरून हकालपट्टी करण्यात आली. यासोबत बांगर यांच्या तोडीस तोड देणारा जिल्हाध्यक्ष निवडण्यासाठी सुद्धा उद्धव ठाकरेंकडून जिल्ह्यातील शिवसैनिकांची चाचपणी करण्यात येत आहे. बहुमत चाचणीच्या दिवसापर्यंत संतोष बांगर ठाकरेंसोबत होते. पण बहुमत चाचणीच्या दिवशी बांगर अचानक पलटले आणि त्यांनी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विरोधात मतदान केलं होतं.

धक्कादायक म्हणजे, एकनाथ शिंदेंनी बंड केले आणि त्यांच्यासोबत शिवसेनेचे इतरही आमदार निघून गेले, तेव्हा हेच संतोष बांगर त्यांना परत येण्याची मागणी करत ढसाढसा रडले होते. ''अख्ख्या मराठवाड्यातले आमदार एकनाथ शिंदेंसोबत जात होते, फक्त संतोष बांगर ठाकरेंसोबत उभे होते. मी बाळासाहेबांचा खरा शिवसैनिक आहे, म्हणत ढसाढसा रडलेही. पण स्वतःला सच्चा शिवसैनिक म्हणवणारे बांगर 24 तासांत हे शिंदेगटात सामील झाल्याने शिवसेनेवलाही मोठा धक्का बसला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT